Marathi Bible Reading | St. Francesca Saverio | 22nd December 2020

     

मंगळवार  
 
२२ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
चौथा सप्ताह  

✝️संत फ्रान्सिस्का कॅब्रिनी हिचा सण✝️ 
(कुमारीका)
काट्यांवरून चालताना ते बोचतात ह्याची जाणीवही ठेवू देऊ नका आणि प्रेम करताना अपमानाला आनंदाने सामोरे जाण्यास विसरू नका.

“पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.” 

✝️

पहिले वाचन : १ शमुवेल १:२४-२८

वाचक :  शमुवेल  या पुस्तकातून घेतलेले वाचन

शमुवेलाचे दूध तुटल्यानंतर हन्नाले त्याला बरोबर घेतले आणि तीन वर्षाचा एक गोऱ्हा, एक एफाभर सपीठ आणि द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन ती शिलोस, परमेश्वराच्या मंदिरात आपल्या छोट्या बाळासह आली. त्यांनी गोऱ्हा बळी दिला आणि बाळाला एलीकडे आणले. मग हन्ना त्याला म्हणाली, महाराज, अगदी तुमच्या गळ्याशपथ सांगते. येथे तुमच्याजवळच उभी राहून परमेश्वराची याचना करणारी स्त्री, ती मीच. महाराज, ह्या बाळासाठी मी याचना केली होती. मी मागितले होते ते परमेश्वराने मला दिले आहे. म्हणूनच मी देखील ते परमेश्वराला देत आहे. त्याचे सारे आयुष्य परमेश्वराला वाहत आहे. मग त्यांनी तेथे परमेश्वराची उपासना केली.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १शमुवेल २:१.४-८

प्रतिसाद : माझे मन आनंदाने बहरले आहे.

१) माझे मन आनंदाने बहरले आहे परमेश्वराने माझे नाक वर केले आहे माझे मुख शत्रूंचा धिक्कार करत आहे, तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.

२)धनुर्धारी वीरांची मती कुंठित झाली आहे. धडपडणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त होऊन कंबरा बांधल्या आहेत, जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासाठी मोलमजुरी करत आहेत. जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत. वंध्येने सातांना जन्म दिला आहे. पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे.

३) परमेश्वर प्राणहरण करतो. तोच जीवदानही देतो. तो अधोलोकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो तसाच साधनही करतो. तो खाली ओढतो तसाच वरही उचलतो.

४) तो दलितांना धुळीतून उठवतो गरिबांना उकिरड्यावरून उचलतो. त्यांना अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो पृथ्वीच्या आधारस्तंभ परमेश्वराचे आहेत. त्याच्यावर त्याने जग उभारले आहे.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

तू सर्व राजांचा राजा आणि देवमंदिराच्या कोनशिलेचा दगड आहेस. तूच पृथ्वीवरील मातीपासून मनुष्याला बनवले आहेस. त्यालाच आता येऊन वाचवण्याची कृपा कर. 

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  १:४६-५६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

तेव्हा मरीया म्हणाली: “माझा जीव प्रभुला धन्यवाद देतो. आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात, त्याच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची दाणादाण केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनांस उंच केले आहे. त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांस रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इसरायल ह्याला साहाय्य केले आहे." नंतर मरीया सुमारे तीन महिने अलीशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
हन्नाने परमेश्वराकडे याचना केली व परमेश्वराने तिला पुत्ररत्न दिले. त्याचे नाव शमुवेल. ह्या शमुवेलाच्या देणगीबद्दल हन्ना परमेश्वराचे आभार मानत आहे. आणि शमुवेलाला परमेश्वरासाठी वाहत आहे. पापांवर विजय मिळविण्यासाठी, अंधकारावर मात करण्यासाठी, जगाच्या प्रकाश प्रभूयेशू खिस्ताचा जन्म झाला. त्या येशूच्या जन्मासाठी देवाने पवित्र मरियेची निवड केली म्हणून पवित्र मरिया परमेश्वराचे आभारस्तवन करीत आहे. देवपुत्राची माता होण्याचा सन्मान तिला मिळाला होता. परंतु भविष्यात येणाऱ्या अनेक दुःखाची तिला जाणीव होती तरीदेखील ती देवाला दिलेल्या होकारापासून मागे फिरली नाही कारण ती भक्तिमान होती. देवावर तिची श्रद्धा होती. परमेश्वराचे सामर्थ्य आणि त्याच्या न्यायीपणाबद्दल तिला कल्पणा होती. देवपुत्र येईल तो पापीजनांचा नाश करून, दीनदुबळ्यांचे तारण करील यावर तिचा विश्वास होता. पवित्र मरिया सांगत आहे जे त्याचे भय धरितात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असेल. ती सर्वांना ईश्वरचरणी नम्र होऊन प्रार्थना व स्तवन करण्यासाठी आवाहन करीत आहे.

प्रार्थना -  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या गौरवासाठी व इतरांच्या भल्यासाठी आम्ही आमच्या हातांचा उपयोग करावा यासाठी आम्हास प्रेरणा दे, आमेन.

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या