“ ह्याचे नाव योहान ठेवावयाचे आहे.”
✝️
पहिले वाचन : मलाखी ३:१-४,४:५-६
वाचक : शमुवेल या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, "पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो, ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पाहा, करार घेऊन येणाऱ्या संदेष्ट्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल?"
"कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परिटाच्या खारासारखा आहे. रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजाला शुद्ध करील, त्याला सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा आणि येरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल."
पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुम्हांकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीला शापाने ताडन करावे असे न होवो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २५:४-५,८-१,१०.१४
प्रतिसाद : तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.
१) हे प्रभो, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर, तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव, मला वळण लाव, कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.
२) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे! तो पापीजनांना सन्मार्गाने चालायला शिकवतो. नम्र लोकांना न्यायपरायणता दाखवतो. गरिबांना आपला मार्ग प्रकट करतो.
३) परमेश्वराच्या कराराचे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांना प्रभूचे सर्व मार्ग प्रेमपूर्ण आणि विश्वसनीय आहेत. त्याचे भय धरणाऱ्यांशी प्रभूचे सख्य असते. तो आपला करार त्यांना प्रकट करतो.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे इम्मानुएल, आमच्या राजा आणि न्यायाधीशा. हे प्रभो परमेश्वरा, ये आणि आमचे तारण कर.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १:५७-६६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी ते बाळकाची सुंता करायला आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, "ते नको; ह्याचे नाव योहान ठेवावयाचे आहे." ते तिला म्हणाले, "ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून, “ह्याचे नाव योहान आहे" असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरुन त्यांच्याभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंत:करणात ठेवून म्हटले, "हा बाळक होणार तरी कोण ?" कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
✝️

0 टिप्पण्या