Marathi Bible Reading | Feast of St. Henry Morse | Monday 1st February 2021

सामान्य काळ 

सोमवार 

१ फेब्रुवारी  २०२१

प्रभूयेशूच्या नावात आणि त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. प्रभूयेशूचे सामर्थ्य आपल्याला सर्व  प्रकारच्या दुष्ट बंधनातून मुक्त करू शकते.  प्रभूयेशू जो आपला सर्वांचा मुक्तीदाता, तारणदाता व जीवनदाता आहे.  सर्व प्रकारची दुःखे, संकटे, आजार, यातना व मृत्युचा ग्रंथकर्ता असलेला व दुष्ट आत्म्यांचा राज्यकर्ता असलेल्या सैतानाचा आपण धिक्कार करु या. प्रभू येशूच्या चरणी आपले सर्वस्व समर्पित करु या.

प्रभूयेशू देवपुत्र होता आणि त्याच्या दैवी सामर्थ्यासमोर त्या अशुद्ध आत्म्याचे काहिंच चालले नाही. 'प्रभू येशू परात्पर देवाचा पुत्र आहे अशी कबुली त्या अशुध्द आत्म्याने दिली. विशेष म्हणजे तो प्रभूयेशूच्या पाया पडून विनवणी करू लागला की, 'मला छळू नकोस'. मात्र प्रभूयेशू ने आपल्या अधिकारयुक्त वाणीने त्या माणसातील सैन्यधारी अशुध्द आत्म्यांना पिटाळून लावले. तो बरा झाल्यावर सर्वत्र त्याने प्रभू येशूची सुवार्ता पसरविली. 
आपल्याला सर्व प्रकारच्या अनीष्टापासून प्रभू येशूने बंधमुक्त  केले आहे. त्याच्या कृपेने आपण जीवन जगत आहोत. विश्वासात वाढत राहून आपण आपल्या जीवनाद्वारे प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी प्रेरणा मागू या. 
  
✝️

"प्रभूने तुझ्यासाठी 

केवढी मोठी कामे केली 

आणि तुझ्यावर कशी दया 

केली हे त्यांना सांग."

✝️

पहिले वाचन :इब्री  - ११:३२-४०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

मी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल आणि संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्याद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहांची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तरवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्याची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने आणि कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची आणि शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून आणि जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.
ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना
अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३१:२०,२१,२२,२३,२४

प्रतिसाद :  अहो, परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिंमत धरा.

१) प्रभो, तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे.

२) तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहांपासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.

३) परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले.

४) मी तर अधीर होऊन म्हणालो, "मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे." तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला.

५) अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो, परंतु तो गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे; 

सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.

आलेलूया !


शुभवर्तमान : मार्क ५:१-२०

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

     येशू आणि त्याचे शिष्य समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरस्तानातून निघून त्याला भेटला. तो कबरस्तानात राहत असे आणि त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्याला पुष्कळवेळा बेड्यांनी आणि साखळदंडांनी बाधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी, रात्रंदिवस, कबरस्तानामध्ये आणि डोंगरांमध्ये राहून ओरडत असे आणि दगडांधोंड्यांनी आपले अंग ठेचून काढत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला, त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, "हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ  घालतो, मला छळू नकोस." कारण येशू त्याला म्हणत होता, "अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ." येशूने त्याला विचारले "तुझे नाव काय?" त्याने उत्तर दिले, "माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहो" आम्हांला ह्या देशातून घालवू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली, "आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला लावून दे." मग त्याने त्यांना परवानगी दिली, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले, तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि पाण्यात गुदमरून मेला.

डुकरे राखणारे पळाले आणि त्यांनी गावात आणि शेतांमळ्यात हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्याकरिता लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी, भूतग्रस्ताला काय झाले ते आणि डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, त्याला म्हटले, "तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग." तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करु लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : भूतग्रस्त माणसाला पाहून येशूला दया आली. येशूने त्याला त्या दयनीय अवस्थेतून बरे केले. कुटुंबात व समाजात सन्मानाने जगण्यासाठी त्याला पाठवले. आपणासाठी सुद्धा प्रभू येशूने अनेक महान कृत्ये केली आहेत. त्या सर्वाची कृतज्ञ मनाने आठवण करावी. शब्दाने व कृतीने ईश्वराचा महिमा गाण्यात धन्यता मानावी जुने ते सर्व बाजूला सारून नवीन जीवन जगण्यास सुरुवात करावी.

प्रार्थना : - हे प्रभू येशू, आमच्या जीवनाचा ताबा घे, आमच्यामध्ये जे अशुद्ध आहे ते घालवून टाक व आम्हाला तुझे विश्वासु  अनुयायी बनव, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या