Marathi Bible Reading | Feast of St. Paul the Apostle | Monday | 25th January 2021

सामान्य काळ 

सोमवार 

२५ जानेवारी २०२१ 

(संत पौलाचे परिवर्तन)


  ख्रिस्तसभेतील सुवार्तिकांचा छळ करणारा, पुरुष व स्त्रियांना बांधून तुरुंगात टाकणारा, अनेकांना देहांताची शिक्षा फर्माविणारा शौल यरुशलेमेस चालला असताना दिमिष्काजवळ भर दुपारी जमिनीवर कोसळला. दिव्य प्रकाशाने त्याला अंध बनवले. शौलाला साक्षात्कार झाला आणि त्याचे परिवर्तन झाले. 
संत पौलाने आद्य ख्रिस्तसभेतील तेरा मंडळीना लिहिलेल्या पत्राद्वारे प्रभावी ख्रिस्ताची शिकवण दिली आहे. ख्रिस्त प्रेमाने प्रेरित झालेल्या पौलाने ख्रिस्तमंडळीचे जणू पालन पोषण केले. 
    परमेश्वर  जगाच्या दृष्टीने पापी, भ्रष्ट किंवा देवाला न मानणाऱ्यांना सुद्धा देव त्याच्या कार्यासाठी निवडतो. ख्रिस्तसभेच्या इतिहासात अशा अनेक माणसांचे जीवन परिवर्तन होऊन त्यांनी आपल्या शब्दाने व आचरणाने सुवार्तेची साक्ष जगाला दिली आहे.
संत पौलने अनेक पत्रे लिहून आपल्या ख्रिस्तमंडळ्यांना मार्गदर्शन केले. ख्रिस्तासाठी त्याला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. उपासमार, दगडमार, छळ, अपमान, तुरूंगवास, अशा अनेक अपेष्टांना त्याला सामोरे जावे लागले. आजारी अवस्थेत त्याला लूक हा परराष्ट्रीय वैद्य भेटला. त्याचेही त्याने मनपरिवर्तन केले. अनेसिम नावाच्या गुलामाची भेट तुरूंगातच झाली. त्याच्या सुटकेसाठी त्याने अनेसिमचा मालक फिलेमोन ह्या ख्रिस्ती व्यक्तीला तुरूंगातून पत्र लिहिले. पौलचा इ. स. ६७ साली निरो राजांच्या कारकीर्दीत शिरच्छेद करण्यात आला.

आज ख्रिस्त येशू आपल्या सर्वांना त्याची देवराज्याची सुवार्ता  इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवाहन करीत आहे. 
✝️
"सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवात्तेची घोषणा करा." 

✝️

पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २२:३-१६

वाचक :  प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

पौल लोकांना म्हणाला, "मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळालं आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहा तसा मीही होतो. पुरुष आणि स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्तशिक्षा देऊनसुध्दा मी ह्या पंथाचा पाठलाग केला, त्याविषयी प्रमुख याजक आणि सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनांना पत्रे घेऊन दिमिष्क येथे चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून येरुशलेममध्ये शासन करण्यास आणावे.

"जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि 'शौल, शौल, माझा छळ का करतोस?' अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, 'प्रभुजी, तू कोण आहेस ?' त्याने मला म्हटले, 'ज्या नाझरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.' तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, 'प्रभुजी, मी काय करावे ?' प्रभूने मला म्हटले, 'उठून दिमिष्कात जा, मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वाविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.' त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.

"मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला आणि जवळ उभा राहून मला म्हणाला, 'शौलभाऊ, इकडे पाहा.' तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, 'आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस ? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :११७:१,२

प्रतिसाद : सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 

१.         आलेलुया !

            अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, 

            साऱ्या मानवांनो, त्याचे गुणगान गा.

२.         त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे, 

            प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

प्रभू म्हणतो,

मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क  १६:१५-१८ 

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

          येशूने आपल्या शिष्यांना म्हटले,"सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास करणाऱ्या बरोबर ही चिन्हे असतील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही, त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आज ख्रिस्तसभा पौलाच्या परिवर्तनाचा सण साजरा करीत आहे. हा प्रसंग ख्रिस्तसभेच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा आहे. पौलाचे परिवर्तन त्याचा ख़िस्तसभेमध्ये नवा जन्म आहे. हा प्रसंग त्याचा देवाशी सखोल आणि पूर्ण ऐक्याचा प्रसंग आहे. त्यामध्ये पौल येशूला दमास्कसच्या वाटेवर भेटल्यावर तो पूर्णपणे बदलून नवी निर्मिती बनतो. संत पौलानुसार परिवर्तन म्हणजे देवाला ओळखणे, त्याच्याशी विश्वासू असणे आणि येशूबरोबर ऐक्यात राहणे. संत पौल म्हणतो. जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. (गलतीकरांस २:२०). एक कट्टर यहूदी येशूचा प्रेषित बनला. आपल्याला परिवर्तनाची गरज आहे का? निश्चितपणे आपल्याला गरज आहे! परिवर्तन म्हणजे आध्यात्मिक आणि आनंदी, आशादायक अनुभव आहे. ख्रिस्ती जीवनात नेहमी सुधारणा करण्याची संधी असते आणि चांगल्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वाकडून उत्तम ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.

प्रार्थना : प्रभू येशू, तुझी तारणदायी कृपा अनुभवून तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी आम्हाला प्रेरणा व योग्य ती कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या