Marathi Bible Reading | Feast of St. Timothy & Titus |Tuesday | 26th January 2021

 सामान्य काळ 

मंगळवार 

२६ जानेवारी २०२१ 

(भारताचा प्रजासत्ताक दिन)

(संत तीमोथी  व तीथ )



सर्व नातेसंबंधांच्या पलिकडची व महत्वाची पातळी म्हणजे आध्यात्मिक नात्याची आहे. जिथे माणसे परस्परातील संबंध देवाबरोबर जोडतात. देव, ईश्वर, परमेश्वर सर्वांचा केंद्रबिंदू बनतो व देवाठायी सर्वजण आध्यात्मिक संबंधाने जोडले जातात. 
 देवाची आज्ञा पाळणे, त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करणे व त्याची वाणी ऐकणे हे देवाबरोबरचे महान नाते आहे. 
प्रभू येशूला भावनिक व जागतिक पातळीवर आणणाऱ्यांना येशूने स्पष्ट केले की, देवाची इच्छा व त्यानुसार आचारण करणे हे आध्यात्मिकेची उंची गाठणारे नाते आहे. आपले देवाबरोबरचे आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांबरोबरचे नाते संबंध आध्यात्मिक पातळीवरचे असणे गरजेचे आहे . ती आपण ह्या  वाचनाद्वारे चिंतन करून आपली आध्यात्मिकता उंच करू या. 
✝️
"जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच  माझी बहीण आणि तीच माझी आई." 

✝️

पहिले वाचन :इब्री - १०:१-१०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन १०:१-१०

पुढे होणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते नियमशास्त्र प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना  पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय ? बैलाचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे.  

म्हणून ख्रिस्त जगात येतेवेळेस म्हणाला,

"यज्ञ आणि अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले; होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पण आणि तुला संतोष नव्हता." ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, 'तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.' 

वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अन्नार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची तुला इच्छा नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" आणि मग तो म्हणाला, “पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे." ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहे .

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :४०:२,४,७,८,१०,११

प्रतिसाद : हे माझ्या देवा, पाहा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.

१.  मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले.

२.  यज्ञपशू आणि अन्नार्पण यात तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापाबद्दलचे अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, "पाहा, मी आलो आहे."

३.   महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही हे तू जाणतोस. 

४.  मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही, परंतु तुझी दया आणि सत्यता प्रकट केली. महामंडळापासून तुझे वात्सल्य आणि तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही.

जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंत:करणे उघड.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क  ३:३१-३५

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

          येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपले शोध करीत आहेत.' त्याने त्यांना उत्तर दिले "कोण माझी आई आणि माझे भाऊ?" मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, "पाहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, माझी बहीण, माझी आई. ह्याद्वारे येशू आपल्याला त्याची आई मरिया हिची महानता दाखवत आहे. येशूच्या शिकवणुकी नुसार देवाची इच्छा प्रमाण मानून आज्ञाधारक राहणे आवश्यक आहे. पवित्र मरिया येशूची जन्मदाती आई आहे म्हणून ती महान नाही तर ती देवाच्या इच्छेप्रती विश्वासू आहे आणि आजीवन तिने बांधिलकी ठेवली म्हणून ती महान आहे. हे आहेत माझे आई आणि माझे भाऊ'. येशू आपल्या श्रोत्यांना जाणीव करून देतो की, तुम्ही केवळ माझे अनुयायी नाहीत तर तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मला असे वाटते का? मी येशूच्या कुटुंबाचा सभासद आहे.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून आध्यात्मिकतेत वाढण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या