सामान्य काळ
बुधवार
२७ जानेवारी २०२१
पहिले वाचन :इब्री - १०:११-१८
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयास कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पूण हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो, तो म्हणतो,
परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो नेहमी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन," आणखी तो म्हणाला, "त्यांची पापे आणि त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणार नाही."
तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचे राहिले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :११०:१-४
प्रतिसाद : मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस
१ परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणतो: "तू माझ्या उजवीकडे बैस, मी तुझ्या वैऱ्याना तुझे पदासन करीन."
२ परमेश्वर तुझा राजदंड सियोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.
३ तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडीत झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.
४ परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो ती बदलणार नाही. ती अशी:"मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतश्चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्याद्वारे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
शुभवर्तमान
मार्क ४:१-२०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू समुद्रकिनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांस दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला : ऐका! एक पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले आणि त्याला पीक आले आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले." मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको."
तो एकान्ती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, "देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये आणि त्यांना क्षमा मिळू नये." तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय?" तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोकांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकताच लोक ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्याकडे मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले बी म्हणजे लोक ते वचन ऐकून घेतात आणि नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह आणि इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनांची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकून लोक ते स्वीकारतात; मग कोणी ते तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात."
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या