पहिले वाचन :इब्री - १०:१९-२५
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
बंधुजनहो, येशूने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने पवित्रस्थानात त्याच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले आणि निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंत:करणाने आणि विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. ज्या आशेविषयी आपण सांगत असतो तिच्याशी आपण न डळमळता दृढ़ राहू या, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करायला एकमेकांना प्रवृत्त कसे करता येईल ह्याकडे लक्ष देऊ या. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो बोध अधिक करावा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : २४:१-६
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत.
१) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग आणि त्यात राहणारे सारे लोक परमेश्वराचे आहेत. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले.
२) परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल ? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ? ज्या माणसाचे हात निर्मळ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो निरर्थक वस्तूंची अभिलाषा बाळगत नाही तो.
३) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो बक्षीसपात्र ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत, हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
शुभवर्तमान
मार्क ४:२१-२५
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना ? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकावयास कान आहेत तर तो ऐको." पुन्हा तो त्यांना म्हणाला, "तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्यामापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्यांच्यापासून काढून घेतले जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या