पहिले वाचन :इब्री - १०:३२-३९
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
पूर्वीचे दिवस आठवा. त्यावेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झगडलात. कधी विटंबना आणि संकटे सोसल्याने लोकांत तुमची अवहेलना झाली; तर कधी इतरांना अशी वागणूक मिळाली तेव्हा त्यात तुम्हांलाही सहभागी व्हावे लागले. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वत:ची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे आणि ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. ह्यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करुन घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे.
"कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही; माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही."
परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ३७:३-४,५-६,२३-२४,३९-४०
प्रतिसाद : नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते.
१) जर तू परमेश्वरावर भाव ठेवशील आणि सदाचाराने वागशील, तर तू या देशात निवास करशील आणि सुरक्षित राहशील. जर तू परमेश्वराच्या ठायी आपले मन रमवशील, तर तो तुझे मनोरथ पूर्ण करील.
२) आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हाच्या सूर्याप्रमाणे उघड करील.
३) परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.
४) नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते, संकटसमयी तोच त्याचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना साहाय्य करतो, त्यांना मुक्त करतो आणि त्यांचे तारण करतो: कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
देवाने आपणांला सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
शुभवर्तमान
मार्क ४:२६-३४
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलीच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. परमेश्वराचे राज्य असे आहे." आणखी तो म्हणाला, "आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडाझुडपांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते." असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्यासमोर बोलत नसे, तथापि एकान्ती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या