सामान्य काळातील ३रा रविवार
"पश्चात्ताप करा आणि सुवार्ता वर विश्वास ठेवा."
✝️
पहिले वाचन :योना ३:१-५.१०
वाचक : योना या पुस्तकातून घेतलेले वाचन ३:१-५.१०
परमेश्वराचे वचन योनाला दुसऱ्यांदा प्राप्त झाले ते असे: "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा आणि मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग." तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते, ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला, "चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल!" तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली; त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणपाट नेसले.
देवाने त्यांचे वर्तन पाहिले, अर्थात ते आपल्या कुमा्गापासून वळले आहेत हे जाणले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी त्याला अनुताप झाला आणि त्याने त्यांच्यावर ते अरिष्ट आणले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :२४:४-५,६-७,८-९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव
१) हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सन्मार्गाने मला चालव, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.
२) हे परमेश्वरा, तू पुरातन काळापासून दाखवलेली आपली करुणा आणि वात्सल्य आठव. हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.
३) परमेश्वरा उत्तम आणि सरळ आहे. तो चुकलेल्यांस सन्मार्ग दाखवतो, तो नम्र जनांस न्यायपथाला लावतो, तो दीनांस आपला मार्ग शिकवतो.
दुसरे वाचन :पौल ७:२९-३१
वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, "काळाचा संक्षेप करण्यात आला आहे; की, ज्याला पत्नी आहे त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे. जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे. कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
देवाचे राज्य जवळ आले आहे; सुवार्तेवर विश्वास ठेवा.
शुभवर्तमान
मार्क १:१४-२०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या सुवार्तेची घोषणा करीत गालिलात आला आणि म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा."
नंतर गालील समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशु म्हणाला, "माझ्या मागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल असे मी करीन. " मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या