Marathi Bible Reading | Saturday | St. Merentiyana | 23rd January 2021

     सामान्य काळातील २रा सप्ताह   

शनिवार  
२३ जानेवारी २०२१
(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

संत मेरेन्टियाना 
( कुमारिका,  रक्तसाक्षी  )


ख्रिस्ती जीवन हे विचारपूर्वक आणि देवाच्या सहवासात राहून समर्पित  बांधिलकीने जगायचे आहे. ख्रिस्ती माणसाच्या प्रत्येक कृतिचा उगम प्रार्थनेतून होतो . प्रार्थना म्हणजे साधी कृती नसून देवाशी तन-मन-धनाने एकरूप व एकचित्त होऊन देवाबरोबर संवाद साधने होय 
    -आपले संपूर्ण मन, हृदय आणि आंतरिक इच्छे बरोबर देवाच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर झाला  तरच आपण देवाच्या पवित्र पर्वतावर आरोहण करु शकतो. जिंवत देवावर आपली वैयक्तिक श्रद्धा असणे महत्वाचे आहे.  
आपण आज देवाबरोबरचे व ख्रिस्ताबरोबर असलेले आपले वैयक्तिक नाते तपासून पाहू या. प्रार्थना, मनन-चिंतन व आंतरिक साधनेद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ येऊन पवित्रतेचे व शुद्धतेचे खरे जीवन जगण्यासाठी वाचनाद्वारे प्रेरणा मागू या.     
✝️

"त्याला वेड लागले आहे, असे येशूच्या आप्तांचे म्हणणे होते."

✝️

पहिले वाचन : इब्री ९:२-३.११-१४

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन  

        पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दीपवृक्ष, मेज आणि समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटले आहे आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही असा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे आणि वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वत:ला देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषकरून शुद्ध करील?

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : ४७:२-३,६-९

प्रतिसाद : आनंद जयघोष होत असता देव वर गेला आहे.

) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा. कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे, तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२)  आनंद जयघोष होत असता देव वर गेला आहे. काचा आवाज होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.

३)  देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा, देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क  ३:२०-२१ 

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

येशू घरी आला. तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, त्यांना जेवायलाही सवड होईना. हे पाहून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण "त्याला वेड लागले आहे "असे त्याचे म्हणणे होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : नाझरेथ येथील आपला सुताराचा व्यवसाय व आपले घर सोडून येशू सर्वत्र सुवात्तेची घोषणा करीत फिरू लागला. तो वैराग्याचे जीवन जगू लागला. त्याला डोकं ठेवायला जागा नव्हती. शास्त्री, परूशी आणि कट्टरवादी प्रवृत्तीचे पुढारी यांच्याबरोबर येशू वादविवाद करतो. त्याने देवाच्या राज्यासाठी आपल्या स्वःरक्षेची पर्वा केली नाही. येशूने पत्करलेला धोका पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित होत कारण त्यांच्यानुसार सूज्ञ माणूस असा धोका पत्करणार नाही. मी देवाच्या राज्यासाठी धोका पत्करायला तयार आहे का? मी येशूला प्राधान्य देतो का? मी माझ्या सोयीस्कर वातावरणात अडकलो आहे का?

प्रार्थना :हे प्रभू येशू, आम्हाला तुझ्या शांतिने व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी, भरलेले जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या