Marathi Bible Reading | Friday | St. Vincent De Paloti | 22nd January 2021

सामान्य काळातील २रा सप्ताह 

शुक्रवार 

२२ जानेवारी २०२१ 

(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) 

(१८ ते २५ जानेवारी)



संत व्हिन्सेंट पालोटी 
( वार्तनसाक्षी  )
         पाचारण ही दैवी हाक असते. येशूच्या सहवासात राहून त्याची अनुकंपा अनुभवल्यावरच आरोग्यदानाचा ( Healing ) व इतर देणग्यांचा  कृपा व आशीर्वाद प्राप्त होत असतो. सखोल ज्ञान व अनुभव प्राप्त झाल्यावरच देवाचा शब्द घोषित करता येतो. आज प्रभू येशू आपल्या सर्वांना त्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी पाचारण करीत आहे. त्याने त्याचा शिष्या प्रमाणे आपली सुद्धा त्याचे कार्य करण्यासाठी निवडीले  आहे त्यासाठी वाचनाद्वारे आपली आंतरिक तयारी करूया .  
✝️

"ज्यांनी आपले साथीदार व्हावे अशी येशूची इच्छा होती त्यांना येशूने आपल्याकडे बोलावले."

✝️

पहिले वाचन : इब्री ८:६-१३

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन  

        तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. आता ज्या कराराचा मध्यस्थ येशु आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. 

लोकांना दोष लावून तो म्हणतो: "परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे आणि यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;

मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.

परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: "मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा 'परमेश्वराला ओळखा,' असे प्रत्येकजण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येकजण आपल्या बंधूला शिकवणार नाही; कारण त्यातील लहानांपासून थोरांपर्यंत, ते सर्व मला ओळखतील.

कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे आणि ते जुने आणि जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : ८५:८,१०-१४

प्रतिसाद : दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत.

१) हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे आणि आम्हाला मुक्तिदान दे त्याचे भय धरणाऱ्यांना तारण समीप असते आणि आमच्या देशात त्याचे वैभव नांदेल.

२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत, नीती आणि शांती ह्यांनी एकमेकींना आलिंगन दिले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे.

३) परमेश्वर आमची भरभराट करील आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल आणि शांती त्याच्या पावलांचे अनुकरण करील.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क ३:१३-१९

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करावयास त्यांस पाठवावे, यासाठी त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली; शिमोन याला त्याने पेत्र हे उपनाव दिले; जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांस बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; आंद्रेया, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्कार्योत.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात संत मार्क आपल्याला सांगतो की, येशू आपल्या पसंतीप्रमाणे शिष्यांची निवड करतो. ही सर्व माणसे येशूशी संलग्न झाली. येशूचे पाचारण स्वीकारत असताना शिष्य कुठल्याही प्रकारे आढेवेढे घेत नाहीत. मोजाव्या लागणाऱ्या किमतीची पर्वा न करता, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता पाचारणाला होकार देतात. येशूचे सहकारी होऊन, सुवार्ता प्रचार करून, अशुद्ध आत्म्यांच्या बंधनांतून लोकांना मुक्त करण्याचे ख्रिस्ताचे मिशन पुढे नेण्यासाठी येशूने शिष्यांना निवडले होते. ख्रिस्ती म्हणून येशूचे शिष्य होऊन त्याचे मिशनकार्य पुढे चालू ठेवण्याचे आपल्याला पाचारण आहे. आपण येशूबरोबर वेळ घालवतो का? येशूला आपल्या जीवनात प्रथम स्थान आहे का? येशूचे मिशन पुढे नेण्याच्या कार्याविषयी आपण गंभीर आहोत का?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी दैवी हाक ऐकून तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता  पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या