Marathi Bible Reading | Thursday | St. Agnes | 21st January 2021

   सामान्य काळातील २रा सप्ताह   

गुरुवार 
२१ जानेवारी २०२१
(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

रोमची संत  आग्नेस 
( कुमारिका व रक्तसाक्षी )

"तुम्ही आपली तरवार कदाचित माझ्या रक्ताने कलंकित करून घ्याल. परंतु ख्रिस्ताला अर्पण करण्यात आलेल्या माझ्या पवित्र देहाला तुमच्या वासनामय स्पर्शाने तुम्ही कंलकित करू शकणार नाहीत."- संत आग्नेस.

         आपले केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक किंवा अध्यात्मिक स्तरावरील संतुलन बिघडले तर आपण आजारी पडू शकतो. आजारावर उपचार असतो मात्र वैद्यकशास्त्र किंवा मानसशास्त्र आजार बरा करू शकत नाही तर शरीरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक व अद्भूत शक्तीला उत्तेजन देत| असतात. प्रभू येशू पुष्कळ रोग्यांना बरे करतो. प्रभू येशूच्या वचनात आरोग्यदान आहे, व त्याचा गुणकारी आध्यात्मिक स्पर्श अनुभवण्यासाठी आपण त्याच्या सहवासात जाणे गरजेचे आहे. दृढश्रद्धेने आणि शरणागत होऊन जर आपण त्याची भक्ती व आराधना केली तर प्रभू येशूचा स्पर्श आपल्या प्रत्येकाला जाणवले.जगात आज अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक आजारांनी अनेक माणसे त्रस्त आहेत. त्यांनी पश्चाताप करून आपले सर्वस्व येशूला समर्पित  करावे म्हणून आजच्या आपल्या प्रार्थनेत सर्वांची आठवण करू या.

✝️
"अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा ते  त्याच्या पाया पडून म्हणत, "तू देवाचा पुत्र आहेस." तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, "मला प्रकट करू नका."

✝️

पहिले वाचन : इब्री  :२५-८:१-६

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

        येशूद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास तो समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सर्वदा जिवंत आहे.

असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते: तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वत:च्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वत:ला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते.

    सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभुने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने आणि यज्ञ अपवयास नेमलेला असतो. म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत. "पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी  ठेव," मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी ही आज्ञा मिळाली, तसे तेही जे स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप आणि छाया आहे त्याची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४०:७-८अ,८ब-९,१०,१७

प्रतिसाद : पाहा, परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे.

१)  यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही, पण ऐकायला तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापांबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो की, पाहा, मी आलो आहे!

२) प्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे.हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. 

३) महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही, हे तू जाणतोस.

४) तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद आणि उल्हास पावोत. तुझे मुक्तिदान प्रिय मानणारे, "प्रभू थोर आहे," असे सदैव म्हणोत.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क ३:७-१२

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

      येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय त्याच्या मागोमाग निघाला. जी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून यहुदिया, येरुशलेम, इदोम, आणि यार्देनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर आणि सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यातून मोठा समुदाय, त्याच्याकडे आला. त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पीडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरुन जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले; जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा ते  त्याच्या पाया पडून म्हणत, "तू देवाचा पुत्र आहेस." तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, "मला प्रकट करू नका."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजचे शुभवर्तमान वाचणाऱ्याला असे जाणवत होते की संपूर्ण जग येशूजवळ येत आहे. मोठा जनसमुदाय येशूच्या मागे येत होता. गर्दीमध्ये आपण चिरडले जाऊ शकतो हे माहीत असतानासुद्धा येशू त्यांच्या मध्ये जातो. त्यांच्या अस्वस्थतेमध्ये ते येशूकडे आले. काहीजण बराच काळ आजारी होते. येशू त्यांना बरे करतो. येशू त्यांना अडवत नाही तर त्याला स्पर्श करण्याची अनुमती देतो. कारण त्याला स्पर्श करणारे बरे होत होते. आपण आपल्या पाळकीय कार्यापासून दूर राहू शकतो का? नक्कीच नाही! ते आपले पाचारण आहे. कोरोना महामारीमुळे आपण सुरक्षित अंतर ठेवतो. येशू सारखे आपण एक ख्रिस्तसभा म्हणून सामाजिक कार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे, देवाची दया कृतीत उतरविणे आवश्यक आहे. ख्रिस्तसभा म्हणून आपण गरिबांप्रती प्रेमळ होऊन, जे दुःख सहन करीत आहोत, उपेक्षित आहेत त्यांच्याप्रती दानशूरता प्रकट करून देवाच्या राज्याकडे आपली वाटचाल करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. लक्षात असू द्या, देवाचे राज्य आपल्या पावलांच्या गतीने आपल्यापर्यंत येत असते.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, आमच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घे आणि आम्हास सर्व  प्रकारच्या आजारांपासून मुक्त कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या