Marathi Bible Reading | Wednesday | St. Febiyan & St. Sebastian | 20th January 2021

  सामान्य काळातील २रा सप्ताह   

बुधवार 
२० जानेवारी २०२१
(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)



संत  फेबियन
संत सेबेस्टीयन
(रक्तसाक्षी)

"जो आत्मा ख्रिस्ताच्या जवळ जाण्यास धडपडत असतात त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सैतान आपली संपूर्ण शक्ती पणाला लावीत असतो. अशा आत्म्यांना पुन्हा देवाकडे आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमाबद्दल आपण मुळीच कुरकूर करू नये. "- संत सेबेस्टीयन

        स्वत:ला धर्माचे रक्षक आणि धर्मपंडित समजणाऱ्या परुश्यांसमोर प्रभू येशूने चमत्कार केला. शब्बाथाच्या नियमापेक्षा देवाला माणूस व त्याचे जीवन  प्रिय आणि महत्वाचे आहेत. नियमांमुळे माणसाचे जीवन सुरक्षित बनते, समाजाला शिस्त लागते व नियमामुळे समाज प्रगतिशिल बनतो, मात्र केवळ आंधळेपणाने पाळलेले नियम माणसाचा जीव घेऊ शकतात व समाजाला घातक ठरु शकतात. देव प्रेमळ आहे. इतरांचे हीत करण्यात व त्यांना दया दाखविण्यातच खरी धार्मिकता आहे,

देवाने म्हटले आहे, 'मला दया पाहिजे यज्ञ नको' (मार्क ९:१३). म्हणजेच देव नियम आणि कर्मकांडापेक्षा दयेला व करुणेला अधिक महत्व देतो.  प्रभू येशूने हीच दयावंत व करुणावंत परमेश्वराची प्रतिमा स्वत: आपल्यासमोर  उभी केली आहे. ख्रिस्ती माणसाने ख्रिस्ताचे अनुकरण करुन आपल्या शब्दाने व कृतीने गरजवंतांवर दया दाखवली पाहिजे. 

✝️
"शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे?" 

✝️

पहिले वाचन : इब्री ७:१-३,१५-१७

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

     मलकीसदेक, शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक होता. आब्राहाम जेव्हा राजास ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला आणि आब्राहामने त्याला सर्व लुटीचा दशांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची मातापितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्यने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितलेले ते अधिकच स्पष्ट होते. कारण त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, "तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४

प्रतिसाद :मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.

१) माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो : "मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस."

२) परमेश्वर तुझा राजदंड सियोनातून पुढे नेईल; तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.

३) तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.

४) परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. "मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल..

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क ३:१-६

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

      येशु सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, "असा पुढे ये.' मग तो त्यांना म्हणाला, "शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे?" पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले, "हात लांब कर." त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुशी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा ह्याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : परुशांच्या मते धर्म म्हणजे विधीचे साजरीकरण, नियम आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे. त्यांच्या दृष्टीने येशूने ह्या नियम आणि कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे तो पापी आणि वाईट मनुष्य आहे अशी त्यांची खात्री पटली होती. एखाद्या खिस्ती माणसाला वाटते, धर्म म्हणजे बायबलवाचन करणे, देवळात जाणे, जेवणाअगोदर प्रार्थना करणे, रोझरी करणे, सर्व बाह्य गोष्टींची पूर्तता करणे, परंतु गरजवंताकडे दुर्लक्ष करणे, जगातील लोकांच्या अश्रृंकडे न पाहणे म्हणजेच धर्माचरण. येशूसाठी धर्म म्हणजे सेवा. देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणून बाह्य योग्यतेची अपेक्षा नसून अंतःकरणाच्या परिस्थितीची आवश्यकता आहे. हे देवा, तू आमच्या अंतःकरणातील विचार आणि कल्पना जाणतोस, म्हणून जे तुझ्यापासून नाही त्यातून मला मुक्त कर व शुद्ध कर.

प्रार्थना :हे दयावंत प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दयेवर विसंबून राहण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या