Marathi Bible Reading | St.Paul the Hermit | 15th January 2021

    

सामान्यकाळातील पहिला सप्ताह

शुक्रवार   

१५ जानेवारी २०२१
 प्रथम मठवासी-संत पौल
(वर्तनसाक्षी)

आपल्या सर्वाना प्रभू येशूच्या कृपेची, दयेची व क्षमेची गरज आहे.
पक्षघात हा शारीरिक आजार आहे व त्यामुळे माणसाची दयनीय ! परिस्थिती होत असते. शरीराची एक संपूर्ण बाजू कार्यहिन बनते. तसेच जीवनातील पापांमुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्या आजारी होतो, अशावेळी ! येशूची वाणी कानी पडण्याची गरज आहे, ती म्हणजे, 'मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मात्र त्यासाठी पश्चातापी अंत:करणाने पापांचा स्वीकार करुन कबुली देण्यासाठी पाप निवेदन म्हणजेच कुमसार करणे गरजेचे आहे. आपले अनेक आजार आणि दु:खे क्षमा न मिळाल्यामुळे जास्त बळावत असतात. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने प्रायश्चित संस्कार प्रस्थापित केलेला आहे.  प्रभू येशू वरील श्रद्धेद्वारे देव पित्याकडून क्षमेचे कृपादान मिळत असते. आपण ह्या वाचनाद्वारे प्रभूचा स्पर्श मागुया. 

✝️

     "मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे."

✝️

पहिले वाचन :  इब्री  :१-५:११

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन ४:१-५:११

    प्रभूच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे, ह्यामुळे तुम्हांतील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्यांची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि, "त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. असे ज्या विसाव्याविषयी त्याने सांगितलेले आहे त्यात, आपण विश्वास ठेवला आहे व आपण प्रवेश करीत आहो. "सातव्या दिवशी असे एका ठिकाणी त्याने म्हटले, देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला" आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे,

"हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत." 

त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. तर त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७७:३-४,६-७,८

प्रतिसाद : देवाची कृत्ये विसरु नयेत.

१.ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या त्या गोष्टी आम्ही त्याच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.

२.पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या,त्या आपल्या मुलांस कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे.त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरु नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्या.

३.त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी आणि बंडखोर स्वभावाची पिढी, आपली अंत:करणे नीट न राखणारी आणि देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.


जयघोष

आलेलूया,आलेलूया !

हे परमेश्वरा, तुझ्या नियमाने चालण्यास मला शिकव ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मार्क २: १-१२

वाचक :   मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

      येशू पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की, दारात देखील त्यांना जागा होईना, तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." कित्येक शास्त्री तेथे बसले होते, त्यांच्या मनात असा विचार आला, "हा असे का बोलतो ? हा दुर्भाषण करतो. एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ?" ते स्वत:शी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, "तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता ? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,' असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा 'ऊठ, आपली बाज उचलून चाल' असे म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, "मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा." मग तो उठला आणि लगेच आपली बाज उचलून सर्वांच्यादेखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले आणि देवाचा गौरव करीत म्हणाले, "आम्ही असे कधीच पाहिले नव्हते!"

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
मत्तय, मार्क आणि लूक हे तिन्ही शुभवर्तमानकार अर्धांगवायू झालेल्या माणसाची गोष्ट वर्णन करतात. येशू ह्या माणसाला बरे करतो आणि त्याच्या पापांची क्षमा करतो. त्याला घेऊन येणारे त्याच्याविषयी चिंतित होते आणि हे सर्व त्यांनी घेतलेल्या त्रासातून दिसून येते. त्यांनी ज्याप्रकारे त्याला खाली उतरविण्यासाठी त्रास घेतला तो दर्शवितो की, त्यांना त्याची काळजी होती आणि येशूने त्याला बरे करावे अशी त्यांची इच्छा होती. त्याचा आजार ही समाजाची चिंता होती. येशूने त्याला बरे करून निरोगी आणि सक्षम असा माणूस त्याच्या समाजाला दिला. कोरोनाच्या महामारीत आपल्या समाजातील लोक दुःख सोशीत होते. सर्वत्र शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक दुःख होते. मी ह्या लोकांपर्यंत पोहोचलो का? माझ्या मार्गातले अडथळे मी दूर केले का ? त्या अर्धांगवायू माणसाला वाहणाऱ्या लोकांकडून प्रेरित होऊन त्यांच्यासारखी श्रद्धा आणि दृढनिश्चय करण्याची सुबुद्धी आपल्याला लाभावी हीच प्रार्थना.

प्रार्थना :  दयाळू परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर, मला सशक्त बनव आणि तुझी आरोग्यदायी कृपा बहाल कर आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या