Marathi Bible Reading | St. Joseph Vaz | 16th January 2021

     

सामान्यकाळातील पहिला सप्ताह

शनिवार    
१६ जानेवारी २०२१

सेंट जोसेफ वाझ
(वर्तनसाक्षी)
प्रभू येशूच्या केवळ एका हाकेने जकातदार लेवीला पाचारण मिळाले.
पापी समजला जाणारा लेवी ख्रिस्ताच्या एका हाकेने पार बदलला  त्याने येशूचे शिष्यत्व स्वीकारले. प्रभू येशूला माणसाच्या जीवनातील योग्यता  व अयोग्यता सर्व ठावूक आहे. कोण कसा आहे व कोणास कशाची गरज आहे  हे तो जाणतो म्हणूनच तो म्हणतो 'मी नीतिमानांस नव्हे तर पाप्यांस  बोलवावयास आलो आहे.   देवाचे वचन ग्रहण करुन प्रभू येशूच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे जीवन पूर्णपणे बदलू शकते.
प्रभू आपल्या प्रत्येकाला बोलावून सांगत असतो, 'माझ्या मागे ये."  आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूने देवाची सुवार्ता सांगण्यास पाचारण केलेले आहे. आपली तयारी  झालेली आहे का?
✝️

     "मी नीतिमानांस नव्हे तर पापी जनांस  बोलवावयास आलो आहे."

✝️

पहिले वाचन :  इब्री  :१-१६

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातले विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्यांच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रकट केलेले आहे.

तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर स्वीकारला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलता विषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही. तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहीला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र

प्रतिसाद :१८:८,९,१०,१५

प्रतिसाद स्तोत्र

प्रतिसाद : प्रभो, तुझी वचने ही आत्मा आणि जीवन अशी आहेत.

१ परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहेत, ते मनाचे पुनरुज्जीवन करते, परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो साध्याभोळ्यांस शहाणपण देतो.

२ परमेश्वराचे नियम सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.

३ परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.

४ हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत.


जयघोष

आलेलूया,आलेलूया !

तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मार्क २: १३-१७

वाचक :   मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू तेथून निघून समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला, तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला तेव्हा त्याने त्याला म्हटले, "माझ्यामागे ये," तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.

नंतर तो त्याच्या घरी जेवावयास बसला. तेथे बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीत बसले. तेव्हा त्याला जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याच्या शिष्यांना म्हटले, "हा जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
मत्तय हा जकातदार म्हणून लोकांच्या पैशांशी व्यवहार करीत होता. भ्रष्टाचारामुळे जकातदार श्रीमंती अनुभवित होते. यहूदी लोक जकातदारांचा द्वेष करीत होते. हाच दृष्टिकोन आजच्या शुभवर्तमानात पहायला मिळतो. जेथे परूशी येशूच्या शिष्यांना प्रश्न करतात, 'तुमचे गुरू जकातदारांबरोबर का जेवतात?' येशूने मत्तयमध्ये तो जो आहे ते पाहिले नाही तर तो जे बनू शकतो ते पाहिले. मानवी स्वभावाच्या परिवर्तनावर येशूची श्रद्धा होती. मत्तयला जकातदार म्हणून वैश्विक द्वेषाला सामोरे जावे लागे पण येशूने त्याच्यामध्ये चांगुलपणाचा सागर पाहिला. परिणामी पैशाचा हिशोब लिहिणारा प्रेमाचा शुभवर्तमानकार झाला, जकातदार प्रेषित झाला. एक महान पापी एक महान संत झाला. देव पापाचा द्वेष करतो पण पाप्यांवर प्रेम करतो. देव आपल्याला विनाअट आणि जसे आहोत तसे स्वीकारतो असा आपला विश्वास आहे का?

प्रार्थना :हे प्रभू येशु, तुझी हाक ऐकण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन  आचरण करण्यास मला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या