Marathi Bible Reading | Ordinary Second Sunday | 17th January 2021

      

 सामान्य काळातील २रा रविवार  

१७ जानेवारी २०२१

शमुवेलावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. तो बालक असतानाच देवाच्या मंदिरात आणि देवाच्या सहवासात होता. गुरुजींच्या आज्ञेत  राहून शमुवेलाने देवाचे कोणतेही वचन वाया जाऊ दिले नाही. शमुवेलाला देव सापडला . 
 आंद्रेयला व  शिमोनाला  'मशीहा सांपडला.' देवाचा अंत:करणापासून शोध केल्याने देव सापडतो, मात्र त्यासाठी त्याच्या सहवासात जाण्याची गरज असते. येशूचा हा सहवास त्याच्या प्रत्येक वचनातून व विशेषत: पवित्र संस्कारातून आपल्याला अनुभवायचा आहे. तरच मशीहा  (तारणारा) येशू आपल्याला सापडेल.
आपण आज  देवाच्या वचनात  वाढत व  देवाच्या आज्ञेन राहून आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगून आपण येशूचा शोध घेऊ .  येशू आपल्याला जरूर सापडणार आहे .  पवित्र ख्रिस्तशरीर संस्कारातील प्रभू येशूचा सहवास आपण अनुभवू या आणि  त्याला,सर्वस्वी शरण जाऊ या.



✝️
"हे पाहा, देवाचे कोकरू ! मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे."

✝️

पहिले वाचन : १ शमुवेल  ३:३-१०,१९

वाचक :  शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

    देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे झोपला होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली, "शमुवेल! शमुवेल!" तो म्हणाला, "काय आज्ञा?" मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, "काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली ?" पण एली म्हणाला, "मी नाही हाक मारली, परत जाऊन झोप." त्यावरून तो परत जाऊन झोपला. पुन्हा परमेश्वराने "शमुवेल!" अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, "काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. ?" पण तो म्हणाला, "मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन झोप." अद्यापि शमुवेलला परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्याला झाला नव्हता. परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, "काय आज्ञा ? तुम्ही मला हाक मारली." परमेश्वर त्या बालकास हाक मारीत आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमुवेलला म्हणाला, "जाऊन झोप आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, “हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे." मग शमुवेल जाऊन आपल्या जागी झोपला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे, "शमुवेल! शमुवेल! अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, "बोल, तुझा दास ऐकत आहे." शमुवेल वाढत गेला, परमेश्वर त्याच्याबरोबर असे आणि त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४०:२.४अब,७-८अ,८ब-९, १०

प्रतिसाद : हे परमेश्वरा, हा बघ मी आलो! मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. 

१) मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले.

२) यज्ञपशू आणि अन्ना्र्पण  ह्यात तुला संतोष नाही, तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापांबद्दल, तू अर्पण मागत नाहीस. ह्यावरून मी म्हणालो, "पाहा, मी आलो आहे.'

३) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.

४) महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


दुसरे वाचन      

करिंथ ६:१३-१५.१७-२०

पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

        शरीर जारकर्मासाठी नाही, तर ते प्रभूसाठी आहे आणि त्या शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांला ठाऊक नाही काय ? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत. जारकर्माच्या प्रंसगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वत:चे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलले आहा. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो;

कारण केवळ बाळकांना तू स्वर्गराज्याची रहस्ये प्रकट केली.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 योहान १:३५-४२

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:३५-४२ 

        योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू !" त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशुच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, "तुम्ही काय शोधता?" ते त्याला म्हणाले "रब्बी "(म्हणजे गुरुजी), "आपण कोठे राहता ?" तो त्यांना म्हणाला, "या म्हणजे पाहाल," मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले आणि त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. योहानचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे ते दोघेजण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्रचा भाऊ आंद्रेया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, "मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे."त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्यत्व पत्करायचे म्हणजे जीवनात तीन प्रकारचा मूलभूत बदल करायचा हे आजच्या वाचनातून आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहे. 
१) बालिशपणाकडून परिपक्वतेकडे : शमुवेल हा कोवळा बालक होता. परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे. हे त्याला समजत नव्हते. अशा बालिशपणाकडून परिपक्वतेकडे प्रवास करायचा असेल तर आपल्या जीवनात एलीसारखा परिपक्व, अनुभवी आणि ज्ञानी आध्यात्मिक सल्लागार असणे गरजेचे असते. एलीने शमुवेलला जे मार्गदर्शन केले त्यात दोन गोष्टी दडलेल्या होत्या : ख्रिस्ताचा शिष्य व्हायचे असेल तर शांततेत त्याची वाणी ऐकायची तयारी ठेवावी आणि दासाचे स्वरूप धारण करावे. म्हणूनच शमुवेल बोलला : 'प्रभो, बोल, तुझा दास ऐकत आहे. 
२) शरीराकडून आत्म्याकडेः ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जीवन जगायचे असेल तर आपल्याला शारीरिक गरजांपेक्षा आध्यात्मिक गरजांविषयी अधिक आस्था वाटायला हवी असे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगतो. इथे शारीरिक म्हणजे केवळ शरीरासंबंधी नव्हे तर जागतिक, भौतिक, नाशवंत आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या गोष्टी होत. त्यांच्यामध्ये रममाण होणारा मनुष्य खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचा शिष्य बनू शकत नाही. 
३) लोकांताकडून एकांताकडेः आजव्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ताचे दोन शिष्य येशूच्या मागे जातात. त्यांना येशूची जीवनशैली जाणून घ्यायची होती. येशू त्यांना एकांतात घेऊन जातो. ते त्याच्या येथे राहिले. इथे राहणे साठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आलेला आहे (मेनेई) तोच 'फाटा वेलात राहिल्यावाचून फळ देऊ शकत नाही ह्या वचनात वापरण्यात आलेला आहे. याचाच अर्थ ख्रिस्ताचा शिष्य बनायचे म्हणजे त्याच्याबरोबर एकांतात राहण्याची तयारी ठेवायची आणि तशी आवड धरायची. ते दोन शिष्य नंतर लोकांतात जातात आणि विपुल फळ धारण करतात. 
आत्मपरीक्षण : शमुवेल त्याप्रमाणे परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी एकांतात जाण्याची, आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्याची आणि शारीरिक गरजांपेक्षा आध्यात्मिक गरजा भागविण्याची तरतूद मी कशाप्रकारे करतो ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास व शांती प्रीतिने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या