Marathi Bible Reading | Monday | St. Emily de Vialar | 18th January 2021

सामान्य काळातील २रा सप्ताह   

१८ जानेवारी २०२१
(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

 परंपरावादी परुश्यांना प्रभू येशू नव्या द्राक्षरसाचे महत्त्व शुभवर्तमानात पटवून देत आहे,  आपल्याला जशी शारीरिक भूक लागते तशीच आध्यात्मिक भूक लागणे गरजेचे आहे. आपल्या हृदयामध्ये तशी भूक असतेच ती म्हणजे देवाला पाहण्याची व देवाबरोबर हितगुज करण्याची. म्हणून तर स्तोत्रकार म्हणतो, 'हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन,  (स्तोत्र ६ ३:१).  देवाचा ध्यास लागण्यासाठी त्याच्या आंतरिक सहवासाची गरज आहे.  आपल्याला जर प्रभू येशूच्या सहवासात यायचे असेल तर आपल्या वाईट सवयी, दुष्ट प्रवृत्ती, स्वार्थीपणा आणि जे जे प्रभू येशूपासून आपल्याला दूर ठेवते अशा सर्वांचा त्याग किंवा उपवास करु या. अगदी क्षुल्लक गोष्टींचा उदा.  टी.व्ही. पाहणे, उगाच कोणास दुखवणे वगैरे गोष्टींचा आपण त्याग करुन प्रार्थनेला प्राधान्य देऊन देवाची वचने ऐकुया.


संत एमिली डी वियालार 

✝️
“वहाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? 

✝️

पहिले वाचन : इब्री ५:१-१०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन ५:१-१०

प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यातून घेतलेला असून देवाविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमलेला असतो; त्याने दाने आणि पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी आणि बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलता वेष्टिलेला आहे आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याचप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वत:ला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले. "तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे," त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो,

"मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."

आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करीत आणि अश्रू गाळीत प्रार्थना आणि विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला आणि त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४

प्रतिसाद :  मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.

१ माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो: "तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस."

२ परमेश्वर तुझा राजदंड सियोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, आपल्या शत्रूंवर प्रभूत्व कर.

३ तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरूण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.

४ परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो ती बदलणार नाही. "मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 मार्क २:१८-२२

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २:१८-२२ 

      एके दिवशी योहानचे शिष्य आणि परुशी उपास करीत होते, तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले, “योहानचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्यांचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वहाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? त्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, त्यांच्यापासून वर काढून घेतला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोऱ्या कपडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, लावले तर धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो आणि बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यात घालतात."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आपल्या जनसेवा कार्यात प्रभू येशू आपली उपस्थिती ही वर आणि लग्नसोहळा या तुलनेद्वारे करतो. हा वराबरोबर आनंद करण्याचा काळ आहे. यहूदी धर्मामध्ये प्रायश्चित्ताचा दिवस हा उपवासाचा बंधनकारक दिवस असे. आठवड्याचे दोन दिवस म्हणजे सोमवार आणि गुरुवार ह्या दोन दिवशी कट्टर धारणा असलेले यहूदी उपवास करीत असत. येशू उपवासाच्या विरोधात नाही. सैतानाने येशूला मोह घालण्याअगोदर येशूने अरण्यामध्ये चाळीस दिवस उपवास व प्रार्थना केली. लोकांनी पहावे म्हणून परूशी उपवास करीत असत. देवाने त्यांच्या धार्मिकतेकडे पहावे ही त्यांची अपेक्षा होती. येशूचा शोध आणि येशूची सोबत ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. हे प्रभो, आम्हाला उपवासाचे सत्य व जीवनाचा आनंद शिकविल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी मला त्याग व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या