Marathi Bible Reading | 5th Week of Lent 23rd March 2021

उपवास काळातील


पाचवा सप्ताह 


मंगळवार  


२३ मार्च २०२१



✝️

"जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो मी आहे "

✝️


संत तुरिबियुस डी मोग्रोवेजो

महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१६०६)

"वेळेवर आपले नियंत्रण नाही. मात्र वेळेचा वापर आपण कसा केला त्याचा हिशेब आपल्याला द्यावा लागेल."-संत तुरिबियुस

✝️

  जुन्या करारात  इस्त्रायली जनतेला देवाने फारोच्या  गुलामगीरीतून सोडविले. देवाविरूध्द कुरकूर करीत असलेल्या जनतेला शिक्षा भोगावी लागली, मात्र त्याच बरोबर देवाच्या करुणेचा अनुभव त्यांना आला. 
 प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याविषयी आणि स्वत:च्या दुःखसहनाविषयी सांगत असताना यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. तो पित्याच्या इच्छेप्रमाणे मानव जातीचे तारणकरावयास आला होता. प्रभू येशूने पिता परमेश्वराच्याच इच्छेप्रमाणे स्वर्गराज्याची शिकवण दिली. पिता परमेश्वर सतत त्याच्या बरोबर होता. 
 आजही प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे बसून आम्हासाठी मध्यस्थी करित आहे.  त्याने आम्हासाठी दिलेली देवाची वचने स्वर्गराज्याच्या दिशेने मार्ग दाखविणारी आहेत.  आपण कुठलीही  शंका मनात न बाळगता प्रभू येशूच्या शिकवणूकी प्रमाणे आचरण करू या कारण  प्रभू येशू सतत पित्याच्या संपर्कात राहून आम्हासाठी प्रार्थना करीत आहे. ! आपण प्रभू येशूला अपेक्षित असे आपले जीवन शुध्द आणि पवित्र ठेऊ या.

✝️

पहिले वाचन :  गणना  २१:४-९
वाचक गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन 

होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागले "तुम्ही आम्हांला इजिप्त देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले ? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो." तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्याच्या दंशाने इस्राएलतील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर." तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, "आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला; तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०२:२-३,१६-२१

प्रतिसाद प्रभो, माझी प्रार्थना ऐक.

१) प्रभो, माझी प्रार्थना ऐक माझी हाक तुला ऐकू येवो. संकटकाळी तुझा चेहरा माझ्या नजरेआड होऊ देऊ नकोस. माझ्याकडे लक्ष दे; मी तुझा धावा करीन त्या दिवशी मला लवकर उत्तर दें.

२) राष्ट्रांना प्रभू नावाचा धाक वाटेल. भूतलावरील राजांना तुझ्या ऐश्वर्याची धास्ती बसेल; प्रभू सियोन पुन्हा उभारील, तेव्हा तो आपल्या ऐश्वर्यासह प्रकट होईल. निराश्रितांच्या प्रार्थनेकडे तो लक्ष देतो;त्याची याचना तो धुडकावून लावीत नाही. 

३) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, म्हणजे पुढे जन्माला येणारे प्रभूचे स्तवन करतील; कारण उंचावरील आपल्या पवित्रस्थळावरून प्रभूने डोकावले.त्याने स्वर्गातून पृथ्वीकडे नजर टाकली; बंदीजनांचे कण्हणे ऐकून त्याला मरणाच्या दाढेत पडलेल्यांची सुटका करायची होती.

जयघोष 

प्रभू म्हणतो, "मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील"


शुभवर्तमान योहान ८:१-११

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशू परुशी लोकांना म्हणाला, "मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही." ह्यावर यहुदी म्हणाले, "मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही." असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही ना? तो त्यांना म्हणाला, "तुम्ही खालचे आहे, मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. ह्यामुळे मी तुम्हांस सांगितले की, तुम्ही आपल्या पापात मराल; कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न  धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. ह्यावरून ते त्याला म्हणाले. तुम्ही कोण आहा ?" येशू त्यांना म्हणाला, "पहिल्यापासून तुम्हांला मी जे सांगत आहे ते हेच नाही का? मला तुम्हांविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो." तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्याला समजले नाही. ह्यास्तव येशूने त्यांना म्हटले “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडले ते मी सर्वदा करतो." तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : जुन्या करारात देव माणसांशी बोलत असे. पुढे संदेष्ट्यकरवी त्याने येशूविषयीची ६०० भाकिते वर्तविली. त्याही पुढे स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवून त्याचे मुख बनून तो सातत्याने लोकांशी बोलू लागला. येशू स्वतःहून म्हणतो जे काही मी करतो, जे बोलतो ते सर्वकाही मला इथे पाठविणाऱ्या पित्याचे बोल आहेत. यावरून आपणांस कळून येते की, परमेश्वराला आपल्या लेकरांबरोबर कायम संवाद करायला आवडतो. अशासाठी की, त्यांनी मोहाला (सैतानाला) बळी पडून पापामध्ये अडकू नये. देवाच्या कृपेत राहिल्यामुळे सर्व मनुष्यांचे तारण व्हावे. सर्व पापीजनांचे आत्मे देवाच्या दयेत भिजून निघावेत व शुद्ध व्हावेत. येशूला क्रुसावर खिळून जिवे मारण्यात आले. यापेक्षा त्याला जे खांबावर उंचावण्यात आले त्याद्वारे जगात पुनरुत्थान आले व सैतानाचा अडसर (धोंड) दूर सारून तारणाचा मार्ग येशूने मोकळा केला.

प्रार्थना : प्रभू येशू, आमच्या जीवन पथावरील मार्गदर्शका, आमच्या प्रभो, तुझ्या सहवासाचा अनुभव घेऊन तो इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या