✝️
देवाचे प्रेम महान सागरासारखे आहे, व तो आपल्या पापांबद्दल क्षमादान देऊन आपल्याला त्याच्या कृपापूर्ण प्रेमाचा अनुभव देत असतो. परमेश्वर हाच मुक्तिदाता आहे. अशा प्रकार आजच्या पहिल्या वाचनात डॅनिएल संदेष्टा आपल्याला संदेश देत आहे.
आजच्या शुभवर्तमानात व्यभिचारी स्त्रिला यहुदी नियमाप्रमाणे चव्हाट्यावर आणून दगडाने मारुन ठार करण्याची देहांत शिक्षा करण्याच्या तयारीत असताना येशू तिथे हजर होतो. अनेक वयस्कर आणि अनुभवी व्यक्ता त्या ठिकाणी हजर असतात. सर्वांनी हातात दगड उचलले असताना येशू म्हणतो, 'तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.' प्रभू येशूचे हे शब्द ऐकताच हजर असलेल्या प्रत्येकाच्या हातातील दगड खाली पडले. प्रत्येक व्यक्ती पापत पडते. परंतु नम्रतेने त्या पापाचा स्वीकार करण्यास धजत नाही. स्वत:पेक्षा इतरांची पापे आपणास जास्त वाटत असतात. आपण स्वतः पापी असताना इतरांचे दोष काढीत असतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताने व्यभिचारी स्त्रिला समाजकंटकांच्या पंजातून सोडवून मुक्तीचे वरदान प्राप्त करुन दिले.
परमेश्वर प्रेमळ आहे, त्याच्या सानिध्यात जाणाऱ्यांना व पश्चातापी अंत:करणाने क्षमेची याचना करणाऱ्यांना तो जवळ करतो. पश्चातापाच्या प्रत्येक अश्रूचा प्रभूला कळवळा आहे. म्हणूनच तो म्हणतो, 'जा, यापुढे पाप करु नको.'
पहिले वाचन : दानिएल १३:१-९,१५-१७,१९-३०,३३-६२
वाचक : दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
जोकीम नावाचा एक मनुष्य बाबिलोनमध्ये राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुसन्ना होते. ती हिलकियाची मुलगी होती. ती अत्यंत सुंदर व प्रभूभक्त होती. तिचे आईवडील सज्जन होते. त्यांनी मोशेच्या आज्ञांप्रमाणे तिला शिक्षण दिले होते. जोकीम फार श्रीमंत होता. त्याच्या घराला लागूनच त्याचा भव्य असा बगीचा होता. यहुदी लोक त्याच्याकडे भेटीला येत असत. तो त्याच्यातला अधिक प्रतिष्ठित असा होता. त्या वर्षी लोकांमधून दोन वडीलजन न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यांच्याविषयी प्रभूने असे म्हटले होती, "बाबिलोनमध्ये या नेत्यांपासून अधर्म सुरू झाला. ते न्यायाधीश होते परंतु जनतेचे राज्य सांभाळण्याचे ढोंग करीत होते." ही माणसे पुष्कळ वेळा जोकीमच्या घरी असत व ज्यांच्या फिर्यादी होत्या. ते तेथे त्याच्याकडे येत. जेव्हा लोक दुपारी निघून जात तेव्हा सुस्ना आपल्या पतीच्या बागेत फिरायला जात असे. ते दोघे वडीलजन तिला रोज बागेत इकडे तिकडे फिरताना पाहात असत. त्यांना तिच्या सहवासाची इच्छा होऊ झाली. त्याचे मन इतके विकृत झाले की, त्यांनी स्वर्गाकडील आपली दृष्टी फिरवून नैतिकतेचे सर्व नियम झुगारून दिले.
ते योग्य संधीची वाटच पाहत होते; तोच असे झाले की, सुसन्ना दोन नोकराणींबरोबर आपल्या सवयीप्रमाणे बागेत गेली त्या दिवशी फार गरम होत होते. म्हणून तिला आंघोळ घ्यावीशी वाटली. त्या दोन वडीलजनांशिवाय तिकडे कोणीही नव्हते. ते लपून तिच्याकडे पाहात होते. तिने आपल्या नोकराणींना सांगितले, “माझ्यासाठी तेल आणि सुगंधी द्रव्ये आणा आणि बागेचे फाटक बंद करा म्हणजे मला आंघोळ करता येईल.'
नोकराणी बाहेर जाताच ते दोघे वडीलजन उठून सुसन्नाच्या जवळ धावत गेले आणि तिला म्हणाले, "पहा, फाटकाचा दरवाजा बंद आहे; कोणीही आपल्याला पाहत नाही; आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत; आमच्याबरोबर प्रणय कर. नाहीतर तुझ्या विरुद्ध आम्ही अशी साक्ष देऊ की, कोणी युवक तुझ्याबरोबर होता आणि म्हणून तू आपल्या नोकराणींना बाहेर पाठवलेस."
सुसन्नाने उसासा टाकून म्हटले, "मला कोणताच मार्ग दिसत नाही. जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले तर मी प्राणदंडास योग्य ठरेन; जर मी नकार दिला तर तुमच्या तावडीतून सुटणार नाही. तरी देखील परमेश्वरासमोर पाप करण्यापेक्षा तुमच्या तावडीत निर्दोषी सापडणे मी पसंत करीन."
त्यानंतर सुसन्ना मोठ्या आवाजात ओरडू लागली, परंतु ते दोघे वडीलजन तिच्या विरुद्ध ओरडू लागले. त्यांच्यापैकी एकाने धावत जावून बागेचे फाटक उघडले. त्यावेळी घरातल्या नोकरवर्गाने बागेत ओरडण्याचा आवाज ऐकला, आणि सुसन्नाला काय झाले हे पाहण्यासाठी ते धावत आले व बाजूच्या दरवाजाने बागेत गेले. जेव्हा वडीलजनांनी आपली हकिकत सांगितली, तेव्हा नोकरांना मोठा धक्का बसला; कारण सुसन्नावर अशा प्रकारचा आरोप कधीच कुणी केला नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व लोक तिचा पती जोकीम याचेकडे एकत्र जमले तेव्हा ज्या दोन दुष्ट वडीलजनांनी सुसत्राला प्राणदंड देण्याचे कुभांड रचले होते, ते तेथे आले आणि त्यांनी लोकांसमोर सांगितले, "हिलकियाची मुलगी, जोकीमची पत्नी सुसन्नाला बोलावून आणा.” लोकांनी तिला बोलावून आणले. ती आपले आई-वडील, आपली मुले तसेच आपले सर्व आप्तजन यांच्या समवेत तेथे आली. तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार व जेवढयांनी तिला पाहिले होते ते सर्वच्या सर्व रडत होते. त्या दोन वडीलजनांनी सभेमध्ये उभे राहून तिच्या डोक्यावर आपले हात ठेवले. ती रडत स्वर्गाकडे पाहत राहिली. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. वडीलजनांनी सांगितले, "जेव्हा आम्ही एकटेच बागेत फिरत होतो, तेव्हा ही दोन नोकराणींबरोबर बागेत आली; हिने बागेचे फाटक बंद केले आणि नोकराणींना बाहेर पाठवले. तेव्हा लपून राहिलेला एक तरुण जवळ येऊन तिच्याबरोबर झोपला. आम्ही बागेच्या एका कोपऱ्यातून हे पाप पाहून धावत त्याच्याजवळ गेलो आणि आम्ही दोघांना प्रणय करताना पाहिले. आम्ही त्या तरुणाला पकडू शकलो नाही, कारण तो आमच्याहून बलवान होता; बागेचे फाटक उघडून तो पळून गेला. आम्ही हिला पकडले व विचारले की, तो युवक कोण आहे ? परंतु तिने त्याचे नाव सांगायचे नाकारले. आम्ही या गोष्टींना साक्षी आहोत." सभेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण ते लोकांचे नेते आणि न्यायाधीश होते.
(लोकांनी सुसन्नाला प्राणदंडाची शिक्षा फर्मावली. यावर सुसन्नाने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, "हे शाश्वत परमेश्वरा, तू सर्व रहस्ये आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी जाणून असतोस; तू जाणतोस की, यांनी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. यांनी ज्या वाईट गोष्टींचा माझ्यावर आरोप केला आहे. त्यातली एकदेखील खरी नाही! तरीही मला मरणे भाग आहे.'
परमेश्वराने तिचा आक्रोश ऐकला. जेव्हा लोक तिला प्राणदंडासाठी नेत होते, तेव्हा परमेश्वराने दानिएल नावाच्या तरुणात एक दिव्य प्रेरणा उत्पन्न केली. तो ओरडून सांगू लागला, मी हिच्या रक्ताबद्दल दोषी नाही."
यावर सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, "तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे ?" त्याने त्यांच्याकडे उभे राहून म्हटले "हे इस्राएली लोकांनो, तुमची बुद्धी कोठे आहे ? तुम्ही चौकशी न करता आणि संपूर्ण माहिती न मिळवता इस्राएलच्या मुलीचा वध का करत आहात ? तुम्ही सर्व न्यायालयात परत जा. कारण ह्यांनी हिच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे."
यावर लोक लगेच माघारी फिरले आणि वडीलजनांनी दानिएलला सांगितले, "या, आमच्यामध्ये बसा आणि आपली माहिती द्या, कारण परमेश्वराने आपल्याला अधिकार प्रदान केला आहे." दानिएलने त्यांना उत्तर दिले, "या दोघांना एकदुसऱ्यापासून अलग करा आणि मग मी यांची चौकशी करीन.” दोघांना वेगळे केले गेले, तेव्हा दानिएलने एकाला बोलावून म्हटले, "अधर्म करून तुझे केस पिकले, आता तुला 44 जुन्या पापांचा दंड मिळणार आहे. तू निर्दोषी लोकांना दंडपात्र ठरवून व दोषी लोकांना निर्दोष सोडून खोटा न्याय देत होतास; प्रभूने तर म्हटले आहे, तुम्ही निर्दोष आणि धार्मिकांना प्राणदंड देऊ नका. जर तू तिला पाहिले, तर मला सांग की, कोणत्या झाडाखाली दोघांना तू एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "बाभुळाच्या झाडाखाली." दानिएल म्हणाला, “ठीक आहे! एवढे मोठे खोटे सांगून तू आपले प्राण गमावून बसला आहेस, कारण परमेश्वराच्या दुताला परमेश्वराकडून असा आदेश मिळाला आहे की, त्याने त्वरित तुझे दोन तुकडे करावेत."
नंतर दानिएलने त्याला घेऊन जाण्याची आज्ञा केली व दुसऱ्याला बोलवायला सांगितले आणि त्याला म्हटले, "तू यहुदाचा नव्हे तर कनानची संतती आहेस. सौंदर्याने तुला पतभ्रष्ट केले आणि वासनेने तुझे हृदय दूषित झाले आहे. तुम्ही लोक इस्राएलच्या मुलींबरोबर अशा प्रकारचे व्यवहार करीत होते आणि त्या भीतीने तुमची इच्छा मान्य करीत होत्या; परंतु ही यहुदाची मुलगी आहे, तिने अधर्माच्या समोर आपली मान वाकवली नाही. तर मला सांग तू कुठल्या वृक्षाखाली दोघांना एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "ओकच्या झाडाखाली" यावर दानिएल म्हणाला, "ठीक आहे ! तू पण एवढे मोठे खोटे बोलून आपला जीव गमावला आहेस, परमेश्वराचा दूत हातात तरवार घेऊन तुझी वाट पहात आहे; तो तुझे दोन तुकडे करील आणि तुम्हा दोघांचा सर्वनाश करील."
तेव्हा सर्व लोक मोठ्या आवाजात जयजयकार करून परमेश्वराला धन्यवाद देऊ लागले की, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचे तो संरक्षण करतो. दानिएलने त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांतूनच त्या दोन वडीलजनांची साक्ष खोटी ठरवून दाखवली. लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे त्या दोन दुष्टांना दंड केला, तो दंड ते आपल्या शेजाऱ्याला देऊ इच्छित होते .लोकांनी दोघांना मृत्युदंड दिला. अशाप्रकारे त्या दिवशी निर्दोषी सुसन्नाचा बचाव झाला.
0 टिप्पण्या