सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५०:३-४,१२-१३
प्रतिसाद :हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय उत्पन्न कर.
१) हे देवा, तू आपल्या निष्ठावंत प्रेमास अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक; माझ्या पापापासून मला स्वच्छ कर.
२) हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्यामध्ये स्थिर आत्मा पुन्हा घाल. तू मला आपणापुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस.
३) तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. आणि तुझ्या उद्धारात उत्सुकतेने स्थिर राहण्यास मला प्रेरणा दे; म्हणजे मी अपराध्यांना तुझा मार्ग शिकवीन. आणि पापी लोक तुझ्याकडे वळतील.
दुसरे वाचन : इब्री ५:१७-२१
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
येशूला मरणातून तारायला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत येशूने प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा कर्ता झाला.
हा प्रभूचा शब्द आहे
जयघोष
प्रभु म्हणतो, "माझी सेवा करू इच्छिणाऱ्याने मला अनुसरावे; म्हणजे मी जेथे आहे तेथे माझा सेवकही असेल."
शुभवर्तमान योहान १२:२०-३३
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालिलातील बेथर्सैदाकर फिलीप ह्यांच्याजवळ येऊन विनंती केली की, "महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे." फिलीपने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया व फिलीप ह्यांनी येऊन येशूला सांगितले, येशूने त्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील ."
आता माझा जीव व्याकूळ झाला आहे. मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर? मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाला गौरवीत कर.” तेव्हा, अशी आकाशवाणी झाली की, "मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन." तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, "मेघगर्जना झाली." दुसरे म्हणाले, "त्याच्याबरोबर देवदूत बोलला," येशूने उत्तर दिले, "ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, तेव्हा ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन." आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरता तो असे बोलला.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : करार म्हटला की त्यामध्ये दोन पक्ष आलेच. दोन माणसांमध्ये झालेल्या करारात दोन्ही पैकी कोणताही पक्ष विश्वासघात करू शकतो. मात्र परमेश्वर आणि मानव ह्यांच्यात झालेल्या करारात केवळ मानव अविश्वासूपणे वागू शकतो. प्रायश्चित्तकालात अशा ह्या कराराचे स्मरण करून आपली बाजू तपासून घ्यायची असते.
१) जुना करारः जुन्या करारात एकूण सात वेळा परमेश्वर मानवाबरोबर करार करीत असल्याचे दिसून येते. त्यात आदाम, नोहा, आब्राहाम, मोशे, दावीद, शलमोन आणि यिर्मया ह्यांच्याकरवी परमेश्वर करार करताना दिसतो. आजच्या पहिल्या वाचनात हा करार केवळ दगडी पाट्यांवर नव्हे तर माणसाच्या हृदयपटलांवर लिहिण्यात किंवा कोरण्यात आल्याचे म्हटलेले आहे.
२) नवा करारः जुन्या करारातील सातही कराराचा कळस प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने मानवाशी केलेल्या करारात गाठण्यात आलेला आहे. हा करार खुद्द येशूच्या अतिमौल्यवान रक्ताने करण्यात आलेला आहे. मानवाच्या तारणासाठी येशूने सात वेळा नव्या व शाश्वत कराराचे रक्त सांडलेः सुंतेच्या वेळी, गेथसेमाने बागेत, फटक्यांचा मार खाताना, काट्यांचा मुकूट झेलताना, क्रूस वाहताना, खिळे हातापायांत जाताना आणि मरणानंतरही भाला भोसकल्यावर. या प्रायश्चित्तकाळात त्या अतिमौल्यवान रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा मिळवू या.
३) आधुनिक करार : ख़िस्तसभेमध्ये दिल्या जाणाऱ्या साक्रामेंतांद्वारे परमेश्वर मानवाशी आजही करार करीत आहे. त्यासाठी शुभवर्तमानात गव्हाच्या दाण्याचे प्रतीक वापरण्यात आलेले आहे. त्या दाण्याप्रमाणे परेश्वराचा प्रेमकरार स्वीकारण्यासाठी पूर्णपणे त्याच्या अधीन व्हायचे असते, विपुल फळ धारण करण्यासाठी स्वत:ला विसरायचे असते, येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून जीवन जगायचे असते.
आत्मपरीक्षण : बाप्तिस्मा, दृढीकरण व ख्रिस्तशरीर ह्या साक्रामेंताद्वारे पवित्र क्य माझ्याठायी वसती करीत आहे, या ईश्वरी कराराचे कोणते परिणाम माझ्या जीवनात दिसून येतात? प्रायश्चित्त साक्रामेंताद्वारे मी या कराराचे वारंवार नूतनीकरण करतो का? सेवेच्या साक्रामेंताद्वारे (गुरुदीक्षा व लग्न) माझ्या जीवनात या कराराची कोणती फळे दिसून येतात?
मननासाठी शास्त्रवाचन : गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. मेला तर विपुल फळ देतो.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या सहवासात राहून खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा लाभो, आमेन.
0 टिप्पण्या