सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७ : २-३,९-१२
प्रतिसाद : प्रभो, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
१) हे प्रभो, माझ्या देवा, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. माझा पाठलाग करणाऱ्या सर्वांपासून माझी सुटका कर, नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील आणि कुणी मला सोडवू शकणार नाही अशा ठिकाणी नेऊन माझ्या चिंधड्या उडवतील.
२) हे प्रभो, मानवजातीचा न्यायनिवाडा करणाऱ्या देवा, माझ्या बाजूने न्याय दे; कारण मी सात्त्विक व सरळ आहे. दुष्टांची दुष्टाई नष्ट होवो ! सात्त्विकाला स्थैर्य दे; विचार व भावना पारखणारा तू न्यायपरायण देव आहेस!
३) देव माझा संरक्षक ढाल आहे, सरळ मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. देव नि:स्पृह न्यायाधीश आहे, तो मंदक्रोध आहे; दुष्टांचे तो नेहमीच पारिपत्य करतो.
जयघोष
मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
शुभवर्तमान योहान ७:४०-५२
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ७:४०-५२
लोकसमुदायातील कित्येक जण येशूचे शब्द ऐकून म्हणत होते, "हा खरोखर तो संदेष्टा आहे." कित्येक म्हणाले, "हा ख्रिस्त आहे." पण दुसरे कित्येक म्हणाले, "ख्रिस्त गालिलातून येतो का? दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलेहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही का? " ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येकजण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक व परुशी ह्याच्याकडे कामदार आले. त्यांना ते म्हणाले, “तुम्ही याला का आणले नाही?" कामदारांनी उत्तर दिले, "कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही!" त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहा का? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे." त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला, "एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते का?" त्यांनी त्याला उत्तर दिले, "तुम्हीही गालिलातले आहा का ? शोध करून पाहा, की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : नियमशास्त्राचे अवडंबर व स्तोम माजविणारे मुख्य याजक, शास्त्री परूशी व सदुकी येशूची शिकवण व वचने त्याच नियमशास्त्राच्या चौकटीत बंदिस्त करू पाहत होते. कारण केवळ मानवी बुद्धीच्या पातळीवर नियमशा्राचे मर्म व त्याची गहनता ह्याचा उलगडा ते करू शकत नव्हते. येशू देवपुत्र आहे. तो नियमशास्त्राचा स्वामी आहे, हे वास्तव केवळ द्वेषभावनेमुळे ते स्वीकारीत नव्हते, त्यामुळे येशूची शिकवण त्यांच्या तथाकथित धर्मचौकटीत सामावू शकत नव्हती. शब्बाथ माणसासाठी आहे. माणूस शब्बाथासाठी नाही हे येशूचे परखड भाष्य त्यांना रुचत नव्हते. म्हणूनच नियमशास्त्र प्रत्यक्ष कृतीने न आचरणारे शास्त्रीपरूशी येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकसमुदायाला शापित ठरवू लागले. येशूच्या देवपणाबद्दल, त्याच्या दिव्यत्वाबद्दल अनेक जण अडखळले. त्या गर्दीमध्ये त्याचे आप्तेष्ट व गावकरीदेखिल होते. मात्र परराष्ट्रीय, परके लोक येशूच्या वचनांवर विश्वास ठेवित होते त्याला देवपुत्र मानित होते. एखाद्या व्यक्तिबद्दलचे आपले मत बनविण्याआधी आपण त्याला स्वतः अनुभवण्याची तसदी घेतो का ? की प्रवाहातील दगड-गोट्याप्रमाणे आपणही वाहवत जातो?
प्रार्थना :हे प्रभू येशू, ह्या उपवासकाळात अंत:करणापासून तुझ्या आज्ञा पाळण्यास व आचरण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या