Marathi Bible Reading | 4th week of Lent Friday 19th March 2021

 उपवास काळातील


चौथा  सप्ताह 


शुक्रवार 


१९ मार्च २०२१


संत जोसेफ धन्य कुमारी मारियेचा पती 

✝️

ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरियेचा पती संत जोसेफ ह्याचा सण साजरा करीत आहे. प्रभू येशूचा पालक पिता व सांभाळकर्ता संत जोसेफ! नीतिमान आणि भक्तिमान माणूस होता. दावीद वंशात जन्मलेला जोसेफ व्यवसायाने एक साधा सुतार होता. लग्ना आधीच मरिया गर्भवती झाल्यामुळे त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र देवदुताच्या दर्शनाने त्याची शंका दूर झाली व 'प्रभूच्या दुताच्या आज्ञेप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले. '
ख्रिस्तसभेने संत जोसेफला आदर्श पती आणि आदर्श पिता म्हणून  संबोधले आहे. प्रभू येशूच्या जडण घडणीमध्ये त्याने मोलाचा वाटा उचलला. देवाने सोपविलेली तारणाऱ्याचा पिता होण्याची व धन्य कुमारी मरियेचा पती  होण्याची जबाबदारी संत जोसेफने निष्ठेने पार पाडली. पोप पायस नववे ह्यानी डिसेंबर १८७० साली संत जोसेफला 'अखिल जगभरच्या ख्रिस्तसभेचा आश्रयदाता संत म्हणून सन्मानपूर्वक घोषित केले. ' अविलाच्या संत तेरेजा ह्यांनी आपल्या संस्थेचा आश्रयदाता संत म्हणून संत जोसेफला स्थान दिले आहे.
प्रारंभापासूनच संत जोसेफविषयीची भक्ती प्रचलित होती. ही भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली. आपल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणींमध्ये आपण संत जोसेफकडे धावून जावे असे ख्रिस्तसभा आपल्याला सुचवते. विशेषतः सुखाचे मरण लाभावे म्हणून संत जोसेफचा धावा केला जातो. 
आदर्श पती व आदर्श पिता असलेल्या संत जोसेफच्या मध्यस्थीने आज सर्व कुटुंब प्रमुखांसाठी विशेष प्रार्थना करु या. 

✝️

"तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे." 

✝️

पहिले वाचन : शमुवेल ७ : ४-५. १२-१४.१६
वाचक शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वराचे वचन नाथानला प्राप्त झाले ते असे : "जा, माझा सेवक दावीद ह्यास सांग 'परमेश्वर म्हणतो : तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पूर्वजांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या पुत्राला तुझ्यामागून मी राजासनावर बसवीन आणि त्याचे राज्य बळकट करीन. तो  माझ्या नावाप्रित्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यापुढे अढळ राहील, तुझी गादी कायमची स्थापित होईल."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८८ : २-३, ४-५,२७.२९

प्रतिसाद त्याचे राजघराणे सर्वकाळ राहील.

१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.

२) "मी स्वत: निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे, तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन.

३) तो मला म्हणेल, "तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस." त्याच्यावरील माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.


दुसरे वाचन  रोमकरांस पत्र  ४ : १३. १६-१८. २२

वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

आब्राहामाचे आचरण धर्मशास्त्रानुसार होते म्हणून नव्हे, पण त्याच्या श्रध्देमुळे तो नीतिमान ठरला म्हणून, सारे जग त्याचेच होईल असे अभिवचन त्याला व त्याच्या वंशजांना देण्यात आले होते. 

तेव्हा आब्राहामाच्या साऱ्या वंशजांना म्हणजे केवळ धर्मशास्त्राप्रमाणे वागवणाऱ्यांनाच नव्हे पण आब्राहामाप्रमाणे ज्यांची श्रध्दा आहे, त्यांनाही - हे वचन मेहेरबानीदाखल खात्रीने मिळावे म्हणून ते श्रध्देवर आधारलेले आहे, कारण आब्राहाम आपणा सर्वांचा पिता आहे. त्याच्याविषयी धर्मशास्त्रात लिहिले आहे, "मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे." जो मृतांना जिवंत करतो व अस्तित्वात नसेल ते आपल्या आज्ञेसरशी अस्तित्वात आणतो, अशा देवावर त्याची श्रध्दा होती. आब्राहामाने श्रध्दा ठेवली, आशेचा किरण नसताना आशा बाळगली, म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला ! त्याच्याविषयी सांगण्यात आले होते, "इतके तुझे वंशज होतील !" म्हणून ते "त्याला नीतिमत्व असे गणण्यात आहे."

हा प्रभूचा शब्द आहे

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष 

आलेलुया, आलेलुया!

हे प्रभो, तुझ्या मंदिरात राहणारे किती धन्य आहेत ! ते निरंतर तुझी स्तुती गातात.

आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय :१६,१८-२१,२४

वाचक :संत मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. 
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला : त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाड्.निश्चय झालेला होता. पण त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपला वाड्.निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीदच्या पुत्रा, योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे." मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलचा भरवसा. धर्मशास्त्राच्या प्रकाशात शाश्वत सुखाकडे जाणारा राजमार्ग श्रद्धेच्या दारातून जातो. त्याच श्रद्धेच्या कमानीवर परमेश्वराच्या अभिवचनांचे व मानवी आशेचे तोरण बांधलेले असते. म्हणूनच संत पौल धर्मशास्त्रापेक्षा श्रद्धेला प्राधान्यक्रम देतो. एखाद्या कुणाकडे देवाप्रती निस्सीम व अढळ श्रद्धा आहे परंतु धर्मशास्राबद्दलचे ज्ञान नाही तरीही तो देवाच्या दृष्टीने उजवा आहे. या उलट धर्मशास्त्र मुखोद्गत असणाऱ्या अश्रद्ध ज्ञानवंताचा परमेश्वर अव्हेर करतो. माणसाच्या अंतःकरणात श्रद्धाच नसेल तर त्याचे सर्व प्रयत्न परमेश्वरापुढे व्यर्थ आहेत. निराशेच्या निबीड काळोखात चाचपडणाऱ्या अब्राहामाने आशावादी दृष्टीकोन बाळगून परमेश्वराच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवली. आयुष्यभर वांझ म्हणून हिणविल्या गेलेल्या वयातील साराला देवाच्या आशीर्वादाने बाळाची देणगी लाभली. त्याच आपल्या एकुलत्या एका पुत्राचा, इसहाकाचा, देवाच्या इच्छेनुसार बळी देण्यासाठी अब्राहाम सिद्ध झाला. म्हणूनच देवाने श्रद्धेचा आदिपिता अब्राहाम ह्याला अनेक राष्ट्रांचा पिता केले.

प्रार्थना :हे परमेश्वर पित्या, संत जोसेफप्रमाणे भक्तीमान व नीतिमान बनण्यास आणि आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या