उपवास काळातील
चौथा सप्ताह
गुरुवार
१८ मार्च २०२१
जेरूसलेमचे संत सिरील
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३१३-३८०)
ख्रिस्ताच्या क्रुसाची आपल्याला शरम वाटता कामा नये, तर आपण विरोधकांच्या जुलमी कारवायांना न भिता क्रुसाचे चिन्ह मानाने हातात, कपाळावर व हृदयावर मिरवावे. सैतान हे चिन्ह पाहून पळून जाईल. त्यामुळेच ही क्रुसाची खूण उठता बसता, खाता पिता, फिरता, झोपता, बोलता चालता, शब्दाने आणि कृतीने आपल्या जीवनात काढीत राहा. संत सिरील
✝️
परमेश्वराने इस्त्राएली जनतेला मोशेच्या नेतृत्वाखाली मिसर देशातून म्हणजेच फारोच्या गुलामगीरीतून बाहेर आणले. मात्र इस्त्राएली जनतेने सोन्याचे वासरु करुन त्या मूर्तीसमोर अर्पणे सादर केली. अशा भ्रष्ट झालेल्या इस्त्राएली जनतेचा सर्वनाश ! करण्याचे पमेश्वराने ठरविले, परंतु मोशेच्या विनवणीने आणि मध्यस्थीने परमेश्वराने ते टाळले. त्यानंतर मात्र मोशने परमेश्वराच्या इस्त्राइली लोकांवर दयेचा वर्षाव करविला.
प्रभू येशूची सार्वकालिक जीवन देणारी वचने, त्याची देवराज्याची शिकवण आणि त्याने केलेली अद्भूत कृत्ये ही प्रभू येशू देवाचा पुत्र होता ह्याची साक्ष देतात. अनेकांना येशूविषयी संशय आणि अविश्वास होता परंतु
पवित्र आत्मा स्वत: येशूविषयी साक्ष देत आहे की, प्रभू येशू देवपित्याचा परमपुत्र आहे व त्याचे आपण ऐकावे. आपल्या सर्वाना आतापर्यंत ख्रिस्तसभेतील संतांनी प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र असल्याची साक्ष दिली आहे. आजसुद्धा प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रभूच्या प्रेमाचा, करुणेचा व आरोग्यदानाचा अनुभव मिळत असतो.
देवाने आपल्याला दिलेले हे जीवन इतरांपर्यंत त्याचे प्रेम, करुणा, दया, ममता, चांगुलपणा व शांति पसरविण्यासाठी आहे.
✝️
'तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता;
कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.'
पहिले वाचन : निर्गम ३२:७-१४
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर मोशेला म्हणाला, "चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू इजिप्त देशातून आणले ते बिघडले आहेत; ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली व त्यास बली अर्पण केले आणि हे इस्राएला, ज्यांनी तुला इजिप्त देशातून सोडवून आणले आहे तेच हे तुझे देव! असे ते म्हणू लागले आहेत." मग परमेश्वराने मोशेला म्हटले, "मी या लोकांना पाहून चुकलो आहे, हे केवळ ताठ मानेचे लोक आहेत; तर आता मला आड़ येऊ नको, मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो."
तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची विनवणी करून म्हणाला, "हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महासामर्थ्याने व भुजबलाने इजिप्त देशातून सोडवून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना पहाडांमध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांना नष्ट करावे म्हणून त्यांना इजिप्त देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर काढले असे इजिप्तवासी लोकांनी का बोलावे ? आपल्या तीव्र कोपापासून निवृत्त हो आणि आपल्या लोकांवर अरिष्टे आणण्याचे तू योजले आहे त्यापासून परावृत्त हो. तुझे दास आब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल." तेव्हा मी आपल्या लोकांचे अनिष्ट करीन असे जे परमेश्वर म्हणाला होता त्यापासून तो परावृत्त झाला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०६:१९-२३
प्रतिसाद :प्रभो, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस
१) होरेब येथे त्यांनी वासराची एक मूर्ती बनवली, त्या ओतीव मूर्तीला दंडवत घातले; त्यांनी आपल्या वैभवशाली देवाच्या मोबदल्यात गवत खाणार्या बैलाची प्रतिमा स्वीकारली.
२)ज्याने इजिप्त देशात महान कार्य केले होते, म्हणजे हामाच्या देशात अलौकिक कृत्ये केली होती आणि तांबड्या समुद्रावर भीतीदायक गोष्टी केल्या होत्या. त्या आपल्या उद्धारक देवाला ते विसरले.
३) तेव्हा त्यांचा नाश करायचा देवाने विचार केला, पण त्याचा राग शांत करून त्यांचा नाश टाळण्यासाठी त्याचा निवडलेला भक्त मोशे मध्ये पडला.
जयघोष
प्रभू म्हणतो, पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
शुभवर्तमान योहान ५:३१-४५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू यहुद्यांस म्हणाला, मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही; माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो, ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही; तथापी तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्य सिद्धिस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे. आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपसुद्धा पाहिले नाही आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही. मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही. परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही; दुसरा कोणी स्वत:च्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे ? मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन असे समजू नका; ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : मोशेने घालून दिलेल्या नियमांवर व मोशेने दाखविलेल्या देवावर विश्वास ठेवणारे यहूदी त्याच देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवण्यास तयार होत नाहीत ह्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची येशूविषयीची ईर्ष्या. धार्मिक क्षेत्रात मक्तेदारी गाजविणाऱ्या मुजोर धर्मपंडितांना येशूची कार्ये व सिद्धांत जेव्हा आव्हानात्मक जाणवू लागले तेव्हा हादरलेले यहूदी येशूचा द्वेष करू लागले. समाजात कुणी चांगले कार्य करू लागला, त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली की काही अहंकारी दुष्ट प्रवृत्ती त्या सज्जनांच्या वाटेत अडथळे निर्माण करून त्याला खाली खेचण्यासाठी पुढे सरसावते. अशावेळी त्याने आजवर केलेल्या अनेक सत्कृत्यांचे विस्मरण करून त्याच्या एखाद्या क्षुल्लक चुकीचे भांडवल केले जाते. येशूची अलौकिक कृत्ये तो देवपुत्र असल्याची साक्ष पटविण्यास पुरेशी असताना देखिल तिरस्कार व द्वेषाने ग्रस्त झालेले शास्त्रीपरुशी येशूची ओळख पटविण्यास कमी पडले. आपण खरोखरच येशूचा स्वीकार केला आहे का?.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तूच एकमेव तारणारा व जीवनदाता आहेस ही श्रद्धा दृढ बनविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या