Marathi Bible Reading | 4th week of Lent Wednesday 17th March 2021

उपवास काळातील


चौथा  सप्ताह 


बुधवार


१७ मार्च २०२१



संत पॅट्रीक
- महागुरू (३८५-४६१)

संत पॅट्रीकचे उरस्त्राण ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या गीतातील शब्द पुढीलप्रमाणे :
देवाचा हात माझा संरक्षक
देवाचे वचन माझे मार्गदर्शक
देवाचे ज्ञान माझा आत्मविश्वास
देवाचे सैन्य माझा दूतावास.

✝️

प्रभू येशू स्वत: आपल्या देवपित्यावर अवलंबून होता व त्याच्याशी एकनिष्ठ होता.  प्रभू येशूने स्पष्टपणे दोन  गोष्टी सांगितल्या आहेत. प्रभू येशूचे वचन आणि देवावरील विश्वास ह्यामुळे  सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आपण आजच्या प्रभूच्या वचनांवर विशेष चितंन  करून . प्रभू येशूचे वचन लक्षपूर्वक ऐकण्याचा व वचन ग्रहण करुन आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत . प्रभूच्या वचनात सामर्थ्य, शक्ती व जीवन परिवर्तन करण्याची किमया आहे. प्रभू येशूच्या वचनावर आपला विश्वास आहे का ? प्रभू येशू देवाचा पुत्र आहे हे सत्य आपण अंत:करणापासून स्वीकारले आहे का ? '
 यशया देवाचे स्वरूप प्रकट करीत आहे.  परमेश्वर दयाळू आहे, तो सर्वांचे सांत्वन करुन काळजी वाहणारा देव आहे. देव विश्वसनीय आहे कारण आपण जरी त्याला विसरलो तरी, देव आपल्याला कधिच विसणार नाही. देवाने आपल्या प्रत्येकाला त्याच्या तळहातावर कोरुन ठेविले आहे.
परमेश्वर त्याच्या वचनाला जागतो. त्याचे अभिवचन  पूर्णत्वास येते ह्याची खात्री पवित्र शास्त्राच्या पानो पानी आपल्याला दिसून येते. तारणाकर्त्या  प्रभूच्या वचनाचा स्वीकार करुन आपण प्रभूला शरण जाऊ या.

✝️

"कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही."

✝️

पहिले वाचन : यशया  ४९:८-१५

वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर म्हणतो, प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुनः वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो. तू बंदिस्त असलेल्यांना म्हणावे, बाहेर या; अंधारात आहेत त्यांना म्हणावे, उजेडात या. ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल. त्यांना तहानभूक लागणार नाही. झळई व ऊन यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्याच्यावर दया करणारा त्याचा नेता होईल; पाण्याचा झाल्यावर तो त्यांना नेईल. मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील. हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत; हे सिनी लोकांच्या देशातून येत आहेत. हे आकाशा, जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर; अहो पर्वतांनो, जयघोष करा! कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पीडलेल्या लोकांवर दया केली आहे. 
ह्यावर सियोन म्हणाले, 'परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे.' परंतु परमेश्वर म्हणतो, 'स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय ? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.'

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १४५:८-९,१३-१४,१७-१८

प्रतिसाद प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे.

१ ) प्रभू, प्रेमळ आहे. प्रभू दयानिधी आहे. तो मंदक्रोध व प्रेमसागर आहे. प्रभू सर्वांशी चांगला आहे. त्याने निर्मिलेल्या सर्वांवर त्याची कृपादृष्टी असते.

२) प्रभू आपल्या प्रत्येक वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. अडखळणाऱ्या सर्वांना प्रभू सावरतो. वाकून गेलेल्या सर्वांना ताठ उभे करतो.

३)  प्रभूचे सारे करणे न्यायाचे असते. त्याची सगळी करणी दयेची असते. जे प्रभूचा धावा करतात, मनापासून त्याचा धावा करतात, त्यांच्या समीप तो असतो.


जयघोष 

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.


शुभवर्तमान योहान ५:१७-३०

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  
येशूने यहुद्यांना उत्तर दिले, "माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे." ह्यामुळे तर यहुदी त्याला जिवे मारायची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडीत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वत:ला देवासमान करीत असे.

ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सत्य तेच सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वत: होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो तसेच पुत्रही करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वत: जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो; तुम्हांला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे; ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हाला नक्की सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. "मी तुम्हांला नक्की सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे कारण पित्याच्या ठायी जसे स्वत:चे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायी स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरीतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्में केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.
"मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वत:च्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :  प्रभू येशूख्रिस्त स्वर्गीय पित्याचे प्रतिरूप. मानवी चेहऱ्यामध्ये परावर्तीत झालेले जणू देवपित्याचे प्रतिबिंब, देवाच्या स्वर्गातील इच्छा पृथ्वीवर रुजविण्यासाठी ख्रिस्त या जगी अवतरला; देवबापाचे प्रत्येक विचार, भावना, शब्द, आज्ञा त्याने तंतोतंत साकारल्या, जपून ठेवल्या. त्यातून एकही हरविली नाही. देवपुत्र येशू जगात मनुष्याचा पुत्र म्हणून जगत असला तरी पवित्र क्यामध्ये तो एकतत्व आहे. म्हणूनच मनुष्याच्या पुत्राला मनुष्याचा न्यायनिवाडा करण्याचा, त्याला मेलेल्यांतून (ऐहिक जोखडापासून) जिवंत (मुक्त) करण्याचा अधिकार देवाने त्याला दिला. येशू स्वतः देवाची जिवंत वाणी आहे. ही वाणी प्रत्येकाच्या अंतःकरणात सदोदित वास करीत असते. येशूचे वचन, म्हणजेच आपल्या अंतरंगातील येशूची वाणी ऐकून जो कुणी त्याला प्रतिसाद देतो व त्याप्रमाणे वागतो त्या प्रत्येकाला येशूकडून तारणाचे अभिवचन मिळाले आहे.


प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझे वचन सत्य आहे. तूच खरा मार्ग व तूच आमचे जीवन आहेस. आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या