Marathi Bible Reading | 4th week of Lent Tuesday 16th March 2021

उपवास काळातील


चौथा  सप्ताह 


मंगळवार 


१६ मार्च २०२१



संत हेरीबर्ट
(कोलोनचे महागुरू ९७०-१०२१)

✝️

पवित्र मंदिरातून वाहणाऱ्या आरोग्यदायी  झऱ्याचे विस्तृत वर्णन आज आपण ऐकत आहोत.  झऱ्याच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना  शुद्ध बनवते.  कृपेच्या झऱ्यात जीवनाचे नुतनीकरण होते. पवित्र स्थानातून निघणारा हा झरा सर्वांना आरोग्य देणारा आहे.
असाध्य आजाराने त्रस्त झालेली माणसे जीवनाला कंटाळलेली असतात,  अडतीस वर्षे बाजेवर पडलेल्या आजारी माणसाचा विश्वास आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. आरोग्यदायी जीवनाच्या बेथसेदा तळ्याजवळ तो सतत प्रयत्नशील होता, म्हणूनच योग्य वेळी त्याच्या जीवनात चमत्कार घडला. आपले आजार, वेदना संकटे व अडचणी दूर करण्यासाठी आपण त्या कृपेच्या झऱ्याजवळ जायला हवे.  ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढबनवून त्याला शरण जाणे महत्वाचे आहेच,  परतू कृपा मिळविण्यासाठी पवित्र जीवन जगणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या पापांबद्धल पश्चाताप करुन शुद्धतेचे व पवित्रतेचे जीवन जगण्यासाठी ख्रिस्त प्रभू आपणासर्वांस आवाहन करीत आहे. आपण बरे झाल्यावर देवापासून बहकून जातो, देवाला विसरतो, म्हणूनच ख्रिस्त म्हणतो आजपासून पाप करु नको.'

✝️

“पाहा, तू बरा झाला आहेस; 
आतापासून पाप करू नको;"

✝️

पहिले वाचन : यहेज्केल  ४७:१-९.१२ 
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन  

    देवदुताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत आहे; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, ते पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत आहे.
मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते; त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालायला सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरुन जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिले ना ?"मग त्याने मला नदीच्या तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर पुष्कळ झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, "हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अरबांत उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्राला मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यामध्ये जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यामध्ये मासे विपुल होतील; कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहातील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत; त्याच्या फळांचा बहर खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्या वृक्षाची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४५:२-३,५-६,८-९

प्रतिसाद :सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे.

१) देव आमचा आश्रयदाता व सामर्थ्यदाता आहे. तो संकटकाळी साह्य करण्यास सदा सिद्ध असतो; पृथ्वी गडगडली, पर्वत कोसळून समुद्रात खोलवर बुडाले तरी आम्ही भिणार नाही.

२) जिचे पाट देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदित करतात अशी एक नदी आहे. त्या नगरीस देव आहे, ती हादरणार नाही; तांबडे फुटते न फुटते तोच देव तिला मदत करील.

३) सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे; याकोबचा देवा आमचा उंच बुरूज आहे. प्रभूने काय केले आहे, ते येऊन पाहा; त्याने पृथ्वीची कशी धूळधाण केली आहे.


जयघोष 

तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा; वाइटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल.


शुभवर्तमान योहान ५:१-३,५-१६

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  
     यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमला गेला. यरुशलेममध्ये मेंढरेद्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, "तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?" त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, "महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो." येशू त्याला म्हणाला, "ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग." लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला.
त्या दिवशी शब्बाथ होता. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, "आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही." त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून चालू लाग," त्यांनी त्याला सांगितले, "आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले, तो कोण माणूस आहे?" तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नको; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल." त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करीत असे.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :  पाप ही माणसामधील एक अवस्था आहे. या अवस्थेमध्ये जखडलेला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने सचेतन असूच शकत नाही. संकट, अडचणी, अडथळे, संभ्रम, गोंधळ, अशांती, असूया, सूडभावना, द्वेष, अहंकार हलगर्जीपणा, न्यूनगंड, भय, चिंता, तणाव इत्यादि आपल्या जीवनातील दुखणे व व्यंग असतात. या विचित्र अवस्थेत माणूस कित्येक वर्षे खितपत पडलेला असतो. इतका की आपल्या स्वतःचे हित कशात आहे हे देखील त्याला कळेनासे होते. स्वतःच्या गाफिळपणामुळे आयुष्यातील समोर आलेल्या अनेक संधी तो गमावून बसतो. त्यामुळे जीवनातील स्पर्धेमध्ये, परीक्षेमध्ये तो अयशस्वी होतो व निराश होतो. अशावेळी बाप्तिस्म्यावेळी प्रत्येकाला मिळालेला पवित्र आत्मा आपणांस भानावर आणतो. आपल्या अंतरंगातील तळ्यामधील जीवनाचे पाणी उसळू लागते. आणि पापांच्या काळोखातून जीवनाच्या प्रकाशाकडे येण्याची इच्छा आपण उराशी बाळगू लागतो. मग योग्य वेळ येताच प्रभू परमेश्वर माणसाच्या रूपात आपणांस मदत व सोबत करतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्ही सन्मार्गावर चालावे व शुद्धतेचे जीवन जगून तुझी सुवार्ता इतरापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या