Marathi Bible Reading | 4th week of Lent Monday 15th March 2021

 उपवास काळातील


चौथा  सप्ताह 


सोमवार 


१५ मार्च २०२१



संत लुईजा डी मारिलेक 
(विधवा )


"मन लावून गरिबांची सेवाचाकरी करा, जसे तुम्ही ख्रिस्ताला वागविले असते तसे त्यांना प्रेमाने व आदराने वागवा.” - संत लुईजा

✝️ 

देवाने इस्त्रायल जनतेला नवीन जीवनदायी आशेचा संदेश दिला आहे. प्रभू येशूच्या येण्याने नवजीवनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. कारण  ज्या काना गावी येशूने पाण्याचा द्राक्षरस केला होता त्या गावी तो आला होता. तेथील एका मुलाचा बाप येशूकडे आला. त्या अंमलदाराला कदाचित  येशूविषयी माहिती असावी कारण विश्वासाने तो येशूकडे आला होता, येशूची महानता आणि त्याचे सामर्थ्य अंमलदाराने ओळखले होते,  म्हणूनच तो आपली प्रतिष्ठा व मानसन्माम बाजूला ठेवून जवळ जवळ २०  मैलाचे अंतर चालून येशूकडे आला होता. त्याच्या विश्वासामुळे व नम्रतेमुळे देवाची कृपा त्याला प्राप्त झाली.   येशूचे  शब्द ऐकताच त्याने विश्वासाने, आपल्या घरचा रस्ता पकडला.  विश्वास ठेवून  निघून गेला. प्रभू येशूच्या दर्शनाने व त्याच्या शब्दाची अनुभूती घेतल्याने त्या माणसाचा मुलगा बरा झाला. विश्वासाने विश्वास वाढत असतो आणि नम्रता धारण केल्याने !  माणसाला मोठेपणा प्राप्त होत असतो. आपण आपल्या विश्वासावर चिंतन करु या. 

✝️

 “जा; तुमचा मुलगा वाचला आहे."

✝️

पहिले वाचन : यशया  :१६-२
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रभू म्हणतो, "पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पावा; पाहा, मी येरुशलेम उल्हासमय, त्याचे लोक आनंदमय करतो. मी येरुशलेमविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन; त्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुनः ऐकू येणार नाही. यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भके त्यात जन्माला येणार नाही, जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा त्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षाचा होऊन मरेल, देवाच्या शापाने मरणारा पापीही शंभर वर्षांचा होऊन मरेल. ते घरे बांधून त्यात राहतील; द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३०:२,४-६,११-१३

प्रतिसाद :प्रभो, मी तुझा महिमा गातो

१) प्रभो, मी तुझा महिमा गातो, कारण तू मला वर आणले आहेस; अशा रीतीने माझ्या शत्रूंना तू आनंद होऊ दिला नाहीस. हे प्रभो, तू अधोलोकातून मला वर आणलेस, मी गर्तेत पडू नये म्हणून तू मला जिवंत ठेवलेस.

२) अहो प्रभूचे भक्त हो, त्याचे स्तवन करा, त्याच्या पावित्र्याचे स्मरण करून धन्यवाद द्या. त्याचा कोप केवळ क्षणभर; पण प्रसन्नता मात्र आयुष्यभर. सायंकाळी दुःखाश्रू घर करतात, पण सकाळी आनंदाचा गजर होतो.

३) प्रभूने माझे ऐकले व माझ्यावर दया केली. प्रभू माझा सहाय्यकर्ता झाला. तू माझ्या शोकाचे रूपांतर करून मला आनंदाने नाचायला लावले आहेस. हे प्रभो, माझ्या देवा, मी सदैव तुला धन्यवाद देईन.


जयघोष 

परमेश्वर म्हणतो, आता तरी मन:पूर्वक माझ्याकडे वळा, कारण मी कृपाळू व दयासागर आहे.


शुभवर्तमान योहान ४:४३-५४

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  
येशू शोमरोनहून गालिलात निघून गेला. कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही. म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी  त्याचा स्वीकार केला; कारण येरुशलेममध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते.
नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कर्फणहूम येथे आजारी होता. येशू यहुदियातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा; कारण तो मरणाच्या पंथाला लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, " तुम्ही चिन्हे व अद्भुते पहिल्या वाचून विश्वास ठेवणार नाही." तो अंमलदार त्याला म्हणाला, "प्रभुजी, माझे मूल मरण्यापूर्वी तुम्ही खाली येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाला, “जा; तुमचा मुलगा वाचला आहे." तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला.
तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, "आपला मुलगा वाचला आहे." ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले; त्यांनी त्याला म्हटले, "काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला." ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, "तुमचा मुलगा वाचला आहे, "त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वत: व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होय."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :  प्रभू स्पर्शाने जेव्हा जीवनाचे पुनरुत्थान होते. तेव्हा सर्वकाही नवे-नवे होते. परमेश्वर त्याच्या उपकार व आशीर्वादांच्या राशी त्याच्याभोवती उभारतो. खऱ्या खुऱ्या श्रद्धेने मनोभावे केलेली प्रार्थना देव योग्य वेळी ऐकतो. त्याच्या परमोच्च दयेचा अनुभव श्रद्धावंताला आल्याखेरीज राहत नाही. संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही असे गालिलीकरांना येशूने सुनावले होते. परंतु पुढे त्याने केलेली महत्कृत्ये पाहून ते त्याचा स्वीकार करू लागले. येशूने आपल्या पाळकीय कार्यातील पहिला वहिला चमत्कार म्हणजे कानागावी केलेला पाण्याचा द्राक्षारस. कालवारीच्या क्रूसावरील ओघळणाऱ्या स्वतःच्या रक्ताचे प्रतिक. हाच द्राक्षारस अखेरच्या भोजनाप्रसंगी स्वतःचे रक्त असल्याचे सांगत येशू म्हणाला हे तुमच्या पापांसाठी सांडण्यात येईल.' चमत्काराशिवाय नमस्कार मिळत नाही ही माणसाची रीत अद्भूत चिन्हे दाखविण्याखेरीज लोक विश्वास ठेवित नाहीत याचे येशूला आश्चर्य वाटत होते. स्वतः जगाचे तारण आपल्यामध्ये  उपस्थित असतानाही येशूवर विश्वास ठेवणे त्यांना अवघड वाटते ह्याबद्दल येशूला खेद वाटला.

प्रार्थना : हे प्रभू येशू , आमच्यातील अहंकार व अविश्वास काढून टाक आणि  विश्वासाने तुझ्या सन्मार्गावर चालण्यास तुझी कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या