सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४०:७-११
प्रतिसाद : हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.
१. यज्ञ आणि अर्पणे ही तुला हवीशी नसतात, पण ऐकायला तू माझे कान उघडे ठेवले आहेत. होमबली आणि पापबली तुला नकोत. ह्यावरून मी म्हणालो : पाहा, मी तयार आहे !
२. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे. माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद वाटतो, तुझे वचन माझ्या अंतर्यामी आहे.
३. हे प्रभो, महासभेत मी तुझ्या नीतिमत्वाचा पुरस्कार केला. मी आपले तोंड बंद ठेवले नाही, हे तुला माहीत आहे.
४. तुझे नीतिमत्व मी माझ्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझी विश्वसनीयता व मुक्तीची योजना मी जाहीर केली. तुझी दया आणि तुझे सत्य मी महासभेपासून गुप्त ठेवले नाही.
दुसरे वाचन इब्री १०:४-१०
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून ख्रिस्त जगात येण्याच्या वेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता.
ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, "तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे."
वर उल्लेखिल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अत्रार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" (ही नियमशास्त्राप्रमाणे अर्पिण्यास येतात ) आणि मग तो म्हणाला, "पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे." ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू खिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.
हा प्रभूचा शब्द आहे
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १:२६-३८
वाचक :संत लूकच्या शुभवत्तमानातून घेतलेले वाचन १:२६-३८
"पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल." ,,
देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, "हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो." ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, "मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव.
तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुगे करील. व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही."
मरियेने देवदूताला म्हटले, "हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही." देवदूताने उत्तर दिले,
"पवित्र आत्मा तुझ्यावर येईल.आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.
पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही." तेव्हा मरिया म्हणाली, "पाहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : खिस्तसभा आज दूताचा मरियेला संदेश हा सोहळा साजरा करीत आहे. ह्या प्रसंगात एकूण ९ पात्रे नमूद करण्यात आलेली आहेतः देव, देवदूत, पवित्र आत्मा, पवित्र मरिया, संत योसेफ, येशू, दावीद, याकोब व व अलेशिबा. ह्या प्रसंगातील मुख्य पात्र देव आहे. तो मरिये करवी आपली योजना जगात साकार करतो. पवित्र मरिया आपल्या भौतिक योजना व विचार बाजूला सारून देवाची योजना स्वीकारते. पुढे संत योसेफ त्या योजनेशी पूर्ण सहकार्य करतो या कामी देवदूत शंकानिरसनाची महत्वाची भूमिका बजावतो. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी पवित्र आत्मा पवित्र मरियेवर उतरतो. देवदूत एकीकडे मरियेला भूतकाळातील दावीद व याकोब ह्यांच्या वैभवाची आठवण करून देतो तर भविष्यकाळात अलिशिबेच्या कुटुंबात होणाऱ्या महान प्रसंगाची शुभवार्ता देतो. आपल्या जीवनात कोणकोणती देवी व मानवी पात्रे कार्यरत आहेत ? त्यांना आपण मरियेप्रमाणे कसा काय प्रतिसाद देऊ शकतो ?
प्रार्थना : हे पवित्र मरिये, तुझे अनुकरण करण्यास व देवाला सर्वस्वी शरण जाण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी विनंती कर, आमेन.
0 टिप्पण्या