Marathi Bible Reading | 5th Week of Lent Friday 26th March 2021

उपवास काळातील


पाचवा सप्ताह 


शुक्रवार 


२६ मार्च २०२१

✝️


संत लुडजर 
(महागुरू आणि वार्तांसाक्षी)

✝️

"माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे."
✝️

प्रभू येशू देवाची तारणदायी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आला होता. त्याची शिकवण, त्याचे कार्य आणि केलेले आत्मबलिदान ह्यातूनच त्याचे देवत्व स्पष्ट होते.

प्रभू येशू ख्रिस्ताचे अस्तित्व, त्याची सर्व व्यापकता, अधिकार, त्याचे सामर्थ्य, पवित्रता आणि त्याने केलेली सर्व अद्भूत कृत्ये अशा सर्वांमधून त्याचे देवत्व प्रकट होते. आपण सर्वांनी प्रभू येशूला आपला देव तारणारा म्हणून  स्वीकारावे मात्र त्याचा दैवी स्वभाव ओळखण्यासाठी श्रद्धेबरोबरच प्रबोधनाची गरज आहे.

ह्या प्रायश्चित काळात आपल्याला प्रभूची खरी ओळख व्हावी व आपण श्रद्धेत दृढ होण्यास प्रार्थना करूया   

✝️

पहिले वाचन :   यिर्मया २१:१०-१३
वाचक : यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

यिर्मया म्हणतो,"मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे! मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की, “त्याच्यविरुद्ध गिल्ला करा! आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू या !" "कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू,” तरी पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्याबरोबर आहे; म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्त्व पाहणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्याचा सूड घेशील तो मला पाहू दे; कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.
प्रभुपुढे गाणे गा; प्रभूचे स्तवन करा, कारण त्याने दुर्जनांच्या हातून दीनांचा बचाव केला आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १८:२-७

प्रतिसाद मी संकटात प्रभूचा धावा केला आणि त्याने माझी वाणी ऐकली.

१. प्रभो, तू मला प्रिय आहेस, तू माझे सामर्थ्य आहेस; प्रभू माझा दुर्ग, माझा गड आहे, तू माझा उद्धारकर्ता आहेस. माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी घेतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे साधन आहे, तो माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र प्रभूचा मी धावा करतो. तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.

२.मृत्यूच्या बंधनांनी मला जखडले; नाशाच्या पुरांनी मला भिवविले; अधोलोकांच्या बंधनांनी मला जखडले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.

३. मी आपल्या संकटात प्रभूचा धावा केला; माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी एकेली; माझी हाक त्याच्या कानी गेली.


जयघोष 

बी हे देवाचा शब्द आहे, पेरणारा ख्रिस्त आहे. ज्याला ते सापडेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.


शुभवर्तमान  योहान १०:३१-४२

वाचक :योहानलिखित शुभवतमानातून घेतलेले वाचन
'पुन्हा यहुद्यांनी येशूला पकडण्याचा प्रयत्न केला,
परंतु तो त्याच्या हातातून निसटला "
यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत; त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता ?" यहुद्यांनी त्याला उत्तर दिले "चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वत:ला देव म्हणवता.” येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही देव आहा असे मी म्हणालो " हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही का ? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले (आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही), तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, "मी देवाचा पुत्र आहे" असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करता असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे." ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्याच्या हाती न लागता निघून गेला. 
मग तो पुन्हा यार्देनच्य पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे" तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : स्वतः काहीच चांगले करायचे नाही. उलट जो कोणी चांगले, स्तुत्य करू पाहतो त्याच्याविरुद्ध चिथावणीखोर ओरड करून समाजात फूट पाडायची. अशावेळी कुंपणावर बसून अलिप्त राहायचे अशी एक मानवी प्रवृत्ती असते. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मूठभर माणसे अशाप्रकारे लोकांमध्ये फूट पाडून गोंधळ निर्माण करतात. आपले खोटे म्हणणे प्रसंगी खरे वाटू लागावे इतके ठासून सांगतात, त्याला पूरक असी अवास्तव परिस्थिती निर्माण करतात आणि अशा विद्रोही समाजनेत्यांचे हस्तक गर्दीमध्ये हातात घातकी साधने लपवून उद्रेक पसरवितात आणि शांती भंग करतात. अशाप्रसंगी चिथावणीच्या कोलाहलात आपला ही सूर मिसळवून अज्ञानी, सर्वसामान्य देखील हातात दगड घेऊन हल्लेखोर बनू लागतात ही गर्दीची मानसिकता असते. जेव्हा विचारांना विचारांनी प्रत्युत्तर देण्याची कुवत नसते तेव्हा माणूस नीच व हिंसक बनतो. समोरच्या सज्जन व्यक्तिला केवळ तो परखडपणे सत्य व वस्तूनिष्ठ बोलतो म्हणून लक्ष्य करून त्याला संपविण्याचे मनसुबे रचतो. अशावेळी तो कुठल्याही थराला पोहचतो. देवपुत्र असून देखील येशूला अशाप्रकारच्या नेभळट प्रवृत्तींना सामोरे जावे लागले. आपली प्रवृत्ती कशी आहे?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला तारणारा मशीहा म्हणून स्वीकारण्यास व तुझी वचने आचरणात आणण्यास मला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या