Marathi Bible Reading | 5th Week of Lent Saturday 27th March 2021

उपवास काळातील


पाचवा सप्ताह 


शनिवार 


२७ मार्च २०२१

✝️


इजिप्तचे संत जॉन  
(मठवासी ) 
वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत संत जॉन ह्यांनी आपल्या वडिलांबरोरबर सुतारकीचा व्यवसाय केला. पवित्र जीवन जगण्यासाठी तो अरण्यात एकांतवासात निघून गेला.  आता आपला आत्मा आणि परमेश्वर असा एकच ध्यास त्याला लागलेला होता. त्यामुळे उर्वरित ५० वर्षांच्या आयुष्यात त्याने एकाही स्त्रीचे तोंड पाहिले नाही. क्वचितच तो एखाद्या माणसाची भेट घेई. त्याच्या ह्या कर्तव्य व जागृत मनोवृत्तीमुळे देवाने त्याला तीन दानांची देणगी दिली, १) जे कोणी त्याच्या सहवासात असत त्यांना निरामय आनंद आणि प्रसन्नता ह्याचा जवळून अनुभव येई. २) आपल्या धर्माधिकाऱ्यांशी तो अत्यंत आदराने व आज्ञाधारकपणे वागत असे. ३) निर्मात्याच्या ध्यासानेही त्याने त्याज्य मानलेल्या निर्मित वस्तूंवर त्याला विशेष अधिकार देण्यात आलेला होता. सैतान सतत जॉनला मोहात पाडण्याचा प्रयत्न करी परंतु जॉन आणखी मोठ्या प्रमाणात प्रार्थना करीत राही. देवाशी दीर्घकाळ संवाद साधल्यामुळे त्याला रोग बरे करण्याची आणि संदेश देण्याची अद्भुत शक्ती लाभलेली होती. जे त्याच्याकडे सल्ला मागण्यासाठी येत असत त्यांच्याशी ते आठवड्यातून दोन वेळा एका खिडकीतून बोलत असत.  आजारी लोकांसाठी तेलाला आशीर्वाद देत असत व येणाऱ्या भावी गोष्टींची पूर्वसूचना लोकांना देत असत.  राजा थिओडोसियस ह्यांना तर संत जॉन ह्यांनी त्याच्या भावी विजयाविषयी आणि मरणाच्या वेळेविषयी पूर्वकल्पना दिली होती. आपल्या जीवनातील अखेरचे तीन दिवस जॉन संपूर्णपणे देवाच्या सहवासात होते. तिसऱ्या दिवशी ते गुडघे टेकून प्रार्थना करीत असतानाच देवाच्या अधीन झाले. इ. स. ३९४ साली वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांना सुखाचे मरण आले.
✝️
"कारण तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करतो."
✝️

 प्रभू  येशूने देवराज्याची घोषणा करुन आजाऱ्यांना रोगमुक्त केले, अपंग, आंधळे,  बहिरे मुके आणि अशुद्ध आत्मे लागलेल्यांना बरे केले, दु:खितांचे अश्रु त्याने  पुसले, हजारो लोकांची भूक त्यांनी भागविली. अशा अनेक अद्भूत कृत्याद्वारे  प्रभू येशूची किर्ती पसरत चालली असताना प्रमुख याजक व यहुद्यांची आसने डळमळीत झाली. सत्यवादी आणि देवाच्या राज्याच्या दिशेने चालणाऱ्या माणसांची समाजातील ढोंगी पुढाऱ्यांना भीती वाटत असते, कारण सत्यता माणसाचा खरा चेहरा समोर आणित असते.

आपण आज प्रभू येशूच्या जीवनावर चिंतन करीत असताना आपल्यातील ढोंगी, स्वार्थी आणि दुष्टपणा प्रभूला समर्पित करु या. विश्वासाने त्याला आपला स्वामी व तारणदाता स्वीकारु या.ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी बनून त्याची देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पुढाकार घेऊया .    

✝️

पहिले वाचन : यहेज्केल  ३७:२१-२८
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन

प्रभू परमेश्वर म्हणतो, "पाहा, इस्राएलचे वंशज ज्या राष्ट्रात गेले आहेत त्यातून मी त्यांना काढून व चोहोकडून गोळा करून स्वदेशी नेईन; मी या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर त्याचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वावर एकच राजा राज्य करील; ती यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत, यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत. ते आपल्या मूर्तीनी, आपल्या तिरस्कारणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणाला विटाळणार नाहीत; त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल. माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल; त्या सर्वाचा एकच मेंढपाळ होईल. ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्याप्रमाणे वर्ततील. जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्याचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्याच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल. आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन; तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्याची संख्या वाढवीन आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्याच्यामध्ये स्थापीन. माझा निवासमंडप त्याच्यावर राहील; मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल. माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील. तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र यिर्मया ३१:१०-१३ 

प्रतिसाद प्रतिसाद : परमेश्वर आपली निगा राखील.

१. अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा, “ज्याने इस्राएलला विखुरले तो त्यांना जमा करील; मेंढपाळ आपल्या कळपाची निगा राखतो तशी तो त्यांची निगा राखील."

२. कारण परश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून त्याला मुक्त केले आहे. ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराच्या उपयुक्त वरदानांनी ते प्रफुल्लित होतील. 

३ . त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील. वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्याचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.


जयघोष 

आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.


शुभवर्तमान  योहान ११:४५-५७

वाचक :योहानलिखित शुभवतमानातून घेतलेले वाचन

मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी, त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण कित्येकांनी परुश्याकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. ह्यावरून मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले "आपण काय करीत आहो ? कारण तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.” तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमूख याजक होता, तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणीत नाही." हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरिता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगराला गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्ह यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांला शुद्ध करून घ्यायला बाहेरगावाहून वर येरुशलेमला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते ? तो सणाला मुळीच येणार नाही का?" मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कोठे आहे हे कोणाला कळले तर त्याने खबर द्यावी.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : सत्तेच्या खुर्चीखाली जेव्हा धरणीकंप सुरु होतो तेव्हा आपले स्थान बळकट करण्यासाठी सत्ताधारी खलबते करून कारस्थाने रचू लागतात. मूळ मुद्यांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी ते युक्त्या-प्रयुक्त्या करू लागतात. दंगली, जाळपोळ घडवून लोकांना वेठीस धरून त्यांना भलत्याच परिस्थितीत गुंतवून ठेवतात. अशावेळी मार्गात आडवा येणाऱ्याचा खात्मा करण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत. धर्मसत्ता व राजसत्ता यामधील ढोंगी कर्मकांडावर येशू नेमके बोट ठेवीत होता. वेळप्रसंगी अशा कर्मठ व दांभिक पुढाऱ्यांची अत्यंत कठोर शब्दात तो कान उघाडणी करीत होता. धर्मशास्त्र व वैयक्तिक आचरण याबद्दल अधिकारवाणीने बोलणारा येशू जनसामान्यांचा कैवार घेत होता. त्यामुळे येशूची कीर्ती चहूकडे पोहचली होती. स्वतः कित्येक अद्भुत महत्कृत्ये करीत असताना येशूने स्वतःबद्दल 'गवगवा' केला नाही उलट परमेश्वर पित्याचे गुणगौरव गाईले. कालवारीच्या वाटेवरून हालहाल करून लोकांसमोर त्याची धिंड काढण्यात आली तरी त्याने 'पुकारा' केला नाही. न्याय, नीती, क्षमा, प्रीती याद्वारे पत्करलेला सत्याचा मार्ग तो उंच क्रुसा पर्यंत घेऊन गेला. शेवटी आज्ञाधारकपणे आपला आत्मा परमप्रिय पित्याच्या स्वाधीन करून आपले रक्त व जीवन वेचिले. अशाप्रकारे देवपित्याने त्याच्याविषयी वर्तविलेली एकूण एक भाकिते येशूने सत्यात उतरविली व आपले कर्तव्य बजावले.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यावरील श्रद्धेत आणि तुझ्या वचनात वाढत राहण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या