पुनरुत्थान
चौथा सप्ताह
शुक्रवार
३० एप्रिल २०२१
संत पायस पाचवे
- परमगुरू, वर्तनसाक्षी (१५०४-१५७२)
जीवनातील अस्थिरता, संकटे, आजार, अपयश आणि निराशा अशा परिस्थितीत माणसे अस्वस्थ बनतात. अनेकदा त्यामुळे जीवन जगण्याची उमेद नष्ट होत जाते. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट काय ह्याविषयी मनात शंका निर्माण होतात. सत्त्याच्या आणि देवाच्या मार्गापासून मग माणसे बहकतात. स्वत:वरील, इतरांवरील आणि देवावरील विश्वास सुद्धा मग गमावला जातो.
तशाच गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या आपल्या शिष्यांना प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात धीर देत आहे. प्रभू म्हणतो, 'देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.' केवळ विश्वास ठेवल्याचे अनेकांचे आजार प्रभूने बरे केले. विश्वासामुळेच सैतानी बंधनातून अनेकांची प्रभूने सुटका केली. विश्वासामुळेच अनेकांना प्रभूने जिवंत केले. प्रभू येशू अस्वस्थ झालेल्या| सर्वांनाच संयम बाळगून विश्वास ठेवायला सांगत असतानाच म्हणतो की, 'मार्ग, सत्त्य आणि जीवन मीच आहे.'
आपले सर्वस्व प्रभूवर सोपवून त्याला सर्वस्वी शरण जाऊन समर्पण करू या. कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वजण संकटांना सामोरे जाण्यासाठी धीर व सामर्थ मिळून विश्वासात दृढ होण्यास आपण प्रार्थना करू या.
"मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे."
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १३:२६-३३
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“देवाने जे वचन दिले होते, ते येशूला मेलेल्यांतून उठविल्याने परिपूर्ण झाले. "
अत्युंखियातील सभास्थानात पौल म्हणाला, "अहो बंधुजनहो, आब्राहामच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण येरुशलेमवासियांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्याने ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातला विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेली सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरुन खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालिलीहून येरुशलेममध्ये आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलांबाळांकरिता पूर्ण केले आहे. स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की,
'तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. !
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २:६-११
प्रतिसाद : तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.
१) "सियोनवर, माझ्या पवित्र डोंगरावर, मी माझा राजा प्रस्थापित केला आहे.' प्रभूचे फर्मान मी जाहीर करीन. प्रभू मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे."
२) “तू मागितलेस तर राष्ट्रांचे स्वामित्व मी तुला देईन, थेट सीमेपर्यत पृथ्वी तुझ्या स्वाधीन करीन. लोखंडी गजाने तू त्यांना फोडून काढशील, कुंभाराच्या मडक्यासारख्या त्यांच्या ठिकऱ्या उडवशील."
३) तेव्हा, अहो राजांनो, सुज्ञता बाळगा, पृथ्वीवरील सत्ताधिशांनो, बोध घ्या. प्रभूची आदरयुक्त भीती बाळगा. कंपित व्हा, त्याचे प्रभुत्व मान्य करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ख्रिस्त मेलेल्यातून खरोखरच उठला आहे. हे आपणाला माहित आहे.
हे विजयशाली राजा, आम्हांवर दया कर.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १४ : १-६
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते. मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार ?” येशूने त्याला म्हटले, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.”
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- जीवन जगण्यासाठी तीन गोष्टीची गरज असतेः साध्य, साधन आणि सिद्धी! साध्य म्हणजे ध्येय, साधन म्हणजे मार्ग आणि सिद्धी म्हणजे कौशल्य, विद्या वा प्रेरणा. यापैकी एकाही गोष्टीचा अभाव असला तरी माणूस कुठलेही काम आपल्या हाती घेत नाही. येशूचा पृथ्वीवरील कार्यकाळ संपत आलेला होता. त्याला आपल्या प्रेषितांचा निरोप घ्यायचा होता तेव्हा त्याने जे निरोपाचे भाषण केले त्यातूनच आजच्या शुभवर्तमानाचा उतारा घेतलेला आहे. येशूला पित्याच्या घरी जाण्याचे वेध लागलेले होते. शिष्य मात्र त्यामुळे अस्वस्थ झालेले होते. त्यामुळे येशू त्यांना धीर देत आपल्या पित्याच्या घरी राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. असा दिलासा देतो. तिथे पोहोचण्यामधील अडथळे दूर करीत तो म्हणतो, 'मार्ग (साधन), सत्य (साध्य) व जीवन (सिद्धी) मीच आहे.' मी माझ्या जीवनात कोणते ध्येय उराशी बाळगून आहे ? त्यासाठी जे साधन वापरतो ते ख्रिस्ताच्या शिकवणुकीला धरून आहे का ? ते गाठण्यासाठी आवश्यक ती कला कौशल्ये मी आत्मसात करीत आहे का ? ती कला कौशल्ये कोणती ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील सर्व अस्थिरता तुला समर्पित करतो. तुझ्या वचनानुसार सत्य जगण्यास व तुझ्या मार्गावरून चालण्यास प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या