पुनरुत्थान
चौथा सप्ताह
गुरुवार
२९ एप्रिल २०२१
- कुमारिका व धर्मपंडित
इटलीतील तुस्कानी येथल्या सिएना गावात जन्मलेली कॅथरीन बालपणापासून कॅथरीन हिला ईश्वरी दृष्टांत होत, तसे ती अतिशय धार्मिक व विरक्तवृत्तीचे जीवन जगत असे.
वयाच्या १६ व्या वर्षी ती संत डॉमणिक ह्यांच्या संघातील तृतीय श्रेणीत दाखल झाली. ह्या काळात तिने कुष्ठरोग आणि कॅन्सरसारख्या असाध्य रोगा पिडलेल्या आजारी लोकांची सेवा करण्यात वेळ घालविला. त्यावेळी या रोग्यांची सेवाशुश्रूषा करण्यास कोणीही धजावत नसे. परंतु कॅथरीन मात्र आनंदाने त्यांच्यावर औषधोपचार करीत असे. मात्र आपल्या ह्या रुग्णांवर जिवापाड प्रेम केल्यामुळे तिने अनेकांना ख्रिस्ताकडे आणले. शारीरिक आजारापेक्षा तिने त्यांचे लक्ष आध्यात्मिक उदासीनतेकडे केंद्रीत केले. त्यामुळे रोगी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ अनुभवू लागले.
बराच काळ कॅथरीन फक्त पवित्र ख्रिस्तशरीर सेवन करून जगत असे. जे पापी लोक स्वत:साठी प्रार्थना करण्यास तयार नव्हते त्यांच्यासाठी तिने प्रार्थना व पश्चात्ताप सुरू केला. तिच्या ह्या त्यागाला आणि अविश्रांत परिश्रमाला देवाने विपुल फळ दिले. दोन डॉमिनिकन धर्मगुरू फ्लेगच्या महाभयंकर आजारातून पूर्णपणे बरे झाले. पुढे पोपमहाशयांच्या आदेशावरून कॅथरीनच्या प्रार्थनेमुळे बऱ्या झालेल्या लोकांचे पापनिवेदन ऐकण्यासाठी ते पुढे सरसावले. कॅथरीनच्या पावित्र्यामुळे, प्रायश्चित्तामुळे आणि प्रार्थनेमुळे इतके लोक देवाकडे वळू लागले की ह्या दोन धर्मगुरूंना रात्रंदिवस कुमसार ऐकण्यासाठी बसावे लागत असे.
हजारोंच्या संख्येने लोक कॅथरीनकडे आध्यात्मिक सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. वयाच्या २८ व्या वर्षी तिच्या शरीरावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरील ५ पवित्र जखमा दिसू लागल्या. मात्र तिच्या सातत्यपूर्ण व आग्रहपूर्वक प्रार्थनेमुळे त्या जखमी अदृश्य अवस्थेत राहिल्या तरी त्यांच्या वेदना तिला जाणवत असत.
ख्रिस्तसभेच्या नूतनीकरणासाठी आणि ऐक्यासाठी आपला देह झिजविणाया या ख्रिस्तसभेच्या युवराज्ञीला आयुष्यातील अखेरचे तीन महिने महाभयंकर अशा यातनांना सामोरे जावे लागले. तरी हे दुःखसहन तिने मोठ्या धैर्याने, सहनशिलतेने आणि प्रेमाने स्वीकारले आणि शेवटी वयाच्या ३३ व्या वर्षी आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला.
कॅथरीन ३० एप्रिल १३८० साली मरण पावली व पोप पायस दुसरे ह्यांनी तिला १४६१ साली संत पदाचा नजराणा बहाल केला.
ती इटलीची आश्रयदाती संत आहे. अग्नी, मरी आणि डोकेदु:खी ह्याविरूद्ध तिचा धावा केला जातो.
चिंतन : भूतकाळातील आपल्या पातकांची आठवण करू नका आणि जर ती करायचीच असेल तर देवाच्या क्षमाशीलतेच्या प्रकाशात ती होऊ द्या.- सिएनाची संत कॅथरीन.
'जे मी निवडले ते मला माहित आहेत.'
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १३:१३-२५
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"दावीदच्या वंशजातून देवाने इस्त्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला."
पौल आणि त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून येरुशलेममध्ये परत गेला. नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखिया येथे पोहचले आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे आणि संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की, "बंधुजनहो, तुम्हांजवळ लोकांकरिता काही बोधवचन असले तर सांगा." तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला :
“अहो इस्त्राएल लोकांनो आणि देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. ह्या इस्त्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक इजिप्त देशात परके असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी बाहूने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून येथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली." त्यांनंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला. तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, “मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते ? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडायला मी पात्र नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८८:२-३,२१-२२,२५,२७
प्रतिसाद : प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२) "माझा सेवक दावीद मला मिळाला आहे आणि पवित्र तेलाने मी त्याला राज्याभिषेक केला आहे. त्याच्यावर माझा वरदहस्त राहील आणि माझ्या हाताने मी त्याला समर्थ करीन.
३) मी त्याच्यावर प्रेम करीन, त्याच्याशी एकनिष्ठ राहीन. माझ्या नाम सामर्थ्याने त्याचा उत्कर्ष होईल. तो मला म्हणेल, तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग व मुक्तिदाता आहेस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता ख्रिस्त, मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १३ : १६-२०
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो."
येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतल्यावर तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहित आहेत. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, तो मी. आहे. मी तुम्हांस ठामपणे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- कलकत्त्याच्या संत मदर तेरेजा ह्यांनी शांततेकडून शांतीकडे प्रवास कसा करायचा त्याचा मंत्र दिलेला आहे. त्या म्हणतात, 'शांततेचे फळ प्रार्थना, प्रार्थनेचे फळ- श्रद्धा, श्रद्धेचे फळ- प्रेम, प्रेमाचे फळ - सेवा आणि सेवेचे फळ शांती' ह्या मंत्रामध्ये देण्यात आलेले सहाही सद्गुण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात आपल्याला दिसून येतात. तो शांत निवांत ठिकाणी एकान्ती जायचा. देवपित्याची प्रार्थना करायचा, श्रद्धेचे सामर्थ्य या विषयावर बोलायचा, प्रीतीची आज्ञा द्यायचा, सेवेचा आदर्श उभा करायचा आणि शांतीची सुवार्ता पसरवायचा. आजच्या शुभवर्तमानात तो आपल्या शिष्यांचे पाय धुतल्यानंतर त्यांना सेवेची दीक्षा देत असल्याचे आपण ऐकतो. अशी सेवा निःस्वार्थी वृत्तीने करायला हवी. येशूला ठाऊक होते की, आपल्या बारा प्रेषितांपैकीच एकाने केवळ स्वार्थापोटी आपल्या गुरूला विकलेले आहे. मात्र उरलेल्यांनी आपापले सेवाकार्य शुद्ध हृदयाने करायला हवे. असे येशू त्यांना शिकवितो. अशी सेवा करताना आपापले सेवाकार्य शुद्ध हृदयाने करायला हवे असे येशू त्यांना शिकवितो. अशी सेवा करताना सर्व लोक त्यांना स्वीकारतीलच असे नाही. मात्र जे त्यांना स्वीकारतील ते खुद्द ख्रिस्ताला स्वीकारतील कारण खुद्द ख्रिस्त त्यांच्याठायी राहून आपल्या लोकांची सेवा करीत असतो. मी कोणकोणत्या प्रकारची सेवा करतो? ही सेवा कोणत्या हेतूने व भावनेने करतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला स्वीकारण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.
0 टिप्पण्या