पुनरुत्थान
चौथा सप्ताह
बुधवार
२८ एप्रिल २०२१
व
संत लुईस मॉन्टफोर्ट
• वर्तनसाक्षी (१६७३-१७१६)
'चिंतन न करता केवळ ओठाने पुटपुटलेली रोझरीची प्रार्थना ही आत्मा नसलेल्या देहासारखी कशी अचेतन असते ते त्यांनी आपल्या प्रवचनांमधून लोकांना समजावून सांगितले. त्यांच्या ह्या उपदेशामुळे जॅन्सनिसम ह्या पाखंड- वादापासून बरेच लोक दूर राहिले आणि ते अधिक प्रभावी व श्रद्धावान ख्रिस्ती जीवन जगू लागले..
संतांची जडणघडण आणि प्रशिक्षण करण्याचे कार्य परमेश्वराने पवित्र मरियेवर सोपविलेले आहे. - संत लुईस मॉन्टफोर्ट
'मी जगात प्रकाश असा आलो आहे'
संत पौल, बर्णबा आणि त्यांच्या सहकाऱ्यानी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूची सुवार्ता आणि साक्ष अत्युंखिया आणि अन्य परिसरात दिली. अत्युंखियातील जनसमुदायांनी विश्वासाने प्रभूची सुवार्ता स्वीकारली आणि मंडळींची भरभराट झाली. अशा प्रकारे देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार होत गेला. असा आजच्या पहिल्या वचनाचा आशय आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त विस्तृतपणे त्याचा पित्याशी असलेला संबंध, त्याच्या तारणकार्याचा उद्देश आणि सार्वजनिक शिक्षणाचा सारांश कथन करीत आहे. येशू वरील विश्वास म्हणजे परमेश्वरा वरील विश्वास. जो येशूला पाहतो तो परमेश्वर पित्याला पाहतो. जो येशूची वचने पाळतो तो पित्याची वचने पाळतो. म्हणजे प्रभू येशू आणि पिता एक आहेत. परमेश्वर पित्याचे दैवी स्वरूप प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झाले आहे. प्रभू येशू सांगत आहे कि, मी जगात प्रकाश असा आलो आहे'.
ह्या जगातील अंधकारमय आणि दुष्ट प्रवृत्तींना बळी न पडता सर्वदा प्रभू येशूच्या तारणदायी प्रकाशाचा आपण ध्यास घ्यावा. आपण पापात पडतो ! व अंधारात चाचपडत असतो, परंतु पिता परमेश्वर न्यायी आहे तसाच तो प्रेमळ व दयासागर आहे. आपल्या अपराधांबद्दल तो क्षमा करण्यास तयार आहे.
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १२:२४-१३:५
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"बर्णबा आणि शौल ह्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. "
देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार होत गेला. बर्णबा आणि शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानला बरोबर घेऊन यरुशलेमहून माघारे आले.
अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक कुरेनेकर, जो बालपणापासून हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन आणि शौल हे संदेष्टे आणि शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा आणि शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा." तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
ह्याप्रकारे पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्र येथे गेले. मग ते सलमिनात असता त्यांनी देवाच्या वचनाची यहुद्यांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६७: २,३,५,६-८
प्रतिसाद : हे देवा, राष्ट्रे तुला धन्यवाद देवोत.
१) देवाने आमच्यावर दया करावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा.
त्याची तेजस्वी मुद्रा आमच्याकडे वळलेली असावी.
मग साच्या विश्वाला तुझी इच्छा कळेल.
तू देत असलेली मुक्ती सगळ्या राष्ट्रांना दिसेल.
२.) राष्ट्रांना आनंद होवो, ती आनंदाने गावोत.
कारण तू लोकांना योग्य न्याय देशील.
भूतलावरील राष्ट्रांना मार्गदर्शन करशील.
३) देवा, राष्ट्रे तुला धन्यवाद देवोत.
तुलाच सगळी राष्ट्रे धन्यवाद देवोत
देवाने आम्हाला आशीर्वाद द्यांवा.
पृथ्वीच्या पाठीवरचे सगळेजण त्याचे भय बाळगोत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू जो क्रुसावर आमच्याकरिता टांगलेला होता तो थडग्यात उठलेला आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १२ : ४४-५०
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू जगात प्रकाश असा आला आहे."
येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंध:कारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे आणि जो माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करतो आणि माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जी वचने मी सांगितली, तीच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करतील. कारण मी आपल्या स्वतःचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. ह्यास्तव जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- ‘पुनरुत्थानकाळात एकीकडे प्रभू येशूचे आत्मप्रकटीकरण सादर करीत असतानाच दुसरीकडे ख्रिस्तसभेचा प्रसार कसा झाला, त्याविषयीचे वर्णन आपल्याला ऐकायला मिळते. आजच्या पहिल्या वाचनात पवित्र आत्मा ह्या प्रसारकार्यात कसा कार्यरत आहे ते पाहायला मिळते तर शुभवर्तमानात पिता व पुत्र कसे क्रियाशील आहेत. त्याचे दर्शन घडते म्हणजेच पवित्र त्रैक्य मानवाचे तारणकार्य घडवून आणते. म्हणूनच संत ग्रेगरी महान म्हणतात, 'जुना करार हा देवपित्याचा काळ आहे. नवा करार हा देवपुत्राचा काळ आहे तर आधुनिक काळ पवित्र आत्म्याचा काळ आहे.' हा पवित्र आत्मा संत पौल व बर्णबा ह्यांना विशेष कार्यासाठी वेगळे करतो. त्यासाठी त्यांनी प्रार्थना व उपवास केलेला होता हे विशेषरित्या लक्षात घ्यायला हवे. प्रभू येशूनेही आपल्या पृथ्वीवरील कार्याला प्रारंभ करण्याआधी चाळीस दिवस अरण्यात जाऊन उपवास केलेला होता. संत पॉलदेखील तीन दिवस उपवास करतो. त्यानंतरच आपल्या प्रेषितकार्याला सुरुवात करतो. पवित्र भैक्याच्या प्रेरणेने कार्य करायचे असेल तर आपल्याही जीवनात विशिष्ट शिस्त असणे गरजेचे आहे. माझ्या जीवनात पवित्र त्रैक्याचे कार्य कशारीतीने सुरू आहे ? त्यासाठी मी कोणती शिस्त पाळतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तू प्रेमळ व दया सागर आहेस. श्रद्धेने आचरण करण्यास व तुझ्या सुवार्तेची साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या