Marathi Bible Reading | 4th week of the Easter | Tuesday 27th 2021

पुनरुत्थान

चौथा  सप्ताह 

मंगळवार 

२७ एप्रि २०२१ 


✝️



संत झिटा
“मोलकरीण जर उद्योगी नसेल तर ती काय कामाची? कामाविना पावित्र्य हे केवळ ढोंग आणि पोकळ डामडौल आहे.” - संत झिटा


 'मी आणि पिता एक आहोत.'


माणसे जेव्हा सत्य जपण्याचा व अनुभवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तेव्हा संशयाच्या गोंधळात गुरफटत जातात.  प्रभू येशू सर्वांना देवाची मुले होण्यासाठी पाचारण करीत होता. त्याची सत्कृत्ये पाहून अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मग काहीजण संशय व गोंधळात राहून प्रभूला त्यांनी नाकारले.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला  समजावून सांगत आहे. प्रथम आपण देवावरील विश्वासात टिकून राहिले पाहिजे, आणि दुसरे म्हणजे सतत त्याची वाणी ऐकली पाहिजे.
 प्रभू येशूने यहुद्यांना सांगितले  की, “जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करितो ती माझ्याविषयी साक्ष देतात तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही.” यहुद्यांप्रमाणे आपणसुद्धा अनेकदा आपल्या प्रभू  येशूवरील विश्वासात अपूरे पडतो .  विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रभू येशूची वाणी ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. पवित्र बायबलमध्ये आपण प्रभूची वाणी ऐकू शकतो म्हणूनच परमेश्वराचा शब्द वाचून त्यावर मनन-चिंतन करून तो आत्मसात केला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने कृतिशील बनून प्रभूला अनुसरू शकतो.
अत्यंत गोंधळाच्या स्थितीत असताना मी प्रभूचा धावा करतो का?  प्रभूला सर्वस्वी शरण जाण्यास व त्याची वाणी ऐकण्यास प्रेरणा व कृपा मागू या.

✝️
             
पहिले वाचन  प्रे.  कृ. ११:१९-२६

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"ते प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले."

स्तेफानवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, क्रुप्र आणि अंत्युखिया येथपर्यंत फिरून मात्र यहुद्यांना देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री आणि कुरेनेकर होते, ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान येरुशलेममधल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियापर्यंत पाठवले. तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा. कारण तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलचा शोध करावयाला तार्सस येथे गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. मग त्यांनी तेथे वर्षभर मंडळींमध्ये मिळूनमिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८७:१-७

प्रतिसाद : अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा! 

१) पवित्र डोंगरावर प्रभूचे नगर उभारलेले आहे.याकोबच्या कुठल्याही नगरापेक्षा वेशीच्या आतले सियोन त्याला अधिक प्रिय आहे. देवाच्या नगरा, तुझ्या भावी ऐश्वर्याच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत!

२) “माझ्या अंकितांमध्ये मी इजिप्त आणि बाबिलोन यांचा समावेश करीन. फिलिस्ती, टायर आणि इथिओपिया यांची जन्मभूमी हीच मानतील.” सियोनविषयी म्हणतील की, हे लोक काय आणि ते काय ? साऱ्यांचा जन्म येथलाच!

३) परमपरात्पर देव स्वतः ते नगर उभारील. लोकांची नावनिशी करताना प्रभू लिहील : "अमुक इथे जन्मला होता, " गाणारे आणि नृत्य करणारे म्हणतील : “तूच आमचे सुखनिधान !"


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे आणि आम्हांला प्रकाशित केले आहे. त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले आहे.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान १० : २२-३०

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मी आणि पिता एक आहो."

येरुशलेममध्ये मंदिर समर्पणाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शलमोनच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून विचारले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हांला उघड सांगा." येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :- ‘पुनरुत्थानकाळात प्रभू येशू आपल्याला त्याचे आत्मप्रकटीकरण करतो. आजच्या शुभवर्तमानात तो आपल्याला देवपित्याशी असलेले त्याचे नाते स्पष्ट करून सांगतो. 'मी आणि पिता एक आहोत' ह्या शब्दांत तो साक्षात परमेश्वर असल्याचे प्रकट करतो. फळामध्ये पूर्ण झाडाचे बी असावे आणि त्या बियामध्ये पूर्ण झाड असावे तसे हे पिता-पुत्राचे नाते होय. प्रभू येशू ख्रिस्ताने आयुष्यभर हे नाते जोपासले. बालपणी तो देवळात हरवला तेव्हाही 'मी माझ्या पित्याच्या घरात असावे हे तुमच्या लक्षात आले नाही काय?' अशा शब्दांत त्याने हे अनोखे नाते सूचित केले. आपल्या प्रेषितांना त्याने 'आमच्या स्वर्गीय बापा' ही प्रार्थना शिकवली. रात्रीच्या रात्री तो देवपित्याच्या सहवासात रमला. हा पिता जितका परिपूर्ण व पवित्र आहे. तितकाच तो दयाळू आहे हे त्याने दाखवून दिले. त्याच्या क्षमाशीलतेचे व विशाल अंतःकरणाचे दर्शन घडविणारे दाखले त्याने दिले शेवटी त्या पित्याच्या हाती आपला आत्मा सोपविला. परमेश्वराविषयी आपली कल्पना काय आहे? तो दयाळू, प्रेमळ व क्षमाशील पिता आहे असा अनुभव आपल्याला आलेला आहे का ? 

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तूच माझा मेंढपाळ आहेस, मला सन्मार्गावर चालण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या