पुनरुत्थान
चौथा सप्ताह
सोमवार
२६ एप्रिल २०२१
"देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
प्रेषितांनी आणि यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे ग्रहण केले. मग पेत्र येरुशलेमला गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही का जेवलात ? तेव्हा पेत्रने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली, “मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो. तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले आणि ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद,, श्वापदे, सरपटणारे जीव आणि आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली आणि मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, “पेत्र, ऊठ, मारून खा,” परंतु मी म्हणालो, “नको, प्रभू ! कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको.” असे तीनदा झाले. नंतर ते अवघे सारे पुन्हा आकाशात वर ओढले गेले. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरियातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहीली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा. मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, "मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला." तो म्हणाला, “यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनाला बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे आणि तुझ्या सर्व कुटुंबांचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल." मी बोलू लागलो तो, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांला तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडवणारा असा मी कोण ?" हे ऐकून ते गप्प राहिले आणि देवाचा गौरव करीत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
हा प्रभूचा शब्द आहे
शुभवर्तमान योहान १० : १-१०

0 टिप्पण्या