पुनरुत्थान
चौथा रविवार
२५ एप्रिल २०२१
'मीच उत्तम मेंढपाळ आहे;.'
"उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. "✝️
प्रेषितांची कृत्ये ह्या आजच्या पहिल्या वाचनात संत पेत्र प्रभू येशू विषयी साक्ष देताना स्पष्ट करीत आहे की, प्रभू येशू हाच संपूर्ण विश्वाचा एकमेव तारणकर्ता आहे. 'त्याच्या नावात व त्याच्या वचनात तारणाचे सामर्थ्य आहे. दुसऱ्या वाचनात आपण सर्वजण देवाची मुले आहोत असे सांगितले आहे. म्हणजेच देवाची प्रीति आपल्या सर्वांना मिळालेली आहे.
प्रभू येशू आज शुभवर्तमानाद्वारे आपल्या सर्वांना सांगत आहे. 'मीच उत्तम मेंढपाळ आहे;.' मेंढपाळ म्हणजे पालन करणारा किंवा काळजी करणारा. प्रभूयेशू आपल्या सर्वांचा काळजी करणारा, पालनहार व रक्षणकर्ता आहे. प्रभू येशू म्हणतो, 'मी आपल्या मेढरांकरिता आपला प्राण देतो.' म्हणजेच प्रभू येशू स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्याला वाचवितो. आपण सर्व त्या परमेश्वर पित्याची मुले आहोत आणि आपण सर्वांनी एक कळप व्हावे म्हणून प्रभू आपल्याला त्याच्या वचनाव्दारे सतत मार्गदर्शन करीत असतो.
प्रभू, आपला मेंढपाळ आपल्याला हाक मारुन शोधत असतो. आपण अशा प्रसंगी त्याची वाणी ऐकली आहे का ? सर्व प्रकारच्या काटेरी झुडूपांतून प्रभू आपल्याला बाहेर काढून त्याच्या कळपात आणण्यासाठी आपल्या जवळ आहे. त्याची मधूर वाणी आपण ऐकू या.
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. ४:८-१२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. "
पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन यहुद्यांना म्हणाला, “अहो लोकांधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही क्रुसावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला दगड कोनशिला झाला आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.".
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११८:१.८-९,२२-२३,२६.२८-.२९
प्रतिसाद : बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला.
१) परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा देवाचा आश्रय घेणे बरे.
२) तू माझे ऐकले आहे, तू माझा तारक झाला आहेस, यास्तव मी तुझे उपकारस्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
३) परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद होवो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकारस्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे.
दुसरे वाचन १ योहान ३:१-२
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाच्या खऱ्या स्वरूपात आम्ही त्याला पाहू.'
आम्हांला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आम्हांला केवढे प्रेमदान दिले हे पाहा, आणि आपण तसे आहोतच. त्यामुळे जग आम्हांला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १० : ११-१८
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. "
येशू म्हणाला, “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ, असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- पुनरुत्थान काळातील चौथा रविवार हा उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून साजरा केला जातो. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता प्राण देतो. त्याप्रमाणे येशूने आपल्या कळपाच्या रक्षणासाठी प्राण दिला. त्याचा प्राण घेणाऱ्या यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला ओळखले नाही. (पहिले वाचन) ह्या जगाने देखील त्याला ओळखले नाही. (दुसरे वाचन) कारण जगाची विचारसरणी आणि ख्रिस्ताची विचारसरणी वेगळी आहे. त्यासाठी आजच्या शुभवर्तमानात एकूण चार पात्रे आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहेत.
१) मेंढपाळ : मेंढपाळ ही कल्पना जुन्या करारात अनेकांसाठी वापरण्यात आलेली आहे. आबेल, आब्राहाम, मोशे, दावीद, आमोस हे सारे मेंढपाळ होते. दावीद आपल्या २३व्या स्तोत्रात परमेश्वराला मेंढपाळ म्हणून पुकारतो. आता येशू स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून सादर करतो. हा मेंढपाळ हरवलेल्या मेंढरांच्या शोधात जातो. तो त्यांना योग्य मार्गाने नेण्यासाठी त्याच्यापुढे चालतो. तो त्यांचे शत्रूंपासून रक्षण करतो. प्रसंगी त्यांच्यासाठी प्राण द्यायलाही तयार असतो.
२) लांडगा : हा कळपाचा शत्रू आहे. 'अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत' असा शेरा येशूने खोट्या शिक्षकांविषयी दिलेला होता. लांडगा हा धूर्त असतो. तो कळपावर झडप घालतो. त्यांची दाणादाण करतो. प्रारंभीच्या ख्रिस्तसभेवरही हल्ले झाले व त्यांची पांगापांग झाली.
३) मोलकरी: हा भाडोत्री रखवालदार मेंढरांची राखण करीत असे. त्याचा मतलब पगाराशी असे. कळपाशी त्याची काही खास बांधिलकी वा आपुलकी नसे. त्यामुळे लांडगा येत असलेला पाहून तो कळपाचे नव्हे तर आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पळून जाई.ख्रिस्तसभेत उथळ नेतृत्त्व असलेले लोक छळाच्या काळात ख्रिस्ताला सोडून गेले.
४) मेंढरे : मेंढरे ही निष्पाप असतात. ती मुकाट्याने मेंढपाळाच्या मागे जातात. ती मेंढपाळाची वाणी ऐकतात. पुनरूत्त्थानाच्या पहाटे मरिया माग्दालियाने येशूची वाणी ओळखली आणि ती आज्ञाधारक मेंढरासारखी वागली.
आत्मपरीक्षण : आज ख्रिस्तसभेत उत्तम मेंढपाळाची भूमिका कोणकोण बजावीत असतात ? एक मेंढरू म्हणून मी मेंढपाळाशी असलेले कसे जोपासतो ? समाजात कोणते लांडगे व मोलकरी वावरत आहेत ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, मला सन्मार्गावरुन चालण्यास व तुझ्या कळपात एक होण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या