Marathi Bible Reading | 3rd week of Easter Saturday 24th April 2021

पुनरुत्थान

तिसरा सप्तह

शनिवार 


२४ एप्रि २०२१



✝️



संत फिदेलिस

रक्तसाक्षी (१५७८-१६२२)  


✝️

 
प्रभू येशू, देव शब्द बनून आपल्यामध्ये आला, म्हणूनच येशूच्या वचनामध्ये देवाचे सामर्थ्य, ज्ञानाचा प्रकाश, आरोग्य कार्यतत्परता व पवित्रता भरलेली आहे. प्रभू येशूची वचने सार्वकालिक जीवन देणारी आहेत. जीवन  सकारत्मकतेने कसे जगावे ह्यासाठी प्रभू येशूची वचने मार्गदर्शनपर दीप 
आहेत. प्रभूची वचने जीवनाला पोषक व आरोग्य प्रदान करणारी आहेत. विशेषतः प्रभूची वचने सर्वदा जिवंत आहेत.

आम्ही जीवनात बहकून आणि भरकटून न जाता येशूच्या वचनांचा स्वीकार केल्यास सर्व समस्या सुटू शकतात. 
आजच्या पहिल्या वचनात आपण पाहतो की, पुनरुत्थित प्रभूच्या सामर्थ्याने भारावून गेलेल्या पेत्राने येशूच्या केवळ नावाने दोन चमत्कार केले. प्रभू येशूच्या नावात आणि वचनात सामर्थ्य आहे व त्या  सामर्थ्याद्वारे अनेक चमत्कार घडू शकतात. संत पेत्राने पक्षघाताने त्रस्त अंथरूणाला खिळलेल्या ऐनेयास व मृतावस्थेत असलेल्या टबीथा नावाच्या  स्त्रीला प्रभू येशूच्या नावाने आरोग्यदान देवून जीवनदान दिले. संत पेत्राची  प्रार्थना फलदायी झाली, कारण त्याचा पुनरुत्थित ख्रिस्तावरील विश्वास दृढ  होता. ह्या चमत्कारांच्या अनुभवामुळेच संत पेत्राने हजारो लोकांना प्रभू येशची साक्ष देऊन ख्रिस्ताकडे आणले.
 प्रभूच्या वचनांचा अनमोल साठा असलेल्या बायबल ग्रंथाचे नित्यनेमाने वाचन करू या.

✝️
             
“प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत"


पहिले वाचन  प्रे.  कृ. ९:३१-४२

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन ९:३१-४२

"ख्रिस्तमंडळाची उन्नती होऊन ती पवित्र आत्म्याच्या समाधानात परिपूर्ण झाली. "

सर्व यहुदिया, गालील आणि शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात आणि पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्रने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, ऊठ आणि स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. तेव्हा तो तात्काळ उठला. त्याला पाहून लोद आणि शारोन येथील सर्व रहिवाशी प्रभूकडे वळले.

आणखी यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस ह्या नावाची कोणीएक शिष्या होती, ती सत्कृत्ये आणि दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आम्हाकडे यावयाला उशीर करू नका." तेव्हा पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता ती जे अंगरखे आणि जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग प्रेताकडे वळून म्हटले, “टबीथ, ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. मग सर्व यापोमध्ये हे माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१७

प्रतिसाद : प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?

१ ) प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?
माझ्या उद्धाराचे पेयार्पण घेऊन मी येईन आणि प्रभूच्या नावाने धावा करीन.

२ ) प्रभूला केलेले नवस मी त्याच्या साऱ्या प्रजेसमक्ष फेडीन. प्रभूच्या भक्तांचे मरण त्याच्या दृष्टीने अमोल आहे .

३ ) मी तर तुझा दास आहे प्रभू !  मी तुझ्या सेविकेचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ करीन, प्रभूच्या नावाने धावा करीन.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया!

शुभवर्तमान योहान ६ : ६०-६९

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आम्ही कोणाकडे जाऊ? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत."

येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो ?" आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय ? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर ? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत. तरीही विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.”
ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. येशू बारा शिष्यांना म्हणाला, "तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय ?" शिमोन पेत्रने उत्तर दिले “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपण आहा."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :'आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानात संत पीटर अत्यंत महत्वाची भूमिका बजावीत असताना दिसतो. पहिल्या वाचनात तो प्रभू येशूच्या नावाने चमत्कार करतो आणि त्यामुळे लोद व यापो परिसरातील लोकांमध्ये प्रभू येशूची सुवार्ता पसरते. शुभवर्तमानात लोक येशूची वचने ऐकून त्याला सोडून जातात. कारण त्यांना ती वचने स्वीकारणे कठीण जाते. संत पीटर मात्र आपल्या सोबत्यांसह येशूला चिकटून राहतो. कारण येशूजवळ सार्वकालिक जीवनाची वचने आहेत ही गोष्ट त्याला अगदी मनापासून पटलेली होती. रेव्ह. ना. वा. टिळकांनी संत पीटरच्या ह्या शब्दांना धरून 'तुज) सोडुनि ख्रिस्ता जाऊ कुठे मी' हे गीत लिहिलेले आहे. मात्र येशूला चिकटून राहणे व पुढे त्याच्या नावाने चमत्कार करणे ह्या अवस्थेत पोहोचण्याआधी पेत्र तीन अवस्थांतून गेलेला होता : कबुली, नकार आणि स्वीकार. तुम्ही ख्रिस्त आहात अशी कबुली देणारा पेत्र मी त्याला ओळखत नाही अशा शब्दात त्याला नाकारतो. मात्र शेवटी प्रभुजी, मी आपणांवर प्रेम करतो हे तुम्हांला ठाऊक आहे अशा शब्दांत तो येशूचा मनापासून स्वीकार करतो. कबुली नकार स्वीकार यापैकी मी कोणत्या अवस्थेत आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासाने तुझे नामस्मरण करण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या