Marathi Bible Reading | 3rd week of Easter Friday 23rd April 2021

पुनरुत्थान

तिसरा सप्तह

शुक्रवार


२३ एप्रि २०२१




"शौलाला प्रभू येशूचे दर्शन घडले आणि त्यांचे संपूर्ण परिवर्तन झाले."
✝️

संत जॉर्ज  - रक्तसाक्षी (४ थे शतक) 


✝️

 
शौलाला प्रभू येशूचे दर्शन घडले आणि त्यांचे संपूर्ण परिवर्तन झाले. त्याच्या जीवनाचा संपूर्ण ताबा जणू प्रभू येशूने घेतला. शौलानेसुद्धा आपले सर्वस्व ख्रिस्ताठायी आणि सुवार्तेसाठी समर्पित केले. प्रभू येशूवरील दृढ श्रद्धा आणि पौलाची सुवार्तेसाठी असलेली तळमळ खरे पाहता त्याच्या ख्रिस्तमय जीवनातून निर्माण झाली. संत पौलाचे जीवन ख्रिस्तमय म्हणजेच ख्रिस्ताशी एकरूप झाले होते.
प्रभू येशू आपल्या सर्वांना त्याच्याठायी एकरूप होण्यासाठीच बोलावित असतो. प्रभूने आपल्या सर्वांसाठी त्याचे शरीर व रक्त पवित्र कृपा संस्कारात  उपलब्ध करून ठेविले आहे. आध्यात्मिक दृष्ट्या  आपल्या सर्वांसाठी प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा हा संस्कार सामर्थ्य व कृपा देत असतो. जसा संत पौल ख्रिस्तमय झाला आणि झपाटल्याप्रमाणे त्याने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली तसे आपण ख्रिस्तमय होण्यासाठी तयारी करूया . 
प्रभू म्हणतो, 'ही भाकर जो खाईल तो सर्वकाळ जगेल.' आध्यात्मिक अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या भाकरीसाठी आपण भुकेले आहोत का? चर्चमधील वेदीवर भाकरीच्या रूपाने उपस्थित असलेल्या प्रभू येशूलाआपल्या जीवनात स्वीकारून आपण त्याचे सामर्थ्य, प्रेम, दया व कृपा अनुभवण्यासाठी आज अंतर्मुख होऊन चिंतन करू या.

✝️
             
"माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे."


पहिले वाचन  प्रे.  कृ. ९:१-२०

वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन

परराष्ट्रीयांसमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता शौल माझे निवडलेले पात्र आहे."

शौल प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने मुख्य याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुशलेममध्ये आणावे. मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्यावेळी अकस्मात प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने एक वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस ?" त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर ऊठ आणि नगरात जा, म्हणजे तू तेथे काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल.” त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलला जमिनीवरून उठवले तेव्हा त्याने डोळे उघडले, पण त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिष्कात नेले. तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्नपाणी घेतले नाही. इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, "हनन्या!" त्याने म्हटले, "काय प्रभू?" प्रभू त्याला म्हणाला, “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने पाहिले आहे." तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, येरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे." परंतु प्रभूने त्याला म्हटले, "जा, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्राएलची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे." आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागले हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, "शौलभाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे." तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११६:१-२

प्रतिसाद : सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.

१) आलेलुया !
अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा. साऱ्या  मानवांनो, त्याचे गुणगान गा.

२) त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे, 
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही.. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.
आलेलुया!

शुभवर्तमान योहान ६:५२-५९

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खावयाला कसा देऊ शकतो?" ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला सत्य ते सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. पण हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” कफर्णहूम येथे शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :'परमेश्वराचे वचन जिभेला गोड वाटते. कानाला मधूर वाटते परंतु ते पोटात गेल्यावर कडू बनते ह्याचा अर्थ परमेश्वराचे वचन पचवायला कठीण असते. ते कृतीत उतरविणे जड असते. 'माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय' असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा यहुदी कुरकूर करु लागले. अरण्यातील प्रवासात असतानाही इस्राएली लोकांनी मोशेविरुद्ध कुरकूर केलेली होती. परमेश्वराने त्यावेळी त्यांना मान्ना, लावे पक्षी आणि खडकांतून पाणी काढून दिलेले होते. संत जॉन मारी व्हियानी म्हणतात, 'संत कधी कुरकूर करीत नाहीत.' प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू होता त्यामागेही अशीच कुरकूर होती. शौलालाही वाटत होते की, येशूची शिकवण ही नियमशास्त्रापेक्षा कशी काय मोठी असू शकते. त्यामुळे तो ख्रिस्ती लोकांना तुरूंगात डांबू पाहात होता. मात्र दमास्कसच्या वाटेवर आलेल्या अनुभवाने तो अंतर्मुख झाला. तीन दिवस अन्नपाणी न घेता त्याने मनन-चिंतन केले आणि येशू हा देवाचा पुत्र आहे हे मान्य केले. त्याची कुरकूर कायमची थांबली. मी कोणकोणत्या बाबतीत सतत कुरकूर करीत असतो ? त्याविषयी मला काय करता येईल ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, भक्ती भावाने भाकरीच्या रूपान स्वीकारण्यास व तुझी कृपा अनुभवून तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या