Marathi Bible Reading | Holy Saturday Easter Vigil 3rd April 2021

शनिवार ३ एप्रिल २०२१ 

(पुनरुत्थान - जागरण विधी) 

प्रभू शब्द विधी : उत्पत्ती १:१-२:२, निर्गम १४:१५-१५:१,

यहेज्केल ३६:१६-२८


उपासना विधी : रोमकरांस ६:३- ११,

स्तोत्र ११७:१-२, १६-१७, २२-२३, लूक २४:१-१२.


✝️


✝️

ख्रिस्तसभा संपूर्ण जगभर आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या जागरण विधीमध्ये सहभागी होत आहे. इस्त्राएली जनतेला फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करताना साजरा केलेल्या वल्हांडण सणाची स्मृती साजरी केली जात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वत: कोकरासमान आपले रक्त सांडून जगाचे तारण केले आणि आजच्या दिवशी प्रभू येशूचे वैभवाने पुनरुत्थान झाले ख्रिस्ती माणसाच्या श्रद्धेचा पाया प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर बांधलेला आहे.

✝️

"तो उठला आहे."

✝️


पहिले वाचन  रोमकरांस पत्र ६:३-११
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
आपण सर्वांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यांतून उठविला गेला त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे.
कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त झालो आहोत तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त होऊ. आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही हे आपणांला ठाऊक आहे कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिंवत झालेले असे माना.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११८:१-२,१६-१७,२२-२३

प्रतिसाद : आलेलुया, आलेलुया, आलेलुया!

१) परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्राएलने म्हणावे की, "त्याची दया सनातन आहे."

२ )परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करीन.

३) बांधणाऱ्यानी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे,ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.


शुभवर्तमान लूक २४:१-१२

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस. आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन गालिलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया कबरीजवळ आल्या, तो कबरीवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या असता, पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, "तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता ? तो तेथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा. मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला क्रुसावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे." तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरीपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या स्त्रिया म्हणजे मग्दालिया मरिया, योहाना व याकोबची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परतुं हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. पेत्र मात्र उठून कबरीकडे धावत गेला. ओणवे होऊन त्याने आत पाहिले तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली, तेव्हा झालेल्या गोष्टींविषयी आश्चर्य करीत तो घरी गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती करून त्यावर सत्ता चालविण्यासाठी त्याचे प्रतिरूप असा मानव निर्माण केला. मात्र मूळपापाच्या विळख्यात सापडलेला माणूस देवापासून बहकला. देवाने मानवाच्या मुक्तीसाठी नेते, संदेष्टये, राजे व त्याच्या अभिषिक्तांना पाठवून सत्पथावर आणले. देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी म्हणजेच इस्त्राएल वंशासाठी मोशेची निवड केली. पापाच्या अंधकारात असलेल्यांना नवीन आत्मा व नवीन हृदय बहाल करण्यात शाश्वती दिली.
सर्वात शेवटी देवाने त्याचा एकुलता पुत्र प्रभू येशू ह्याला जगात पाठवून सर्वांसाठी बलिदान यज्ञ करावयास लावले. मात्र प्रभू येशू तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, जिवंत झाला आणि मानवाचे तारण पूर्ण झाले. आज पुनरूत्थानपूर्व जागरण विधीत आपण सहभागी होत असताना ज्या एकमेव सत्यावर आपली श्रद्धा उभारलेली आहे, त्यावर चिंतन करु या. ह्या जगातील पाप, दुष्टता व जगाचा अधिपती असलेल्या सैतानावर प्रभूने विजय मिळविला आहे. संकटे, दुःखे, अपयश, निराशा व सर्व प्रकारच्या व्याधींवर मात करण्यासाठी पुनरुत्थानांची आशा प्राप्त झाली आहे. विशेषत: आपले सर्वांचे पुनरुत्थान होणार आहे ह्याची ग्वाही संत पौल स्पष्ट करुन देत आहे. संत पौल म्हणतो, "ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्तामध्ये मरण, म्हणूनच त्याच्या मरणातून उठण्याच्या प्रतिरुपाने त्याच्याशी आपण संयुक्त होऊ"
पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करावी म्हणून आपण अंतर्मुख बनू या.

प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या