Marathi Bible Reading | Easter Sunday 4th April 2021


(पुनरुत्थान रविवार ) 

 ४ एप्रिल २०२१

✝️



✝️

अखिल मानवांच्या उद्धारासाठी प्रभू येशूने आत्मबलिदानाचा यज्ञ  देवपित्याला समर्पित केला. त्याने क्रुसावरील मरण स्वीकारले मात्र मृत्यू   त्याला नाहीसा करु शकला नाही. प्रभू येशू तिसऱ्या दिवशी सामर्थ्याने  पुनरुत्थित झाला. ख्रिस्तसभा आज मोठ्या आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या  पुनरुत्थानाचा महान सोहळा साजरा करीत आहे.

प्रभू येशूचे पुनरुत्थान हे जगातील एकमेव महान सत्य आहे. संत पेत्र आणि इतर शिष्यांनी प्रभू येशूची रिकामी कबर पाहिली. तसेच  स्त्रिया म्हणजेच मग्दालीया मारिया, योहाना व याकोबाची आई  मरीया ह्या होत्या. त्यांनी हे शुभवृत्त सर्वांना सांगितले. प्रभू येशू जिवंत झाला  आहे, ही बातमी खरोखरच निराश झालेल्या येशूच्या शिष्यांना आशादायक होती. पुरुत्थानामुळे शिष्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झाले. येशूचे  पुनरुत्थान हा ख्रिस्ती जीवनाच्या विश्वासाचा मूळ पाया आहे.  

प्रभू येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्या सर्वांना पुनरुत्थाची आशा  प्राप्त झाली आहे. म्हणूनच संत पेत्र सांगतो त्याप्रमाणे आपण प्रभू येशूच्या  पुनरुत्थानाचे साक्षीदार बनून आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे प्रभूची साक्ष  इतरांना देण्यासाठी प्रयत्नशील बनू या.

✝️

"त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक होते."


✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  १०:३४अ.३७-४३

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तो मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले."

पेत्रने बोलण्यास आरंभ केला, "योहानने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात व येरुशलेममध्ये जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहो. त्यांनी त्याला क्रुसावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हांस अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११८:१-२,१५-१७,२२-२३

प्रतिसाद :  प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करू या.

१) परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्राएलने म्हणावे की, "त्याची दया सनातन आहे."

२) परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही, मी जगेन. आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. 

३) बांधणार्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. 


दुसरे वाचन : कलस्सै ३:१-४

वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"जेथे ख्रिस्त आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.' 

तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील  गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.

हा प्रभूचा शब्द आहे

सर्व : देवाला धन्यवाद.


शुभवर्तमान योहान २०:१-९

वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २०:१-९

 "त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक होते."

आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले, ह्यास्तव शिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, "त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही." ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जायला निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रपेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

(ह्या शुभवर्तमानाऐवजी पुनरुत्थानपूर्व जागरणविधीचे शुभवर्तमान वाचता येईल. संध्याकाळच्या मिस्साबलीवेळी पुनरुत्थानाच्या तिसऱ्या रविवारच्या पहिल्या वर्षाचे दिलेले शुभवर्तमान वाचता येईल.)

चिंतन :  जेव्हा सर्वकाही संपलेले आहे असे आपल्याला वाटू लागते तेव्हाच परमेश्वर आपल्याला जीवनात प्रवेश करतो आपल्या जीवनाला नवीन कलाटणी देतो आणि एक नवीन. सुरुवात करून देतो. अग्नीला आशीर्वाद देऊन त्यातून नवीन मेणबत्ती पेटविणे, तारणाच्या इतिहासाचे वाचन करणे, बाप्तिस्म्याच्या वचनांचे नूतनीकरण करणे आणि प्रभुभोजनातून एक नवी शक्ती घेऊन नवीन जीवनाला सुरुवात करणे हा पुनरुत्थान जागरणविधीचा गाभा आहे. प्रभू येशूचे पुनरुत्थान हा खिस्ती श्रद्धेचा मूळ पाया आहे आणि तो पाया दोन भक्कम पुराव्यांवर घालण्यात आलेला आहे. रिकामी कबर आणि पुनरुत्थित प्रभूची दर्शने. संत योहानाच्या शुभवर्तमानात आपल्यासमोर तीन व्यक्ती सादर करण्यात आलेल्या आहेत. 
१) संत मरिया माग्दालिया: ही माग्दाला गावची एक स्त्री होती. येशूने तिच्यामधून सात भुते काढली होती असे चारही शुभवर्तमानकार नमूद करतात. याचा अर्थ प्रभूने तिचे सर्व विकार बरे केले होते. ती आपल्या पैशाअडक्याने प्रभूची सेवा करणाऱ्या स्रियांपैकी होती. क्रुसाच्या पायथ्याशी उभी राहून तिथे येशूच्या दुःखसहनात सहभाग घेतला होता पुनरुत्थानाच्या सकाळी भल्या पहाटे ती येशूच्या मृत शरीराला सुगंधी द्रव्ये लावण्यासाठी आलेली होती. परंतु तिला कबर रिकामी असलेली दिसली. हे तिचे पाहणे शारीरिक होते. (ग्रीक शब्द ब्लेपो). पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी तिला प्रेषितांची प्रेषिता हा किताब दिला. तर पोप फ्रान्सिस ह्यांनी उपासनेतील तिच्या स्मृतीला सणाचा (२२जुलै) दर्जा दिला. 
२) संत पिटर : गालील समुद्राजवळ राहणारा शिमोन पेत्र हा आंद्रियाचा भाऊ होता. येशूने त्याला स्वर्गाच्या किल्ल्या देऊन विशेष अधिकार दिलेला होता. येशूच्या चौकशीदरम्यान त्याने येशूला तीन वेळा नाकारले होते. मरिया माग्दालियाने रिकाम्या कबरेविषयी सांगितल्यावर तो कबरेकडे धावत गेला. त्याने येशूची वस्त्रे पाहिली. हे पाहणे चिकित्सक होते. (ग्रीक शब्द : थेवरेओ) 
३) संत योहान : ह्याचा उल्लेख दुसरा शिष्य किंवा येशूचा प्रिय शिष्य असा करण्यात आलेला आहे. तोही पेत्राबरोबर धावत कबरेकडे गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. (पाहणे या क्रियापदासाठी ग्रीक शब्द आहे : होराओ) याचा अर्थ, पुनरुत्थानाकडे आपण आध्यात्मिक नजरेने पाहायला हवे.

आत्मपरीक्षण : प्रभू येशूच्या पुनरुत्थानाकडे मी कोणत्या नजरेने पाहतो? येशूच्या पुनरुत्थानावर श्रद्धा ठेवल्यामुळे माझ्या जीवनात कोणता फरक पडलेला आहे ? मरिया माग्दालियाप्रमाणे मी प्रभूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता कोणाकोणाला सांगू इच्छितो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानात सहभागी होण्यास व तुझी साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या