Marathi Bible Reading | Easter Monday 5th April 2021

 

(पुनरुत्थान सोमवार  ) 

  एप्रिल २०२१

✝️

संत विन्सेंट फेरेर
अनेक व्रतस्थ लोकांना गरिबीचे व्रत आवडते; परंतु त्या व्रताशी संबंधित असलेले दुःख आणि अपमानास्पद वागणूक ते टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पद व नावलौकिक हवा असतो; परंतु वस्तुस्थितीपासून ते दूर राहतात.- संत विन्सेंट फेरेर

✝️

प्रभूच्या पुनरुत्थानाचे प्रत्यक्ष साक्षीदार बनलेल्या प्रेषितांनी प्रभूची सुवार्ता पसरविण्यास सुरुवात केली. मात्र पेन्टेकॉस्ट (पन्नासाव्या दिवशी) सणानंतर  पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्रेषितांमध्ये संचरले. नवचैत्यनाची स्फूर्ती घेऊन प्रेषितांनी प्रभू येशूचे जीवन, दुःख सहन, मरण व पुनरुत्थान ह्याची साक्ष  सर्वांसमोर देण्यास सुरुवात केली. 

ख्रिस्तसभेच्या सुवार्तेच्या साक्षीचा पाया संत पेत्र व प्रेषितांवर उभारला गेला. आपण सर्वजण त्याच शुभसंदेशांचे सहभागिदार बनलो आहोत. आपल्या शब्दाद्वारे, आचरणाद्वारे आणि सेवेद्वारे प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी प्रयत्नशील बनू या. प्रभूची साक्ष देण्यासाठी धैर्य मिळावे म्हणून प्रार्थना करु या.

✝️

"भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन."


✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  २:१४,२२-३२

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, "अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नाझरेथकर येशूच्याद्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते आणि चिन्हे तुम्हाला दाखवली त्यांची तुम्हाला माहिती आहे, त्यावरून देवाने तुम्हांकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता. तो येशू देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधम्यांच्या हातांनी कुसावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, "मी परमेश्वराला आपणांपुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, ह्यास्तव माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासित झाली, आणखी माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील."
बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हांबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला आणि त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला होता की, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्यांचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, "त्याला अधोलोकांत सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. ह्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   १६:१-२,५,७-११

प्रतिसाद :  देवा, मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.

१) देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मी प्रभूला म्हणालो, तूच माझा स्वामी आहेस. हे प्रभो, तू माझ्या वतनाचा व पेल्याचा वाटा आहेस. माझा बहुमान तूच आहेस. 

२) परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो, माझे अंतर्यामही मला रात्री मार्गदर्शन करते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे,म्हणून मी ढळणार नाही.

 ३) आणि म्हणून माझे हृदय आंनदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा आत्मा अधोलोकांत राहू देणार नाहीस,
तू आपल्या भक्ताला नाशाचा अनुभव येऊ देणार नाहीस.

४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सर्व सुखाचा खजिना आहे.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.

 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय २८:८-१

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत गेल्या. मग पाहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, "कल्याण असो !" त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याला नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, "भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन."
त्या जात असता, पाहा, पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, "आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले, असे म्हणा आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करु" मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरविण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  रिकामी कबर आणि ख्रिस्ताचे दर्शन हे पुनरुत्थानाचे दोन भक्कम पुरावे मानले जातात. आजच्या शुभवर्तमानातील स्त्रियांना पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन घडते. देवदूताने दिलेल्या शुभवावार्तेने त्या आधीच भयभीत व हर्षित झालेल्या होत्या. आता साक्षात् ख्रिस्तच त्यांच्यासमोर उभा होता. 'कल्याण असो!' ह्या त्याच्या शब्दांनी तर त्या त्याच्याजवळ ओढल्या गेल्या. काही कळायच्या आत त्यांनी त्याचे चरण धरले आणि त्याला नमन करून तो साक्षात्  परमेश्वर असल्याने त्यांनी सूचित केले. मात्र पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आपल्या मनात जेवढा भक्तिभाव उत्पन्न करतो तेवढाच तो आपल्याला कृतिशील बनवितो. त्या स्त्रियांनी पुनरुत्थानाची सुवार्ता आपल्या शिष्यांना सांगावी म्हणून येशूत्यांना प्रेषितकार्यावर पाठवितो परंतु याउलट, पहारेकरी पुनरुत्थानाचे सत्य दडविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मला पुनरुत्थानाची सुवार्ता कळलेली आहे का? मी हे सत्य पसरवितो की ते दडवून टाकण्याचा प्रयत्न करतो?

प्रार्थना : हे पुनरुत्थित प्रभू येशू, तुझी साक्ष आमच्या जीवनाद्वारे सर्वांना देता  यावी म्हणून आम्हाला सबळ कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या