(पुनरुत्थान मंगळवार )
६ एप्रिल २०२१
✝️
✝️
आजच्या पहिल्या वाचनात संत पेत्र पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देतो व पश्चाताप करण्याचे व प्रभू येशूच्या नवाने बाफ्तिस्मा घेण्याचे सर्वांनाआवाहन करीत आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा पेत्र सर्वांना पवित्र आत्म्याचे दान प्राप्त करुन घेण्यास सांगत आहे. सर्वांना सार्वकालिक जीवनाचे आश्वासन मिळ्याल्याने सुमरे तीन हजार लोकांनी त्यावेळी बाप्तिस्मा स्वीकारला.: पापांबद्दल पश्चाताप करुन बाप्तिस्मा स्वीकारणाऱ्यांना हे दान मिळत असते. आपला सर्वांचा बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने झालेला आहे. पवित्र आत्म्याठायी तारणाचे तेल आपल्या प्रत्येकाला लावून अभिषिक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपणसुद्धा ख्रिस्ताची साक्ष जगाला द्यायची आहे. मात्र त्यासाठी पवित्र आत्म्याची आराधना करुन त्याच्याद्वारे आपल्याला कोणते दान मिळाले आहे त्याची जाणीव करुन घ्यायला हवी. आपण पवित्र आत्म्याठायी नवजीवन मिळणाऱ्या प्रार्थना संघात जाऊन त्याचा अनुभव घेतल्याशिवाय पवित्र आत्म्याची दाने, सामर्थ्य व कार्ये कळणार नाहीत.
आज आपल्या सर्वासमोर ते आव्हान आहे. आपण कुठपर्यंत ही सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविणार आहोत? पवित्र आत्म्याची दाने ओळखून देवाची सुवार्ता पसरविण्याचा आपण निर्धार करु या.
✝️
"आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले."
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. २:३६-४१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
पेत्र यहुद्यांना म्हणाला, "ह्यास्तव इस्राएलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे."
हे ऐकून त्यांच्या अंत:करणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?" पेत्र त्यांना म्हणाला, "पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलांबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना दिले आहे." आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली आणि बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या." तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद ३२:४-५,१८-१९,२०.२२
प्रतिसाद : प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.
१) प्रभूचा शब्द सत्य आहे त्याचे सारे कार्य टिकाऊ असते. त्याला सात्त्विकता व न्याय प्रिय आहेत. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.
२) प्रभूचे भय बाळगणारे, त्याच्या प्रेमाचे भुकेले अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते. मृत्यूच्या दाढेतून तो त्यांचे प्राण वाचवतो. दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो.
३) आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे. तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल आहे. तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे, हे प्रभो, कारण आम्ही तुझ्याच आशेवर आहोत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान २०:११-१८
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
मरिया बाहेर कबरीजवळ रडत उभी राहिली होती. रडता रडता तिने ओणवून कबरीत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, "त्यांनी माझ्या प्रभूला नेले व कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून." असे म्हणून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, "बाई का रडतेस ? कोणाचा शोध करतेस?" तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, "दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन." येशूने तिला म्हटले, "मरिये," ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, "रब्बूनी!" (म्हणजे गुरुजी). येशूने तिला म्हटले, "मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो." मरिया मग्दालिया गेली आणि "आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : - संत मार्कच्या शुभवर्तमानात एक शुभ्रवस्रधारी तरुण येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता स्त्रियांना देतो, संत लूकच्या शुभवर्तमानात मात्र शुभ्र वस्त्र धारण केलेले दोन पुरुष हीच शुभवार्ता स्त्रियांना देतात. शुभ्र वस्त्र हे बाप्तिस्म्याचे चिन्ह होय. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ही पावित्र्याची वस्त्रे धारण करून येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता पसरावी अशी अपेक्षा आहे. मात्र येशूचे पुनरुत्थान ही दैवी कृती आहे हे दर्शविण्यासाठी संत मत्तयच्या शुभवर्तमानात एक देवदूत स्त्रियांना येशूच्या पुनरुत्थानाची बातमी देतो तर आजच्या (योहान लिखित) शुभवर्तमानात मरिया माग्दालिया हिला येशूच्या (रिकाम्या) कबरेत दोन देवदूत दिसतात. याचा अर्थ येशूचे पुनरुत्थान हा एक आध्यात्मिक अनुभव असतो. मरिया माग्दालियाला हा अनुभव चार टप्प्यात आला : शारीरिक दृष्ट्या तिला प्रथम एक माळी दिसला. येशूची वाणी कानी पडताच तिला आध्यात्मिक दृष्टी लाभली. तिसऱ्या टप्प्यात ती येशूला बिळगून राहण्यास पाहते. परंतु चौथ्या टप्प्यात ती प्रेषितांची प्रेषिता बनते. येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव मला कोणकोणत्या प्रकारे येत असतो?
प्रार्थना :हे पवित्र आत्म्या, ये आणि आमचे नुतनीकरण कर. आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरुन टाक, आमेन.

0 टिप्पण्या