Marathi Bible Reading | Easter Wednesday 7th April 2021

   

(पुनरुत्थान बुधवार ) 

 ७ एप्रि २०२१

✝️


- संत जॉन डे ला साले  
(वर्तनसाक्षी )
वायव्य फ्रान्समधील टाईम्स शहराच्या कौन्सिलरचा मुलगा जॉन हा "आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक" मानला जातो. वयाच्या १६ व्या वर्षीच तो कॅथिड्रलमध्ये दाखल झाला आणि २७ व्या वर्षी त्याला धर्मगुरूपदाची कृपावस्े चढविण्यात आली. पावित्र्य आणि नम्रतेचा मूर्तिमंत पुतळा असलेला संत जॉन जसजसा वयात आला तसतशी त्याला गोरगरिबांविषयी विशेष कळकळ वाटू लागली. पुढे गरिबांचा कैवार घेणे हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनून गेला. 
 "विचाराबरोबरं समर्पित वृत्ती, परोपकाराबरोबर विवेकशीलता आणि कनवाळूपणाबरोबर खंबीर मनोवृत्ती ह्यांचा मिलाफ घडून आला तर जीवन फुलून जाते." - संत जॉन डे ला साले

✝️

अम्माउसच्या वाटेवरुन प्रवास करणाऱ्या दोन शिष्यांना प्रभू येशूने दर्शन दिले. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आनंदाची बातमी आपल्या सहशिष्यांस सांगण्यासाठी त्यांनी माघारी जाऊन पुन्हा येरुशलेमचा प्रवास केला. आपल्या श्रद्धेचे डोळे उघडे असले तर आपल्याला ख्रिस्ताच्या कृपेचा लाभ होतो.  ते सर्वजण ख्रिस्ताच्या कृपेने भरलेले होते.

पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले प्रभू येशूचे प्रेषित सुवार्ता प्रसाराचे कार्य करु लागले. आजच्या पहिल्या वाचनातील घटना - प्रभू येशूच्या वचनांवर विश्वास ठेवणाऱ्यास प्रभू कृपेचे वरदान बहाल करीत असतो. पेत्राकडे भिक्षेसाठी हात पसरविणाऱ्या पांगळ्या भिकाऱ्याला पेत्राने प्रभू येशूच्या नावाने  हाताला धरुन उठवले व तो बरा होऊन येशूची स्तुती करु लागला. प्रभू येशूच्यानावात सामर्थ्य आहे, त्याची ही जिंवत साक्ष आहे. प्रभूच्या नावावर व वचनांवर  विश्वास ठेवणाच्याला शारीरिक व आत्मिक बळ प्राप्त होत असते.

प्रभू येशूने म्हटले आहे, "तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल" (योहान १५:७). आपल्या जीवनातील निराशा, दुःख, संकटे व आजार यामध्ये श्रद्धेने प्रभू येशूच्या नावाचा जप केल्यास कृपेचा लाभ घडत असतो.

✝️

"त्याने भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्याला ओळखले."


✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ३:१-१०

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

पेत्र व योहान तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आम्हांकडे पाहा.” तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्यांने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, "माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो, नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग" आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत, उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद १०५:१-४,६-९

प्रतिसाद :  प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते आलेलुया!

१)  प्रभूला धन्यवाद द्या, त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याचे कार्य जाहीर करा! त्याचे गीत गा, त्याचे कीर्तन करा, त्याच्या सगळ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करा!

२)  त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, प्रभूला शरण जाऊ पहाणारांचे मन आनंदित होवो. प्रभूचा व त्याच्या सामर्थ्याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा.

३) त्याने निवडलेले याकोबचे वंशजहो, तो प्रभूच आमचा देव,
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते. ४ तो आपला करार आठवतो,
हजारो पिढ्यांसाठी दिलेले अभिवचन पाळतो. हा करार त्याने आब्राहामशी केला, तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.

 आलेलुया!


शुभवर्तमान लूक २४:१३-३५

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शिष्यगणातील दोघेजण येरुशलेमपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वत: जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. त्यांनी येशूला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, "तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहा त्या कोणत्या ?" तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, "अलीकडे येरुशलेममध्ये घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय ?" तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी?" त्यांनी त्याला म्हटले, “नाझरेथकर येशूविषयीच्या.” तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहान्तशिक्षेसाठी पकडून क्रुसावर खिळले. परंतु इस्राएलची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्यालाआज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरीकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही." मग तो त्यांना म्हणाला, "अहो निर्बुद्धी व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय ?" मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणांविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला.
मग ज्या गावात ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, "आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे." तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. मग तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले, तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, "तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंत:करणाला आतल्याआत उकळी येत नव्हती काय ?" मग त्याच घटकेला ते उठून येरुशलेममध्ये माघारे गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, "प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनच्या दृष्टीस पडला आहे!" मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  अम्माऊसच्या वाटेवरील शिष्य दोन प्रकारच्या अनुभवातून जातात. पहिला प्रकार पवित्र मिस्सेशी तर दुसरा प्रकार आध्यात्मिक अनुभवाशी संबंधित आहे. पवित्र मिस्सेमध्ये प्रभुशब्दविधी आणि ख्रिस्तशरीरविधी असे दोन प्रमुख भाग असतात. अम्माऊसच्या वाटेवर पुनरुत्थित येशू एक वाटसरू बनून शिष्यांना प्रभुशब्दाची फोड करून सांगतो व शेवटी त्यांच्याबरोबर भाकर मोडून त्यांना ख्रिस्तशरीरविधीत सहभागी करतो. शिष्यांचा हा आध्यात्मिक प्रवास निराशेकडून चैतन्याकडे सहा टप्प्यात घडत राहतो, येशूच्या मृत्यूनंतर निराश झालेले शिष्य पुन्हा आपल्या नेहमीच्या जीवनाकडे परतण्याच्या विचारात होते. येश एक वाटसरू बनून त्यांच्याबरोबर धार्मिक विषयांवर चर्चा करू लागतो त्यांच्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येऊ लागते. ते त्याला आपणाकडे येण्याची विनंती करतात. तो भाकर मोडतो तेव्हा त्यांचे डोळे उघडतात. मोठ्या चैतन्याने ते पुन्हा माघारी जेरुसलेमला परतात व इतर शिष्यांना ती सुवार्ता सांगतात. माझ्या जीवनात आध्यात्मिक चैतन्य देणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ? मला आध्यात्मिकदृष्ट्या निराश करणाऱ्या गोष्टी कोणत्या?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. तुझी स्तुती करण्यास वतुला गौरविण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या