Marathi Bible Reading | Easter Thursday 8th April 2021

    

(पुनरुत्थान गुरुवार  ) 

८ एप्रि २०२१

✝️




- संत  ज्युली बिलियार्ट  
(कुमारिका  )
आपण स्वत:ला तुच्छ लेखले तर देव आपले सर्वस्व आपल्यामध्ये
ओततो प्रार्थनामय जीवन जगणाऱ्या व देवावर विसंबून राहणाऱ्या स्त्रिया असलेली आपली संस्था कधीही नामशेष होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. -संत ज्युली बिलियार्ट

✝️

प्रभू येशूची साक्ष व  त्याची देवराज्याची सुवार्ता पसरविण्याची आज्ञा प्रमाण  मानून सर्व शिष्य कार्यरत बनले. विशेषतः संत पेत्राने शलमोनच्या देवडीवरून भाषण केले कि . 'देवाने प्रभू येशूला मेलेल्यांपासून उठविले ह्याचे आम्ही साक्षी आहोत,' असे पेत्राने ठासून सांगितले. प्रभू येशूच मशीहा व तारणारा आहे ह्याची साक्ष देऊन सर्वांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा असे आवाहन करण्यात आले व त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला. प्रेषितांनी त्यांच्यावर सोपविलेली सुवार्ता प्रसाराची आणि साक्ष देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा स्वीकारलेली प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूचे जीवन, मरण व पुनरुत्थानाची सहभागीदार बनलेली आहे. म्हणूनच प्रभू येशू  ख्रिस्ताच्या सुवार्तेची साक्ष जगाला देण्यासाठी सर्व ख्रिस्ती जनांना पाचारण करण्यात आले आहे. आपल्याला जगात भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण पवित्र  आत्म्याद्वारे सामर्थ्य ज्ञान व शहाणपणाची देणगी आपल्याला देण्यात आली आहे. आपणाला साक्ष कशी देता येईल यावर आज चिंतन करु या. प्रभू येशूच्या वचनाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे सामर्थ्य व कृपा आपल्याला मिळाली आहे.


✝️

येशू स्वत: त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्हांस शांती असो!"

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ३:११-२६

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 


"तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले."

तो पूर्वी पांगळा असलेला व आता बरा झालेला मनुष्य पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, "अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता ? आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आम्हांकडे निरखून का पाहता? आब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशू याला गौरविले आहे. त्याला तुम्ही धरले आणि पिलातने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले व खुनी पुरुष आम्हांला द्या अशी मागणी केली आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहो. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. येशूच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वासमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे."
"बंधुजनहो, आता तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही, जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने, दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा व वळा, अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे आणि तुम्हांकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या कालापर्यंत येशुला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभू देव तुम्हांसाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करील. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्यांचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमुवेलपासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले. तुम्ही संदेष्ट्याचे पुत्र आहा आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे आब्राहामशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहा, देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हांकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद द्यावा. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८:२,५-९

प्रतिसाद : प्रभो, तुझे नाव कितीतरी थोर आहे!

१) हे प्रभो, आमच्या स्वामी, साऱ्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे! 
तू मर्त्य मानवाची आठवण करावी, यत्किंचित मानवजातीची तू पर्वा करावी, असा तो कोण?

२) तरीपण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस, त्याला वैभव व मोठेपणा यांनी अलंकृत केले आहेस. आपल्या हातच्या कलाकृतींवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस,सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस.

३) शेरडेमेंढरे, गुरेढोरे, अगदी एकूणएक जंगली जनावरे, आकाशातील पाखरे, समुद्रातले मासे, सागरात संचार करणारे प्राणीदेखील तू त्याच्या चरणापाशी ठेवले आहेत.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभूचा हा दिवस आहे, 
ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.

 आलेलुया!


शुभवर्तमान लूक २४:३५-४८

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


"ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे."

प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वत: त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्हांस शांती असो!" पण ते घाबरून भयभीत झाले आणि भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात ? माझे हात आणि माझे पाय पाहा, मीच तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.” असे म्हणून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांस ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, "येथे तुम्हांजवळ खाण्यास काही आहे काय?" मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
मग तो त्यांना म्हणाला, "मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे." तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, "असे लिहीले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे आणि येरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहा."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  संत लूक ज्या लोकांसाठी शुभवर्तमान लिहितो ते लोक बिगर यहुदी किंवा परराष्ट्रीय होते. एखादा नीतिमान माणूस मरण पावला तर तो  आपल्या दैवताच्या मंडळीत जाऊन बसतो. त्याचा भूतलाशी संबंध तुटतो. अशी ह्या लोकांची समजूत होती. येशूचे पुनरुत्थान झाले म्हणजे तोही आपल्या देवतांच्या मंडळीत बसला असे ह्या लोकांना वाटण्याची शक्यता होती. ती फेटाळून लावण्यासाठी आजच्या शुभवर्तमानात लूक पुनरुत्थित येशूचे खरे रूप तीन टप्प्यात सादर करतो. पहिल्या टप्प्यात येशू शरीररूपाने शिष्यांना प्रकट होतो. आपले हातपाय त्यांना दाखवतो. दुसऱ्या टप्प्यात तो भाजलेल्या माशाचा तुकडा खातो. त्या दोन्ही कृतीद्वारे पुनरुत्थानामुळे आपला या जगाशी संबंध तुटलेला नाही, आपण आपल्या भक्तांपासून विभक्त झालेले नाहीत हे तो सूचित करतो. तिसऱ्या टप्प्यात तो शास्त्राचा उलगडा करून ते शास्त्रवाचन आपल्यात पूर्णत्वास गेलेले आहे याची साक्ष देण्यास प्रेषितांना प्रवृत्त करतो. येशूच्या पुनरुत्थानाविषयी माझ्या मनात कोणत्या चुकीच्या कल्पना आहेत? त्या मी कशाप्रकारे सुधारू शकतो?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानाची साक्ष जगाला देण्यास व तुझी सुवार्ता जगजाहीर करण्यास आम्हाला कृपा सामर्थ्य दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या