Marathi Bible Reading | Easter Friday 9th April 2021

     

(पुनरुत्थान शुक्रवार) 

९ एप्रि २०२१

✝️




✝️

एका पांगळ्या भिकाऱ्याला  येशूच्या नावाने बरे केल्यावद्दल याजक मंडळी व रोमन अधिकाऱ्यांनी पेत्राला व शिष्यांना जाब विचारला असता पेत्राने साक्ष देत म्हटले, ' नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या समोर उभा राहिला आहे.' प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने झालेल्या अशा अनेक चमत्कारांमुळे प्रेषितांना धैर्य, आत्मिक  बळ आणि शहाणपण प्राप्त झाले आणि त्यांच्यात एक नवीन चैतन्य संचारले.  प्रेषितांच्या साक्ष देण्याने व सुवार्ता प्रचारामुळे अनेकांनी ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा स्वीकारला व ख्रिस्तमंडळी वाढत गेली.
प्रभू येशूच्या वचनात व  नावात तारण आहे व त्याच्या आत्मबलिदानात नवजीवनाचे दान आपल्याला मिळाले आहे.  ख्रिस्तसभेमध्ये जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने अनेक चमत्कार घडत आहेत, अनेकांचे जीवन परिवर्तन होत आहे, तर अनेकांना अनेक मार्गानि प्रभू येशूच्या तारणदायी कृपेचा अनुभव येत आहे. पवित्र मिस्सा बलिदानाप्रसंगी साक्षात प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्तशरीर संस्कारात आपल्या सर्वांना  दर्शन देण्यास येत असतो. भक्तिपूर्वक त्या प्रभूचे दर्शन घेऊन त्याची कृपा आपल्या प्रत्येकाला प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या राजासनासमोर शरण जाऊ या. प्रभुची साक्ष इतरांना देण्यास पुढाकार घेऊ या..


✝️

"मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हांला भरपूर सापडेल." 

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ४:१-१२

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"तारण दुसऱ्या कोणाकडून नाही." 
पेत्र आणि योहान लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांमधून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली आणि संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.
दुसऱ्या दिवशी यहुद्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री, हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके येरुशलेममध्ये एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, "तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले ?" तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, "अहो लोकाधिकार्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्या विषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही क्रुसावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११८:१-२.४,२२-२७अ

प्रतिसाद :  बाधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.

१)  प्रभूला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे. 
त्याचे वात्सल्य अनंत आहे. आता इस्राएलच्या घराण्याने म्हणावे, "त्याचे वात्सल्य अनंत आहे." प्रभूला भिणाऱ्यांनी म्हणावे, "त्याचे वात्सल्य अनंत आहे."

२) बांधणाऱ्यानी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. 
ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.

३)  प्रभो, आम्हाला वाचव. प्रभो, आमची भरभराट कर. 
प्रभूचे नाम धारण करून येणारा धन्य आहे. प्रभू सदनातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. प्रभू परमेश्वर आमचा प्रकाश आहे.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभूचा हा दिवस आहे, 
ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.

 आलेलुया!


शुभवर्तमान योहान २१:१-१४

वाचक :  योहानालिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघेजण हे एकत्र जमले असता, शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, "मी मासे धरावयास जातो," ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो." तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
मग पहाट होत असता येशू समुद्रकिनाऱ्यावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, "मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?" त्यांनी त्याला उत्तर दिले, "नाही." त्याने त्यांना म्हटले, "मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हांला भरपूर सापडेल." म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्रला म्हणाला, "अरे, हा तर प्रभू आहे!" हे ऐकून शिमोन पेत्रने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते. मग किनार्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा." तेव्हा शिमोन पेत्रने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले, तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला,  "या, न्याहारी करा." तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून "आपण कोण आहा?" हे त्याला विचारायला शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  पुनरुत्थित ख्रिस्ताच्या दर्शनाचे एकूण अकरा वेगवेगळे वृत्तांत चारही शुभवर्तमान कारांनी दिलेले आहेत. संत योहानच्या शुभवर्तमानात येशू मरिया माग्दालिया, दहा प्रेषित, थोमा व सात शिष्य ह्यांना दर्शन देतो. त्यापैकी आजच्या शुभवर्तमानात मासेमारीच्या धंद्यात अपयशी ठरणारे प्रेषित पुन्हा एकदा त्याच धंद्यात यशस्वी होऊन समुद्रकिनारी आपला आनंद कसा साजरा करतात ते योहान आपल्याला समजून सांगतो. रात्रभर कष्ट करूनही शिष्यांच्या जाळ्यात काहीच पडले नाही. पापाची रात्र असली की, कोणतीही कला किंवा कौशल्य फलदायी ठरत नाही. त्यासाठी कृपेच्या अवस्थेत यावे लागते. पहाट होताच येशू त्यांच्या जीवनात येतो. तो सांगतो त्या ठिकाणी जाळे सोडताच सर्व प्रकारचे (१५३) मासे मिळतात. प्रभुच्या दर्शनाने पेत्रही ओशाळून जातो. पूर्वी त्याने एका शेकोटीजवळ प्रभूला नाकारलेले होते आता एका नव्या शेकोटीजवळ तो प्रभूवरील प्रेम व्यक्त करतो. आपल्या जीवनात कोणकोणत्या क्षेत्रांत पापाची रात्र आहे ? आपण कोणत्या प्रकारच्या शेकोटीजवळ आहोत-जागतिक सुखाच्या की प्रभू प्रेमाच्या?

प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हाला तुझ्या सत्याचे दर्शन घडव, आमचे जीवन परिवर्तन कर व तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास धैर्य व प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या