Marathi Bible Reading | Easter Saturday 10th April 2021


     

(पुनरुत्थान शनिवार ) 

१० एप्रि २०२१

✝️


संत फूल्बर्ट

महागुरू वर्तनसाक्षी (९५७-१०२९)



✝️


ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज ! तीच आज्ञा देऊन सुवात्तेची घोषणा करण्यासाठी पाचारण करीत आहे. प्रभू येशू द्वारे आपल्याला नवजीवन प्राप्त झाले आहे. त्याच्या तारणदायी प्रकाशाने आपले जीवन प्रकाशित झाले आहे. आपण पवित्र आत्म्याच्या कृपादानामुळे देवाची दत्तक मुले बनलो आहोत. प्रेषितांनी जशी आपल्या वाणीद्वारे आणि कृतिद्वारे प्रभूची सुवार्ता पसरविली तशीच आपण सुद्धा ती पसरवायची आहे. लोकांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आणायचे आहे. ह्या कार्यात विरोध होऊ शकतो मात्र प्रभू ठायी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. गेल्या दोन हजार वर्षापासून ख्रिस्तसभा अखंडितपणे संपूर्ण जगभर सुवार्ता प्रसाराचे कार्य करीत आहे.
प्रभू येशूने दिलेली सुवार्ता प्रसाराची आणि परस्पर सेवेची आज्ञा आपण  प्रत्येकाला योग्यरितीने अमलात आणता यावी व त्याचे तारणदायी वचन व  सार्वकालिक जीवन सर्वांना प्राप्त व्हावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करु या. 



✝️

"सर्व जगात जाऊन  संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ४:१३-२१

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही."

पेत्रचे व योहानचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून याजक, वडीलजन व शास्त्री आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले, "ह्या माणसांना आपण काय करावे ? कारण त्यांच्याकडून खरोखरच अलौकिक चमत्कार घडला आहे, हे सर्व येरुशलेमकरांना कळून चुकले आहे, तेव्हा आपणाला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये." मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करीत होते.


हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११८:१,१४-२१

प्रतिसाद : प्रभो, तू माझे ऐकलेस.

१) प्रभूला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे. त्याचे वात्सल्य अनंत आहे. प्रभू माझा सामर्थ्यदाता आणि गीत आहे. तो माझा उद्धारकर्ता झाला आहे. नीतिमानांच्या तंबूतून आनंदाचा व विजयाचा जयघोष होत आहे. 

२) प्रभूचा उजवा हात उंचावला आहे, प्रभूने उजव्या हाताने महान पराक्रम केला आहे. मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. प्रभूने मला जबर शिक्षा केली आहे, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.

३) माझ्याकरिता नीतिमंदिराची दारे उघडा. मग आत जाऊन मी प्रभूला धन्यवाद देईन. प्रभूकडे जायचे हे दार आहे. यातून सज्जन प्रवेश करील. प्रभू, तू माझे ऐकलेस, माझा उद्धारकर्ता झालास म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभूचा हा दिवस आहे, 
ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.

 आलेलुया!


शुभवर्तमान मार्क १६:९-१५

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"सर्व जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा.' 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरिया हिला दर्शन दिले, हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.
ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघेजण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी माघारी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही.
नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचा कठीणपणा ह्याविषयी त्यांना दोष लावला. मग त्याने त्यांना सांगितले की, "सर्व जगात जाऊन  संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : पुनरुत्थान आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपण प्रभूच्या दर्शनावर मननचिंतन केलेले आहे. आज संत मार्क येशूची दर्शने सारांश रूपाने आपल्यासमोर सादर करतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी मरिया माग्दालियाला प्रभूने दर्शन दिले. मात्र प्रेषितांनी तिच्या अनुभवावर अविश्वास दाखवून अश्रूगाळणे व शोक करणे पसंत केले. अरण्यातून जाणाऱ्या दोघा शिष्यांना येशूने दर्शन दिले. तेही निराशेच्या अरण्यातून बाहेर पडले. मात्र त्यांच्याही साक्षीवर प्रेषितांनी विश्वास ठेवला नाही. शेवटी येशू स्वतः अकरा प्रेषितांना भोजन प्रसंगी दर्शन देतो व त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणाबद्दल त्यांना दोष देतो व नव्याने त्यांना सुवार्ताप्रसाराची आज्ञा देतो. पुनरुत्थित ख्रिस्त वेगवेगळ्या वेळी विविध रुपाने व मार्गांनी आपल्याला दर्शन देत असतो. उदा. पवित्र मिस्सेमद्ये धर्मगुरू, लोकसमुदाय, प्रभुशब्द व भाकर आणि द्राक्षारस तसेच मिस्सेबाहेर गोरगरीब व गरजवंत इत्यादी. पुनरुत्थित येशूच्या दर्शनांवर मी कोणकोणत्या कारणास्तव अविश्वास दाखवित असतो?

प्रार्थना : हे प्रभू येशू, धैर्याने तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी आम्हाला सामर्थ्याचा आत्मा बहाल कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या