Marathi Bible Reading | Second Sunday of Easter Divine Mercy Sunday 11th April 2021

(पुनरुत्थानकाळातील 

दुसरा रविवार )

दैवीदयेचा रविवार  

११ एप्रि २०२१

✝️



दैवीदयेचा रविवार 


✝️


पुनरूस्थित प्रभू येशूने आपल्या शिष्यांना स्वर्गीय शांतिचे वरदान दिले.  विशेषतः पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्रभूने त्यांना बहाल केले. त्याच बरोबर !  पापांची क्षमा करण्याचा अधिकार देऊन देवराज्याची सुवार्ता पसरविण्याची  आज्ञा दिली. 
 ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या दैवी दयेचा सण  साजरा करीत आहे. प्रभू येशू जो शांतिदाता परमेश्वर आहे, तो दयेचा व करुणेचा महासागर आहे. त्याला आपण सर्वस्वी शरण जाऊ या.

ख्रिस्त सभेमध्ये दैवी दयेची आराधना व भक्ती वाढत आहे. पापांबद्दल  पश्चात्ताप करुन आपण देवावरील आपल्या श्रद्धेत सर्वदा वाढत रहावे म्हणून  प्रयत्नशील बनू या. जिवंत प्रभूचा अनुभव घेऊन त्याची सुवार्ता आपल्या  कृतीद्वारे इतरांपर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करु या.




✝️

“तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो."

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ४:३२-३५

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"श्रद्धावंतांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता." 

श्रद्धावंतांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही काही कमी नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत, मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.


हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११८:२-४,१६-१८,२२-२४

प्रतिसाद :परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.

१) आता इस्त्राएलने म्हणावे, त्याची दया सनातन आहे. अहरोनच्या घराण्याने म्हणावे, त्याची दया सनातन आहे. देवाला भिणार्यांनी म्हणावे, "त्याची दया सनातन आहे."

२) परमेश्वराने उजवा हात उभारलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करणार. परमेश्वराने मला जबर शासन केले, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.

३) बांधणार्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.



दुसरे वाचन   १ योहा ५:१-६

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते."

येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा पाळणे कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा दुसरा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त. पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही तो आला.

हा प्रभूचा शब्द आहे

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

येशूने म्हटले, "थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य."

 आलेलुया!


शुभवर्तमान योहान  २०:१९-३१

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"आठ दिवसांनंतर येशू आला."

आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला  आणि मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत." 
येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले." पण त्याने म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही."
मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो." नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा ऐस." थोमाने त्याला म्हटले, "माझा प्रभू व माझा देव!" येशूने त्याला म्हटले, "तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य!"
ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ही लिहिली आहेत.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : पुनरुत्थानकाळातील दुसरा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जावा असा संदेश संत मारिया फॉस्टीना कोवाल्स्का हिला मिळाल्याचे खिस्तसभा मानते. प्रभू येशूख्रिस्ताची ही दैवी दया त्याच्या जीवनात, कार्यात दुःखसहनात व मरणात आणि मरणानंतर झालेल्या त्याच्या पुनरुत्थानातही दिसून येते. पुनरुत्थित ख्रिस्ताने प्रेषितांना एकूण सहा देणग्या दिल्याचे आजच्या शुभवर्तमानात सांगण्यात आलेले आहे. 
१) दैवी आनंद : वेळ संध्याकाळची. प्रेषित यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंदर करून एका खोलीत लपून बसलेले होते. ही बाह्य परिस्थिती त्यांच्या अंतःकरणाची स्थिती दर्शविते. एवढी प्रतिकूल परिस्थिती असूनही येशू त्या खोलीत अवतरतो. प्रभूला पाहून शिष्यांना आनंद होतो. आता भीतीची जागा आनंदाने घेतलेली असते. आध्यात्मिक प्रगतीचे पहिले लक्षण म्हणजे आंतरिक / दैवी आनंद! 
२) दैवी शांती : 'तुम्हांस शांती असो!' हे केवळ अभिवादन नव्हते, अस्वस्थ झालेल्या प्रेषितांना शांतचित्त करणारी ती एक दैवी देणगी होती. ऐन रणांगणातून पळून गेलेल्या प्रेषितांना अभयदान देऊन त्यांच्याशी समेट करणार्या कनवाळू रििस्ताच्या करुूणामय हृदयाचा तो प्रतिध्वनी होता. 
३) दैवी मिशनकार्य : पित्याने जसे येशूला पाठविले होते. तसे येशू आपल्या प्रेषितांना मिशनकार्यावर पाठवितो. आता त्यांना चार भिंतीच्या आड लपून राहायची गरज नव्हती. त्यांचे ध्येय स्पष्ट होत होते. 
४) दैवी सामर्थ्य : येशू प्रेषितांवर फुंकर घालतो आणि त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देतो. आता एकाकीपणाच्या जागी स्वर्गीय सोबती अवतरलेला असतो. 
५) दैवी जीवनशैली : आता नवीन जीवनशैलीत सूडभावनेला जागा नव्हती. त्याची जागा क्षमाशीलतेने घेतलेली होती. लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. 
६) दैवी स्पर्श : संशय व्यक्त करणाऱ्या थोमाला येशू आणखी एक देणगी देतो. साक्षात देवाला स्पर्श करण्याची. येशूच्या त्या करूणामय कृतीने भारावून गेलेला थोमा त्याच्यावरील विश्वास व्यक्त करणारे उद्गार काढतो 'माझा प्रभू, माझा देव!

आत्मपरीक्षण : पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा वैयक्तिक अनुभव मला आलेला आहे का? त्याच्यावरील विश्वास मी कोणत्या शब्दात व्यक्त करू इच्छितो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. आम्हावर व अखिल जगावर दया कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या