पुनरुत्थान
पाचवा रविवार
२ मे २०२१
✝️
शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, “मी द्राक्षवेल आहे, तुम्ही माझे फाटेआहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो”. आपण बाप्तिस्मा संस्काराद्वारे ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होत असतो. आपले आध्यात्मिक जीवन प्रभू येशू ख्रिस्त जो जीवन देणारा द्राक्षवेल आहे त्यामध्ये एकरुप होत असते. त्याच्या कृपेने तो आपल्याला सदैव फलद्रुप होण्यासाठी जीवन रस पुरवितो. प्रभू येशूचा जीवन रस म्हणजेच त्याची जीवनदायी वचने आणि प्रीतिच्या आज्ञा आहेत. आपण सर्वांनी सतत वचनांद्वारे अमृत प्राशन करावे व त्याच्या आज्ञाप्रमाणे जीवन जगावे.
आपण आज ह्या वचनावर चिंतन करु या. खरोखरचा आपण येशूच्या जीवनरस पुरविणाऱ्या द्राक्षवेलाचे फाटे आहोत का? आपण येशूची वचने आत्मसात करुन तसे जीवन जगतो का? आपले जीवन ख्रिस्ताठायी फलद्रुप बनले आहे का? आपल्या जीवनाद्वारे आपण ख्रिस्ताचे प्रतिबिंबित रुप आहोत। का? ख्रिस्ताठायी एकजीव बनून त्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ९:२६-३१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले हे बर्णबाने शिष्यांना सांगितले. "
शौल येरुशलेमला आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्यांने त्यांना सांगितले आणि तो येरुशलेमात प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे. आणखी तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे आणि वादविवाद करीत असे. म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनांस हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले आणि पुढे तार्सस येथे पाठवले.
अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील आणि शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीला स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २२:२६-२८,३०-३२
प्रतिसाद : भक्तांच्या महासभेत मी तुझे स्तवन करीन.
१) तुला भिऊन वागणाऱ्यांसमक्ष मी आपले नवस फेडीन. दीनजनांना हवे तितके खायला मिळेल. प्रभूला शरण जाणारे त्यांचे स्तवन करतील. त्यांच्या मनाला चिरशांती लाभो !
२.) सारी पृथ्वी प्रभूचे स्मरण करील आणि त्याला अनुसरेल, सगळ्या राष्ट्रांतील कुळे लवून तुला मुजरा करतील. भूतलावरले सारे सुखसंपन्न त्यांच्यापुढे दंडवत घालतील. मातीला मिळणारे सगळे त्याला नमन करतील.
३) मी तर त्याच्यासाठी जगेन, माझे वंशजही त्याची सेवा करतील. पुढल्या पिढीला प्रभूविषयी हे सांगितले जाईल. ते येऊन भावी पिढीला त्याची न्यायपरायणता कथन करून म्हणतील,
"ही त्याचीच करणी."
दुसरे वाचन योहानचे पहिले पत्र ३:१८-२४
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"त्याच्या पुत्रावर आपण श्रद्धा ठेवावी आणि आपण एकमेकांवर प्रेम करावे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे. "
मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने आणि सत्याने आपण प्रेम करावे. आपण सत्याचे आहो हे ह्यावरून आपल्याला कळून येईल आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ. कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते.
प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवासमोर येण्याचे धैर्य आम्ही करतो आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडते ते करतो. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण श्रद्धा ठेवावी आणि त्याने आम्हांला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रेम करावे. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो आणि तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने आम्हांला दिलेल्या आत्म्यावरून आम्हांला कळून येते की, तो आम्हांठायी राहतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन, असे प्रभू म्हणतो;
जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळे देतो.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १५ : १-८
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन१५:१-८
"जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. "
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुझ्यामध्ये राहीन. जसे फाटे वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांस प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- संत योहानाच्या शुभवर्तमानात येशूची सात 'मी' वचने देण्यात आलेली आहेत. त्यापैकी 'मीच उत्तम मेंढपाळ आहे' ह्या 'मी' वचनावर आपण गेल्या रविवारी मनन-चिंतन केले. आजच्या रविवारी 'मीच खरा द्राक्षवेल आहे' ह्या येशूच्या आत्मप्रकटीकरणावर आपण मनन करू या. इस्रायली जनतेसाठी परमेश्वराचा द्राक्षमळा ही उपमा जुन्या करारात पुष्कळदा वापरण्यात आलेली आहे. येशूदेखील आपल्या शिकवणुकीतून देवराज्याचे दाखले देताना द्राक्षमळ्याचा उल्लेख करतो. आता तो स्वतःला त्या द्राक्षमळ्यातील खरा द्राक्षवेल म्हणून सादर करतो व स्वर्गीय पिता हा माळी आहे असे सांगतो. येशूने ‘खरा’ हा शब्द वापरलेला आहे कारण आंबट द्राक्षे किंवा रानद्राक्षे देणारी मंडळी समाजात होती. येशू आपल्या शिष्यांसाठी ‘फाटे' हा शब्द वापरतो. वेलाचे व फाट्याचे एक घनिष्ठ नाते असते. येशूने आपल्या रूपकात चार प्रकारचे फाटे नमूद केलेले आहेत.
१) फळ देणारे फाटे : वेलाशी जडून राहणारे फाटे फळ देत राहतात. शौलाला पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन होईपर्यंत तो धमकावण्या, द्वेष, हिंसाचार अशी विषारी फळे धारण करीत होता. परिवर्तनानंतर तो प्रेम, शांती, आनंद अशी फळे धारण करतो.
२) साफसूफ केलेले फाटे : काही फाटे विपुल फळे देतात. ते आणखी फळ देऊ शकतात त्यासाठी छाटणीची (pruning) गरज असते. अशी छाटणी करून अनावश्यक गोष्टी जीवनातून वजा केल्या तर आवश्यक गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळतो आणि माणूस विपुल फळ देतो.
३) कापून टाकलेले फाटेः ‘जे जे झाड फळ देत नाही ते छाटून टाकले जाईल' असे योहान बाप्तिस्ताने बजावले होते. येशू आता सांगतो की फळ न देणारा प्रत्येक फाटा कापून टाकला जाईल. वेलापासून झालेल्या फाट्यामध्ये जीवन नसते.
४) अग्नीत अलग टाकलेले फाटे : वेलापासून अलग झालेले फाटे सुकून जातात. ते गोळा केले जातात आणि अग्नीत टाकले जातात. त्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आलेली नव्हती. देवाने आपल्याला या जगात कोणती फळे देण्यासाठी पाठविलेले आहे त्याचे आपण भान ठेवायला हवे.
आत्मपरीक्षण : वरीलपैकी मी कोणत्या प्रकारात मोडतो? माझ्या जीवनातील कोणकोणत्या अनावश्यक गोष्टीची छाटणी करण्याची गरज आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या द्राक्षवेल रुपी जीवनाचे फळे देणारे फाटे बनण्यास आम्हाला सर्वदा तुझा जीवनरस प्राशन करण्यास प्रेरणा दे,आमेन.
0 टिप्पण्या