पुनरुत्थान
पाचवा सप्ताह
सोमवार
३ मे २०२१
(प्रेषित व रक्तसाक्षी )
सेंट फिलिप : गनेसरेत सरोवराच्या काठी वसलेल्या बेथसैदा तेथील रहिवासी फिलीप हा प्रभू येशूच्या प्रथम बारा शिष्यांपैकी एक होता. येशूने त्याला आपल्या शिष्यगणात निवडले तेव्हा त्याचे लग्न झालेले होते आणि त्याला काही मुली होत्या. मशिहा सापडताच त्याला इतका आनंद झाला की ती शुभवार्ता घेऊन तो आपला मित्र नथनेल ह्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफचा मुलगा येशू नाझरेथकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, “नाझरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलीप त्याला म्हणाला, “येऊन पहा" नथनेल फिलीपबरोबर येशूकडे आला आणि येशूचा अनुयायी बनला (योहान १: ३-४६). थिओडॉरेट आणि सुझेविअस ह्या धर्मपंडितांच्या मते संत फिलीप ह्याने आशिया मायनरमध्ये आपल्या कुमारी मुलींसह येशूची सुवार्ता पसरविली व फ्रिजिया येथल्या हैरापोलिस येथे त्याला क्रूसावरील रक्तसाक्षीत्वाचे मरण आले.
सेंट जेम्स (... ६२) : संत जेम्स धाकटा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक प्रेषित असून तो संत ज्यूड थादेऊस ह्याचा भाऊ होय. तो योहानचा भाऊ याकोब ह्याच्यापेक्षा उंचीने व व्यक्तिमत्वाने ठेंगणा असल्यामुळे त्याला बंधूवर्ग याकोब धाकटा ह्या नावाने ओळखत. पवित्र मरियेची बहीण क्लोपाची पत्नी मरिया हिचा तो मुलगा होय. त्यावरून त्याला प्रभूचा भाऊ याकोब असेही संबोधिले जाई.
संत जेम्स हा अत्यंत प्रेमळ, भक्तिमान व विरक्त वृत्तीचा होता. त्याला “संत जेम्स न्यायी” असेही म्हटले जाई. तो येरुशलेमचा पहिला महागुरू बनला,
✝️
" मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर श्रध्दा ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील,"
प्रभू येशूचा जवळचा प्रेषित संत फिलिप ह्याने नथनेलला प्रभू येशूजवळ आणले आणि तो येशूचा शिष्य बनला. प्रभू येशूची सुवार्ता सुरुवातीपासूनच घोषित करणारा संत फिलिप मात्र प्रभूला जेव्हा विचारतो, 'प्रभूजी आम्हाला पिता दाखवा', तेव्हा प्रभू त्याला म्हणतो, “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” पाच हजारांना प्रभूने जेव्हा भोजन दिले त्याप्रसंगी प्रभू येशूने फिलिपलाच म्हटले होते, “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या ?” प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेल्या संत फिलीपने येरुशलमेमध्ये आणि कैसरियापर्यंत प्रभूची सुवार्ता पसरविली. त्याला क्रुसावरील रक्तसाक्षीत्वाचे मरण आले.
ख्रिस्तसभा आज संत जेम्स धाकटा म्हणजेच क्लोपाची पत्नी मरिया हिचा पुत्र व येशूचा प्रेषित याकोब ह्याचासुद्धा सन्मान करीत आहे. प्रेमळ, भक्तिमान व न्यायी असलेला संत याकोब परोपकारी वृत्तीचा असल्यामुळे त्याने सर्वाबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते. मंदिराच्या उंच कड्यावरुन खाली लोटून देऊन नंतर त्याला ठार मारण्यात आले. प्रभू येशूचा विश्वासू सेवक व प्रेषित असलेल्या संत याकोबाचे जीवन अनुकरणीय आहे.
संत फिलिप व संत याकोब ह्यांचा सन्मान करीत असताना त्यांच्यासारखे प्रेमळ, भक्तीमान व धैर्याने ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन १ करिंथ १५ :१-८
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभू याकोबला, मग सर्व प्रेषितांना दिसला."
बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहा, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हांस कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले पुरला गेला, आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला, त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि काहीजण महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १८:२-५
प्रतिसाद : त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, किंवा आलेलुया !
१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
२) वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १४ : ६-१४
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ?"
येशूने थोमाला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेले आहे.”
फिलीप त्याला म्हणाला, “प्रभुजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले, “फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर 'आम्हांला पिता दाखवा' असे तू कसे म्हणतोस ? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे अशी श्रध्दा तू ठेवत नाहीस काय ? ज्या गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर श्रध्दा ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, तुम्ही माझ्या नामाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आपल्या जीवनात कोणत्या सर्वात मोठ्या गोष्टीचे ध्येय आखू शकतो? देवाला ओळखणे होय. आपल्या जीवनात आपण कोणती गोष्ट उत्तमरित्या आपल्यात सामील करू शकतो? इतरांना अधिक आनंद देणे, समाधानी करणे, संतोषविणे की आणखी ? ते म्हणजे देवाचे ज्ञान होय. ख्रिस्ती श्रद्धेचे सर्वात मोठे सत्य म्हणजे आपण. आपल्या जिवंत देवाला ओळखतो. आपले देवाबद्दलचे ज्ञान हे फक्त देवाबद्दल काहीतरी जाणून घेण्यापुरता मर्यादित नाही तर आपण देवाला व्यक्तिशः ओळखतो. ख्रिस्ती धर्माचे सार हे यहुदी व इतर धर्मापेक्षा वेगळे आहे ते म्हणजे आपण देवाला पिता या नावाने संबोधतो. आपणा प्रत्येकाला देवाला वैयक्तिकरित्या ओळखता यावे हे येशू आपल्यासाठी शक्य करतो. येशूला पाहणे म्हणजेच देवाला पाहणे होय. येशूमध्ये आपणास देवाच्या परिपूर्ण प्रेमाचे दर्शन घडते. तो अत्यंत कळकळीने आपणा सर्वांची काळजी घेतो. तो आपणावर क्रुसावरील बलिदानापर्यंत प्रेम करतो. येशू देवाचे मूर्तिमंत प्रकटीकरण आहे. तो देव, जो आपणावर विनाअट, अनारक्षित व निःस्वार्थीपणे प्रेम करतो. येशू आपणास वचन देतो की, जेव्हा आपण येशूच्या नावाने पित्याकडे प्रार्थना करतो, तेव्हा पिता आपली प्रार्थना ऐकतो, म्हणून येशूने आपणा सर्वांना प्रार्थना करण्यास शिकविले.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी विश्वासू लेकरे बनून सुवार्तेची साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

0 टिप्पण्या