Marathi Bible Reading | 5th Week of the Easter | Tuesday 4th May 2021

पुनरुत्थान

पाचवा सप्ताह 

मंगळवार   

४ मे  २०२१ 




सेंट फ्लोरियन 

( रक्तसाक्षी )

संत पौलाने आपल्या जिवाची पर्वा न करता अंत्युखिया आणि इतर प्रदेशात प्रभूयेशूची सुवार्ता पसरविली त्याचबरोबर निवडलेल्या शिष्यांनी बोध  करुन त्यांना धीर दिला व प्रभूच्या विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रवृत्त केले असा आजच्या पहिल्या वाचनाचा आशय आहे.

आजार, अपयश, निराशा, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशत अशा प्रकारच्या अस्वस्थ परिस्थितीत आज माणसे जीवन जगत आहेत. त्यातच कोरोनाची लागणीची भीती मुळे  मानसिक समतोल ढासळतो आहे परंतु  माणसे आपल्यापरीने  शांती प्रस्थापित करण्याचा  प्रयत्न करतात. मात्र प्रभूयेशूला सर्वस्वी स्वीकारल्याशिवाय शांतिचा अनुभव मिळत नाही.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, 'मी तुम्हांस शांति  देऊन ठेवितो मी आपली शांति तुम्हांस देतो, जसे जग देते तसे मी तुम्हांस देत  नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये.' प्रभू येशू ख्रिस्ताची शांति आपल्यातील अस्वस्थता, अनिश्चितता आणि भीति घालवून लावतो. प्रभूच्या शांतिमुळे नैराश्य, अपयश, दुःख व आजारावर विजय मिळविता  येतो. प्रभू येशूची शांति आपल्या मनाचा व अंत:करणाचा खोलवर शोध घेते. मनातील सर्व वेदना, अस्वस्थता, भिती बाहेर काढून टाकतो. आपल्या सर्वांना  प्रभू स्वतः ती शांति देऊ इच्छित आहे.  

✝️

" मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांला देतो, "
.
✝️
             
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १४:१९-२८

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"आपण देवाच्या सहवासात असताना देवाने आपणांकरिता काय काय केले हे त्यांनी सांगितले. "

अंत्युखिया आणि इकुन्या येथून कित्येक यहूदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर काढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला आणि नगरात निघून आला, मग दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे येथे गेला.
त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य बनविल्यावर लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया ह्या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यानी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडीलजन निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्याकडे त्यांना सोपवले.
• मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलिया येथे उतरले. तेथून ते अंत्युखियाला जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले. होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १४५:१०-१२,१३अब, २१

प्रतिसाद : प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात.

१) प्रभो, सारा प्राणिमात्र तुझे स्तवन करतो, तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. तुझ्या राज्याचा ऐश्वर्य ते वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात;

२) तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे शाही वैभव ते मानवजातीला जाहीर करतात तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य. तुझी सत्ता पिढ्यान्पिढ्या टिकते.

३) माझ्या तोंडी प्रभूचे स्तवन असेल, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद सारा प्राणीमात्र युगानुयुग गावो.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान १४ :२७-३१

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 " मी माझी शांती तुम्हांस देतो." 

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, मी जातो आणि तुम्हाकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो. तरी माझ्यावरी त्याची काही सत्ता नाही, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. "

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :शांती ही सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने आपणास दिलेली देणगी आहे. हे तुम्हास माहित आहे का? प्रभू येशू आपल्या निरोपाच्या भाषणावेळी शिष्यांना शांतीची देणगी देतो. येशू त्यांना कोणत्याप्रकारची शांती देतो? कोणत्याही समस्याचा अभाव असणे म्हणजे ख्रिस्ताची शांती नव्हे. शांती सर्वसमावेशक असून ती आपले सर्वोच्च हित साधते, भलं करते. जगासाठी शांती म्हणजे, सर्व समस्यामुक्त आणि अप्रिय गोष्टींचा सामना न करावा लागणे अशी असू शकते. मात्र येशू जी शांती देतो ती शांती भीतीवर विजय मिळते. आपणास चिंता मुक्त करते. येशूच्या शांती आणि आनंद ह्यापासून आपणास कोणीही वेगळे करु शकत नाही. कोणतेही दुःख, शोक, धोका, वेदना ह्यामुळे शांती वजा होऊ शकत नाही. येशू आपणास देत असलेली शांती  कशी प्राप्त करावी ? तर पवित्र आत्मा, जो आपल्यात वास करतो, त्याचे कार्य आणि देणगीद्वारे आपण शांती प्राप्त करू शकतो. प्रभू येशू आपणास दाखवून देतो की, राग, भीती आणि अहंकार या अवगुणांवर नियंत्रण मिळवून आपण शांतीची देणगी मिळवू शकतो. पवित्र आत्मा आपणास आपल्या दुर्बलपणात त्याच्या देणग्या आणि अलौकिक सद्गुण देतो, जे आपणांस प्रभू येशूचा पवित्र, शहाणा आणि समजूतदार शिष्य म्हणून जीवन जगण्यास सक्षम करतात.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या शांतिचे वरदान मला दे, धैर्याने व शांतचित्ताने जीवन जगण्यास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या