Marathi Bible Reading | 5th Week of the Easter | Wednesday 5th May 2021

पुनरुत्थान

पाचवा सप्ताह 

बुधवार 

५ मे  २०२१ 





संत आंजेलो

- रक्तसाक्षी (... १२२०)

प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या सर्वांना त्याच्याशी एकरुप होण्याचे आवाहन करीत आहे. द्राक्षवेल आणि फाटे ह्यांचा दाखला देऊन आपले प्रभू येशूशी  असलेले नाते कसे असावे हे स्पष्ट करुन सांगत आहे. आपण सर्वजण त्याचे जणू  शरीर आहोत म्हणूनच आपण त्याच्यापासून विभक्त होऊ शकत नाही, तरी सुद्धा आपण योग्य प्रकारे आचरण करीत नसल्यामुळे प्रभूला अपेक्षित फळ देऊ शकत नाही. फळ न देणारा फाटा प्रभू काढून टाकतो.
ख्रिस्ती माणसाचे जीवन हे ख्रिस्ताच्या वचनानुसार जगून त्याची साक्ष जगाला देण्यासाठी आहे. 
 आपल्या जीवनावर चिंतन करु या. आपण ख्रिस्तामध्ये मुळावलेले आहोत का? त्याच्या जीवन रुपी वृक्षातील कृपेमध्ये  वाढत आहोत का ? जीवनरस पुरविणारी त्याची अमर वचने आपण आत्मसात  करुन त्याप्रमाणे आचरण करतो का? प्रभू येशूच्या जीवनाशी सहभागितेचे जीवन जगल्याने आपण शुद्धतेचे पावित्र्याचे आणि परिपूर्णतेचे जीवन जगत असतो. आपले सर्वांचे जीवन प्रभू येशूठायी फलद्रुप होण्यासाठीच आहे. ख्रिस्त शरीर साक्रामेंतामध्ये प्रभू येशूने आपल्या सर्वासाठी अखंड कृपेचा  झरा साठविला आहे. त्याची वचने आपल्या सर्वांना आत्मपरिक्षण करुन त्याच्यासारखे जीवन जगण्यास प्रवृत्त करीत असतात. म्हणूनच जो प्रभू  येशूमध्ये राहतो तो फलदायी आणि कृपेने भरलेले जीनव जगतो. ख्रिस्त  आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनावा म्हणून आपण प्रार्थना करु या.

✝️

" मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे "
.
✝️
             
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १५:१-६

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"ह्या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित आणि वडीलजन ह्यांच्याकडे पौल आणि बर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहींनी जावे असे ठरवण्यात आले. "

काही प्रेषितांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली : “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल आणि बर्णबा ह्याचा त्यांच्याशी बराच मतभेद आणि वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहीनी ह्या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची रवानगी केल्यावर ते फेनिके आणि शोमरोन ह्यांमधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते येरुशलेमला पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्याने जे जे घडवले ते त्यांनी सांगितले. तरीपण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे येऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे आणि मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.” मग प्रेषित आणि वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करण्यासाठी जमले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १२२:१-५

प्रतिसाद : आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ.

१.  "आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ" असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे येरुशलेम, तुझ्या दारात आमचे पाय उभे आहेत. 

२.  हे येरुशलेम, मजबूत रचलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. तुझ्याकडे वंश परमेश्वराचे वंश चढून जातात. 

३.  कारण परमेश्वराच्या नामाचे उपकारस्मरण करणे हीच इस्त्राएलची साक्ष होय. तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्याची सिंहासने मांडली आहेत.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 
आलेलुया!

शुभवर्तमान योहान १५ :१-८

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. "

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुझ्यामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :ह्या जगातील कोणतीही शक्ती अथवा मृत्यू देवाचे प्रेम नष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? परमेश्वर पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशूचे प्रेम हे सर्जनशील आहे, आणि या प्रेमाचा स्वीकार करणाऱ्या सर्वांना अतुलनीय आनंद आणि चिरकाल टिकणारी मैत्री प्राप्त होते. परमेश्वर जगावर प्रेम करतो कारण त्याने, त्याचा गौरव करण्यासाठीच हे जग आणि आपणा सर्वांना त्याची प्रतिमा आणि प्रति रुपासारखे निर्माण केले आहे. आपण प्रभू येशूशी आपणांस त्याच्यापासून विभक्त न करणाऱ्या ऐक्य, शांती आणि आनंद या मूल्यांनी एकत्रित असावे म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठविले. आपला नाश होण्यासाठी नव्हे तर आपणास पाप आणि मृत्यूपासून सोडवून, तारण करण्यासाठी पाठविले. संत पॉल सांगतो की, आपणांस विपुल आनंद आणि आशा मिळू शकते कारण देवाने आपल्या अंतःकरणात त्याच्या प्रीतीचा वर्षाव केला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा दिली. नवीन आज्ञेचे सार काय आहे? तर मरणापर्यंत प्रेम, शुद्ध करणारे प्रेम, स्वार्थ, भीती, अहंकार यावर विजय मिळविणारे प्रेम, इतरांसाठी सर्वस्व पणाला लावणारे प्रेम आणि निःस्वार्थी करणारे प्रेम होय.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यामध्ये राहिल्या वाचून जीवन नाही, हे जाणण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या